मानसिक परिपूर्णत्व – ०६

 

इतर कोणा व्यक्तीला, कोणत्याही कल्पनेला, कोणत्याही गोष्टीला, तुम्ही तुमच्या आणि ईश्वराच्यामध्ये का येऊ देता? जेव्हा तुम्ही पूर्ण अभीप्सायुक्त असता, आनंदात असता तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही; ईश्वर आणि तुमची अभीप्सा याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. जर एखाद्या व्यक्तीला ईश्वर त्वरेने, संपूर्णतः, समग्रतेने मिळावा असे वाटत असेल, तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन तसाच संपूर्ण, सर्वसमावेशक असावयास हवा. तोच त्याचा एकमेव उद्दिष्टबिंदू असावयास हवा आणि त्यामध्ये इतर कशाचीही, अगदी कशाचीही लुडबूड असता कामा नये.

ईश्वर कसा असावा, त्याने कसे वागावे, त्याने कसे वागता कामा नये, यासंबंधीच्या मानसिक कल्पनांना काहीही किंमत नाही, उलट त्या मानसिक कल्पना म्हणजे मार्गातील धोंडच ठरतात. एक ईश्वरच केवळ महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची चेतना ईश्वराला कवळून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ईश्वर काय आहे हे तुम्हाला समजते, त्या आधी नाही. कृष्ण हा कृष्ण आहे, त्यामुळे त्याने काय केले, काय केले नाही याला मग अशी व्यक्ती महत्त्व देत नाही तर ती व्यक्ती त्याला पाहाते, त्याला भेटते; त्याचा प्रकाश, त्याची उपस्थिती, त्याचे प्रेम, त्याचा आनंद हाच काय तो त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक अभीप्सेबाबतीत नेहमी हे असेच असते – हा आध्यात्मिक जीवनाचा कायदा आहे.

कोणत्याही मानसिक कल्पना किंवा प्राणिक चढउतार यांच्यावर वेळ वाया घालवू नका – ते ढग पळवून लावा. जी एकमेव आवश्यक गोष्ट आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 55-56)

मानसिक परिपूर्णत्व – ०५

 

हृदयापासून केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा आणि अभीप्सा हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट क्षमतांपेक्षाही अधिक आवश्यक आणि अधिक प्रभावी असते.
*
व्यक्तीने जितके शक्य आहे तितके स्वतःला श्रीमाताजींच्या शक्तीप्रत खुले राखणे आणि प्रामाणिकपणे अभीप्सा बाळगणे आवश्यक आहे. मग कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करता येते – कदाचित त्याला काही वेळ लागेल पण परिणामाची खात्री असते.
*
श्रीमाताजींची शक्ती आपल्या अवतीभोवती सर्वत्र आहे असे समजून, ती आत प्रविष्ट व्हावी म्हणून व्यक्तीने तिचा धावा करावयास हवा. जर व्यक्तीला तशी खरीच जाणीव झाली तर उत्तमच, पण जरी तसे झाले नाही तरीही व्यक्तीची श्रद्धा असेल आणि त्या धाव्यामध्ये शक्ती असेल तरीही, श्रीमाताजींची शक्ती आत प्रवाहित होऊ शकते.
*
व्यक्तीने ईश्वरावर विसंबून असावे आणि त्यासोबतच काही सक्षम साधनासुद्धा करावी. साधनेच्या प्रमाणात नव्हे तर, जीवाच्या आणि त्याच्या अभीप्सेच्या प्रमाणात, ईश्वर त्याचे फल प्रदान करतो. चिंता करत बसणे देखील उपयोगाचे नाही. ”मी असा होईन, मी तसा होईन, मी कसे असावे बरे?” याऐवजी, ”मला मी काय व्हावेसे वाटते यासाठी नाही तर, ईश्वराला मी कोण बनणे अपेक्षित आहे, तसे व्हावयास मी तयार आहे” असे म्हणणे आवश्यक आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच आधारावर झाल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 55-56)

मानसिक परिपूर्णत्व – ०४

 

एकमेव अनिवार्य आवश्यक अट आहे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा.
*
प्रामाणिकपणा म्हणजे काय ? प्रामाणिकपणा म्हणजे कोणत्याही कनिष्ठ शक्तींचे प्रभाव न स्वीकारता, केवळ ईश्वरी प्रभावच स्वीकारणे.
*
सर्वथा ईश्वराकडेच वळणे आणि केवळ ईश्वरी आवेगच तेवढे स्वीकारणे म्हणजे प्रामाणिकपणा. तसे बनण्याची खरीखुरी, सततची इच्छा आणि त्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे प्रामाणिकपणा होय.
*
प्रामाणिकपणा म्हणजे तुमची इच्छा ही खरीखुरी इच्छा असली पाहिजे. “मी अभीप्सा बाळगतो’ असा जर का तुम्ही नुसताच विचार कराल आणि त्या अभीप्सेशी विसंगत अशा गोष्टी करत राहाल किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छावासनांचीच पूर्ती करत राहाल किंवा विरोधी असणाऱ्या प्रभावांप्रत स्वतःला खुले कराल, तर ती इच्छा प्रामाणिक नाही, असे समजावे.
*
प्रामाणिकपणा म्हणजे ईश्वराभिमुख असलेल्या सर्वोच्च अभीप्सेला, विरोध करण्यास आपल्यामधील कोणत्याच भागाला संमती न देणे.
*
सर्व प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम नक्कीच होतो; जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही ईश्वरी जीवनामध्ये उन्नत होता. पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे – फक्त आणि फक्त ईश्वरी सत्याचीच अभीप्सा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या वैयक्तिक सर्व मागण्या व वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ईश्वरालाच समर्पण करणे आणि कोणताही अहंकार आड येऊ न देता, ते कार्य ईश्वराने दिलेले आहे असे मानून कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे. व्यक्ती एकाएकी एकदम अशी होऊ शकत नाही. पण जर ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून तिचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने, नेहमी धावा करत राहील; तर व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 50-51)

मानसिक परिपूर्णत्व – ०३

 

….आध्यात्मिक प्रयत्नांसाठी प्रामाणिकपणा ही अगदी अत्यावश्यक गोष्ट आहे आणि कुटिलता हा कायमस्वरूपी अडथळा आहे. सात्विक प्रवृत्ती ही आध्यात्मिक जीवनासाठी नेहमीच योग्य आणि तयार अशी मानण्यात आली आहे, तर राजसिक प्रवृत्ती ही मात्र इच्छाआकांक्षाच्या भाराने दबून जाते. त्याच वेळी हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही गोष्ट द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी जर का कशाची आवश्यकता असेलच तर ती, ऊर्ध्वमुख अभीप्सेची असते.

आणि ही अभीप्सा (Aspiration) सात्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही उदित होऊ शकते. जशी एखादी सात्विक प्रवृत्तीची व्यक्ती तिच्या गुणांच्या अतीत होऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, ईश्वरी शुद्धता, प्रकाश आणि प्रेमाप्रत वळू शकते. अर्थात, जेव्हा व्यक्ती स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेईल आणि स्वतःमधून ती फेकून देईल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण ती जर पुन्हा कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती व्यक्ती मार्गभ्रष्ट होण्याची पण शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती त्यामध्ये रमलेली असते तोपर्यंत तिची आंतरिक प्रगती खुंटते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहासामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी वा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रुपांतर होताना वारंवार आढळून आले आहे. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये चैतन्याचे जगाई आणि मधाई, बिल्वमंगल आणि त्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. जो कोणी ईश्वराच्या घराचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात मग त्या माणसाच्या भूतकाळातील ठोकरा किंवा चुका किती का असेनात. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावर अनुक्रमे असणारी तेजस्वी व काळोखी आवरणे होत. पण जेव्हा ही आवरणे भेदली जातात तेव्हा, आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, ती दोन्ही आवरणे चांगली भाजून निघतात.

ईश्वरासमोरील विनम्रता ही देखील आध्यात्मिक जीवनाची एक अनिवार्य अट आहे आणि आध्यात्मिक गर्व, उद्धटपणा किंवा घमेंड आणि स्वतःवरील फाजील विश्वास या गोष्टी नेहमीच खाली खेचणाऱ्या असतात. या मार्गावरील अडचणी लक्षात घेता, ईश्वरावरील विश्वास आणि स्वतःच्या आध्यात्मिक नियतीवरील श्रद्धा (म्हणजे, मी अंतःकरणपूर्वक, जीवाच्या निकराने ईश्वराचा शोध घेत आहे; त्यामुळे एक ना एक दिवस मी त्याच्यापर्यंत पोहोचेनच हा विश्वास) या गोष्टी खूपच आवश्यक असतात. ईश्वर सगळ्यांमध्येच असल्यामुळे, इतरांचा तिरस्कार करणे या गोष्टीला येथे थाराच नाही. अंतिमतः, माणसाच्या कृती आणि आकांक्षा या कधीच क्षुल्लक आणि निरुपयोगी असत नाहीत कारण, सगळे जीवन म्हणजेच अंधकारातून प्रकाशाकडे चाललेली जीवाची वाटचाल असते. आमचा दृष्टिकोन असा आहे की, राजकारण, सामाजिक सुधारणा, परोपकार यांसारख्या मानवाने स्वीकारलेल्या कोणत्याही सामान्य मार्गाने, मानवता स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तात्पुरती केलेली मलमपट्टी असते. यातून खरी सुटका ही जाणिवेमध्ये परिवर्तन झाल्यावरच घडून येते; व्यक्ती आपल्या जीवाच्या अधिक महान, अधिक व्यापक आणि अधिक विशुद्ध अशा पद्धतीत परिवर्तित होईल आणि त्यावर आधारित कृती करू लागेल, जीवन जगू लागेल तेव्हाच यामधून सुटका घडून येते. एकदा का आध्यात्मिक दिशा निश्चित झाली की मग, व्यक्तीने आपली सारी ऊर्जा त्या दिशेनेच वळविली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 42-43)

मानसिक परिपूर्णत्व – ०२

 

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल. हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील. तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

*

व्यक्तीला जर ईश्वर हवा असेल तर, व्यक्तीच्या हृदयाची शुद्धीकरण प्रक्रिया पण ईश्वरानेच हाती घ्यावी आणि त्यानेच साधना विकसित करावी आणि त्याला आवश्यक असे अनुभवही ईश्वरानेच त्याला देऊ करावेत, ही जी तुमची योगाविषयीची आधीची कल्पना होती, त्याला अनुलक्षून उत्तर देताना, मी तसे लिहिले होते. मला असे म्हणावयाचे होते की, असे होणे शक्य आहे आणि असे घडूनही येते.

पण त्यासाठी त्या व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास असावयास हवा, भरवसा असावायास हवा आणि समर्पणाची इच्छा असावयास हवी. कारण, ईश्वराने सारे काही हाती घेण्यामध्ये, व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर न विसंबता, स्वतःला ईश्वराच्या हाती सोपविणे अंतर्भूत आहे. यामध्ये व्यक्तीची सारी श्रद्धा आणि विश्वास ईश्वरावरच असणे आणि त्याने उत्तरोत्तर आत्मसमर्पण प्रगत करत राहणे अभिप्रेत आहे. खरंतर, हेच साधनेचे तत्त्व आहे आणि तेच मी स्वतःही अनुसरलेले आहे. माझ्या दृष्टीने तरी, योगसाधनेचा हा गाभा आहे. मला वाटते, रामकृष्णांनी मांजराच्या पिल्लाची जी प्रतिमा वापरली आहे, ती पद्धत हीच आहे. पण सगळ्यांना हा मार्ग एकदमच अनुसरता येत नाही. इथपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो. जेव्हा मन आणि प्राण शांत होतात तेव्हा मग हा मार्ग अधिक विकसित होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69 – 70)

चैत्य पुरुष जेव्हा देह सोडून जातो तेव्हा, त्याने अगदी मन आणि प्राणाला देखील मार्गावरील त्यांच्या त्यांच्या विश्रांतीस्थानी सोडलेले असते, अशा वेळीदेखील तो स्वत:सोबत त्याच्या अनुभवांचा गाभा बाळगतो. तो भौतिक घटना किंवा प्राणिक हालचाली, मानसिक रचना, क्षमता किंवा स्वभाव यांपैकी काहीच बाळगत नाही तर या सगळ्यांतून अगदी आवश्यक असे जे काही त्याने त्यांच्याकडून जमवलेले असते असे काहीतरी तो बाळगून असतो, त्याला ‘दिव्य घटक’ असे म्हणता येईल. (या दिव्य घटकासाठीच वरील भौतिक घटना वगैरे गोष्टी अस्तित्वात होत्या.) ही कायमस्वरूपी अशी अभिवृद्धी असते की जी, दिव्यत्वाकडे जो विकास चालू आहे त्यामध्ये साहाय्यकारी होते. आणि म्हणूनच बहुतेक वेळी गत जन्मांमधील बाह्य घटना वा परिस्थिती स्मरणात राहत नाहीत. अशी आठवण राहण्यासाठी मन, प्राण आणि अगदी सूक्ष्म शरीर यांच्या अ-भंग सातत्याच्या दिशेने त्यांचे विकसन झालेले असावे लागते; कारण जरी ते एक प्रकारच्या बीजरूपाने स्मरणात राहिले तरी ते सहसा उमलत नाहीत, विकसित होत नाहीत. निष्ठा, उमदेपणा, उच्च कोटीचे धैर्य या रूपाने, योद्ध्याच्या महानतेमध्ये अंतर्भूत असणारा दैवी घटक, सुसंवादी मानसिकता आणि कवीची उदारमनस्कता ह्यांद्वारे अभिव्यक्त होणारा दैवी घटक शिल्लक राहतो आणि व्यक्तित्वाच्या नव्या सुमेळामध्ये एक नवीनच रूप घेऊन व्यक्त होऊ शकतो किंवा त्याचे जीवन जर ईश्वराभिमुख झाले तर साक्षात्कारासाठी म्हणून त्या शक्ती वळविल्या जाऊ शकतात किंवा ईश्वरासाठी जे कार्य करावयाचे आहे त्यामध्ये त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 544)

देह सोडल्यानंतर चैत्य पुरुष, दुसऱ्या जगातील काही विशिष्ट अनुभव घेतल्यानंतर, मानसिक आणि प्राणिक व्यक्तिमत्त्व टाकून देतो आणि गतकाळातील अर्क आत्मसात करण्यासाठी आणि पुढील जन्माची तयारी करण्यासाठी विश्रांत अशा स्थितीत निघून जातो.

नवीन जन्माची परिस्थिती कशी असेल हे, ह्या तयारीवरच अवलंबून असते. या तयारीमधूनच, नवीन व्यक्तिमत्त्वाची पुनर्रचना आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची निवड यासाठी मार्गदर्शन मिळते.

निघून गेलेला चैत्य पुरुष भूतकाळातील अनुभव अर्करूपाने स्मरणात साठवून ठेवतो, तो त्यांचे रूप वा तपशील लक्षात ठेवत नाही. आत्ताच्या आविष्करणाचा एक भाग म्हणून आत्म्याने जर गत जीवनातील एक वा अधिक व्यक्तिमत्त्वं आपल्यासोबत आणली असतील तर, त्याला गत जन्मातील काही तपशील आठवण्याची शक्यता असते. अन्यथा, केवळ योगदृष्टीनेच अशी स्मृती येते.

चैत्य पुरुषाच्या उत्क्रांतीमध्ये प्रतिगामी वाटतील अशाही काही हालचाली असतात, पण त्या केवळ आडव्यातिडव्या हालचाली असतात, ते खरोखरीचे मागे जाऊन पडणे नसते, तर ते ज्याच्यावर अद्यापि काम झालेले नाही पण परत त्यावर अधिक चांगले काम करावे म्हणून, अशा कोणत्यातरी गोष्टीकडे परत फिरून जाणे असते.

आत्मा प्राणिमात्रांच्या अवस्थेत परत मागे जात नाही; पण प्राणिक व्यक्तिमत्त्वातील काही भाग स्वत:ला विलग करून घेत, स्वत:मधील पशुप्रवृत्तीवर काम करण्यासाठी, परत पशुजन्माला जाऊन मिळू शकतो. लोभी मनुष्य साप बनून पुन्हा जन्माला येतो, या लोकरूढ कल्पनेमध्ये काही तथ्य नाही. ह्या प्रचलित काल्पनिक अंधश्रद्धा आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 534)

प्रश्न : क्ष मला असे विचारत होता की, पुनर्जन्माच्या या मालिकेमध्ये एखादी स्त्री पुरुष म्हणून किंवा एखादा पुरुष स्त्री म्हणून जन्माला येऊ शकतो का? त्याच्यामध्ये आढळणाऱ्या बायकी लक्षणांचे स्पष्टीकरण ह्या प्रकारे करता येईल असे त्याला वाटते. मलापण असे जाणून घ्यायचे आहे की, चैत्य पुरुषाला लिंग अशी काही गोष्ट असते का ?

श्रीअरविंद : चैत्य पुरुषामध्ये लिंग अशी काही गोष्ट नसते, पण पुरुष किंवा स्त्री तत्त्व असे म्हणता येईल. पुरुष हा स्त्री म्हणून किंवा स्त्री ही पुरुष म्हणून पुन्हा जन्माला येऊ शकते का हा एक कठीण प्रश्न आहे. पुनर्जन्मामध्ये काही विशिष्ट धागा पाळला जातो आणि माझा अनुभव तसेच सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, एखादा जीव सहसा (स्त्री तर स्त्री किंवा पुरुष तर पुरुष) असा एकाच प्रकारचा धागा पकडतो. पण लिंगामध्ये बदल ही गोष्ट अशक्य आहे असे मात्र म्हणता येणार नाही.

असेही काही असतात की, जे एका आड एक यापद्धतीने जन्म घेतात. पुरुषामध्ये बायकी लक्षणे आढळली तर तेवढ्यावरून तो गेल्या जन्मी स्त्री होता, असे काही खात्रीशीररित्या सांगता येत नाही. विविध शक्तींच्या खेळामधून आणि त्यांच्या विविध रचनांमधून अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. अशीही काही गुणवैशिष्ट्ये असतात की, जी दोन्ही लिंगांमध्ये समान असतात. स्वतःचे नसलेले असे एखादे मानसिक व्यक्तिमत्त्व, त्याचा अंशभाग हा जन्माच्या वेळी त्या व्यक्तीशी सहसंबंधित झालेला असू शकतो. ….पुनर्जन्म ही गुंतागुंतीची गोष्ट आहे आणि त्याविषयीची जी प्रचलित कल्पना आहे तितकी त्याची यंत्रणा साधीसोपी नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 548-549)

पुनर्जन्म या विषयाबद्दलची नेहमी होणारी एक सर्वसाधारण घोडचूक तुम्ही टाळली पाहिजे. कोणी एक ‘टायटस बाल्बस’ हा ‘जॉन स्मिथ’ म्हणून पुन्हा जन्म घेतो, म्हणजे तो माणूस मागील जन्मात होता अगदी त्याच व्यक्तिमत्त्वानिशी, त्याच चारित्र्याचा, तेच प्राप्तव्य लाभलेला असा जन्माला येतो; फरक इतकाच की आधी तो टोगा परिधान करावयाचा आणि आता तो कोटपँट वापरतो आणि लॅटिन भाषेऐवजी कॉकनी इंग्रजी भाषा बोलतो; अशी सर्वसाधारणपणे समजूत असते. पण हे असे काही नसते.

काळाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत या भूतलावर तेच ते एकच व्यक्तिमत्त्व, तेच चारित्र्य पुन्हा पुन्हा धारण करण्यात फायदा काय? आत्मा हा अनुभव घेण्यासाठी, वाढीसाठी, उत्क्रांत होण्यासाठी जन्माला येतो; जडद्रव्यामध्ये ईश्वरत्व आणेपर्यंत हे विकसन चालू राहावयाचे असते. केंद्रात्मा पुन्हा जन्माला येत असतो; बाह्य व्यक्तिमत्त्वाचा पुनर्जन्म होत नाही…

व्यक्तिमत्त्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, त्या एका जन्मातील अनुभव घेण्यासाठी बनविण्यात आलेला निव्वळ एक साचा असतो. दुसऱ्या एका वेगळ्या जन्मामध्ये तो चैत्य पुरुष स्वत:साठी एक वेगळे व्यक्तिमत्त्व, वेगळ्या क्षमता, वेगळे जीवन आणि वेगळी कारकीर्द घडवेल. जर समजा, रोमन कवी व्हर्जिल हा परत जन्माला आला, तर तो एक किंवा दोन जन्मामध्ये परत काव्य हाताशी धरेलही, पण तो निश्चितपणे महाकाव्य लिहिणार नाही, तर त्याला ज्या पद्धतीच्या ललित, सुंदर रचना लिहावयाची इच्छा होती, पण रोममध्ये असताना तो त्या लिहू शकला नव्हता, तशा तो लिहील. पुढच्या एखाद्या जन्मामध्ये तो अजिबातच कवी नसेल, कदाचित तो सर्वोच्च सत्य अभिव्यक्त करू पाहणारा, आणि त्याच्या सिद्धीसाठी धडपडणारा तत्त्वज्ञानी, योगी असेल – कारण या गोष्टींकडेसुद्धा त्याच्या जाणिवेचा सुप्त कल होता. कदाचित आपल्या काव्यामधून त्याने ज्या एनियन वा ऑगस्टसचे वर्णन केले आहे त्यांच्यासारखा तो कोणी योद्धा वा सत्ताधीश आधीच्या जन्मात असू शकेल.

केंद्रात्मा या वा त्या अंगाने एक नवीन चारित्र्य, एक नवीन व्यक्तिमत्त्व वाढवतो, विकसित करतो आणि तो सर्व प्रकारच्या पार्थिव अनुभवांमधून जात राहतो. उत्क्रांत होणारा जीव जसजसा अधिकाधिक विकसित होत जातो, अधिकाधिक संपन्न आणि जटिल होत जातो, तसतसा आपली सर्व व्यक्तिमत्त्वं जणू तो साठवत जातो. कधीकधी ती व्यक्तिमत्त्वं त्याच्या सक्रिय घटकांच्या पाठीशी उभी असतात, त्याच्या दर्शनी व्यक्तिमत्त्वामध्ये, त्या व्यक्तिमत्त्वांचा काही रंग, काही गुणधर्म, काही क्षमता इथेतिथे अशा आढळून येतात – कधीकधी तर त्या अगदी पृष्ठवर्ती येतात आणि मग अशा व्यक्तीची विविधांगी व्यक्तिमत्त्वं आढळतात, ती व्यक्ती बहुआयामी असते, कधीकधी तर असे भासते की, त्या व्यक्तीच्या ठिकाणी वैश्विक क्षमता आहेत.

पण जर का आधीचेच व्यक्तिमत्त्व, आधीचीच क्षमता पूर्णत: पुढ्यात आणण्यात आली, तर आधी जे केले होते तेच करण्यासाठी ती व्यक्ती पुन्हा तशीच येणार नाही; तर नवीन आकारात, नवीन रूपात तीच क्षमता अभिव्यक्त होईल, पण असे करताना जे आधी अस्तित्वात होते, त्याचेच केवळ पुनरुत्पादन असे त्याचे स्वरूप असणार नाही; तर अस्तित्वाच्या एका नवीन सुमेळामध्ये त्यांचे सामावून जाणे असेल.

तेव्हा तुम्ही अशी अपेक्षा बाळगता कामा नये की, आधीचा योद्धा, आधीचा कवी त्यांच्या बाह्य व्यक्तिवैशिष्ट्यांनिशी जसाच्या तसा पुन्हा येईल – हां, असे असू शकते की, त्याच्या बाह्य गुणवैशिष्ट्यांपैकी काही पुन्हा नवीन जन्मामध्येही दिसून येतील; पण ती गुणवैशिष्ट्ये एका नवीन गुणसम्मुचयामध्ये नव्याने प्रतिबिंबित झालेली असतील. पूर्वी जे केले नव्हते ते करण्यासाठी एका नव्या दिशेने सर्व शक्ती कामाला लावल्या जातील. आणखी एक गोष्ट अशी की, पुनर्जन्मामध्ये व्यक्तिमत्त्व, चारित्र्य ह्याला प्राधान्याने महत्त्व असत नाही. प्रकृतीच्या उत्क्रांतीच्या पाठीमागे चैत्य पुरुष असतो आणि तोच उत्क्रांत होत असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 543-544)

आजारपणाचे शारीरिक किंवा मानसिक, बाह्य वा आंतरिक, कोणतेही कारण असू दे, परंतु त्याचा परिणाम शारीरिक देहावर होण्यापूर्वी, व्यक्तीभोवती असणाऱ्या आणि तिचे संरक्षण करणाऱ्या अजून एका स्तराला त्या आजाराने स्पर्श करणे आवश्यक असते. या सूक्ष्म स्तराला वेगवेगळ्या शिकवणीमध्ये विविध नावे असतात. कोणी त्याला आकाशदेह म्हणतात तर कोणी त्याला नाडीगत आवरण किंवा प्राणमय कोश (Nervous Envelope) म्हणतात. एखादी खूप गरम आणि उकळती वस्तू असली तर तिच्या भोवती जशी धग जाणवणारी, सूक्ष्म संवेदना असते, तशीच काहीशी त्याची घनता असते, ती त्याच्या शरीरातून बाहेर उत्सर्जित होत असते आणि ती शरीरावर अगदी निकट आवरण घालून असते.

या स्तराच्या माध्यमातूनच बाह्य जगताशी व्यक्तीचे सर्व व्यवहार होत असतात आणि शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होण्यापूर्वी या प्राणमय कोशावर हल्ला होणे आणि त्यातून आत शिरकाव होणे हे प्रथम आवश्यक असते. हे आवरण जर पूर्णपणे बलवान आणि अभेद्य असेल, तर मग प्लेग किंवा कॉलरासारख्या महाभयंकर आजाराने ग्रस्त असलेल्या ठिकाणी जरी तुम्ही गेलात, तरी तुम्ही निरोगी राहू शकता. जोपर्यंत हे आवरण पूर्ण आणि समग्र आहे, एकसंध आहे, त्याचे घटक हे निर्दोष समतोल राखून आहेत, तोपर्यंत आजारांच्या सर्व संभाव्य हल्ल्यांपासून हे एक परिपूर्ण संरक्षण असते.

एका बाजूने शरीर हे जडतत्त्वाने बनलेले असते, जडद्रव्याने म्हणण्यापेक्षा भौतिक परिस्थितीने बनलेले आहे, असे म्हटले पाहिजे तर दुसऱ्या बाजूने ते आपल्या मानसिक स्थितीच्या स्पंदनांनी बनलेले असते. शांती, समता, आरोग्याबद्दल खात्री आणि श्रद्धा, स्वस्थ विश्रांती, प्रसन्नता आणि उजळ आनंदीपणा या तत्त्वांपासून हे आवरण बनलेले असते. आणि या आवरणाला ही तत्त्वे बळ आणि द्रव्य पुरवितात. अगदी सूक्ष्म आणि त्वरित प्रतिक्रिया देणारे असे हे संवेदनशील माध्यम असते; ते अगदी त्वरेने सर्व प्रकारच्या सूचनांचा स्वीकार करते आणि स्वतःमध्ये त्वरेने बदल घडवून आणू शकते आणि त्याची परिस्थितीही जवळजवळ पूर्णपणे बदलून टाकू शकते.

वाईट सूचनेचा त्याच्यावर खूपच जोरकसपणे परिणाम होतो; तसेच उलट, तितक्याच जोरदारपणे चांगल्या सूचनेचाही त्याच्यावर परिणाम होतो. नैराश्य आणि नाउमेद यांचा त्याच्यावर खूपच प्रतिकूल परिणाम होतो; या गोष्टी त्या आवरणाला छिद्रे पाडतात, जणू त्याच्या द्रव्यामध्ये छेद करून त्याला कमकुवत, अप्रतिकारक्षम बनवितात आणि विरोधी हल्ल्यांना सुकर असा मार्ग खुला करून देतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 89)