मानसिक परिपूर्णत्व – १६

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्त्तर देत आहेत.)

मी बलवान अशा केंद्रवर्ती आणि शक्यतो परिपूर्ण श्रद्धेविषयी तुमच्याशी बोललो; कारण तुम्ही फक्त परिपूर्ण अशा प्रतिसादाचीच तमा बाळगता असे दिसते. म्हणजे इतर साऱ्या गोष्टी तुम्हाला समाधान देणाऱ्या नाहीत; साक्षात्कार, ईश्वरी अस्तित्व यांचेच तुम्हाला मोल आहे. मात्र ते तुम्हाला तुमच्या प्रार्थनेमधून गवसत नव्हते. परंतु निव्वळ प्रार्थनेद्वारे या गोष्टी लगेचच प्राप्त होतील, असे सहसा घडत नाही. जर का केंद्रामध्ये ज्वलंत श्रद्धा असेल किंवा अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये परिपूर्ण श्रद्धा असेल तरच तसे घडून येते. परंतु ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की, ज्यांची श्रद्धा तितकी खंबीर नाही, किंवा ज्यांचे समर्पण परिपूर्ण नाही ते तिथवर पोहोचूच शकत नाहीत. परंतु मग बहुतेक वेळा, त्यांना आधी छोट्या छोट्या पायऱ्या पार कराव्या लागतात; आणि जोवर प्रयत्नसातत्याद्वारे किंवा तपस्येद्वारे पुरेसे खुलेपण प्राप्त होत नाही तोवर, त्यांच्या प्रकृतीच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. अगदी डळमळणारी श्रद्धा आणि संथ, आंशिक समर्पण ह्यांचीसुद्धा स्वत:ची म्हणून काहीएक शक्ती असते, त्यांचे स्वत:चे असे काही परिणाम असतात. तसे नसते तर, अगदी मोजक्याच लोकांना साधना करणे शक्य झाले असते. केंद्रवर्ती श्रद्धा म्हणजे वर किंवा मागे असलेल्या आत्म्याच्या केंद्रवर्ती अस्तित्वावर श्रद्धा असे मला म्हणावयाचे आहे. ही अशी श्रद्धा असते की, जेव्हा मन शंका घेते, प्राण खचून जातो, आणि शरीर ढासळू पाहते तेव्हाही ही श्रद्धा टिकून असते. आणि जेव्हा हा हल्ला संपतो, तेव्हा ही श्रद्धा पुन्हा उसळून येते आणि पुन्हा एकदा मार्गावर वाटचाल करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते. ती बळकट आणि तेजस्वी असू शकते, ती फिकी, दिसायला दुबळी अशी असू शकते; पण तरीदेखील ती प्रत्येक वेळी सतत टिकून राहिली तर, मग ती खरीखुरी श्रद्धा होय. निराशा आणि अंधकाराचे झटके ही साधनामार्गावरील एक परंपराच आहे. पौर्वात्य आणि पाश्चात्त्य योगमार्गांमध्ये तो जणू काही एक नियमच असल्यासारखे दिसते. मला ते स्वतःलादेखील ज्ञात आहे. पण माझ्या अनुभवातून मला असे उमगले की, ह्या अनावश्यक परंपरा आहेत आणि व्यक्तीने जर ठरविले तर, व्यक्तीची त्यापासून सुटका होऊ शकते. म्हणूनच जेव्हा केव्हा या गोष्टी तुमच्यामध्ये किंवा इतरांमध्ये आलेल्या मला आढळतात, तेव्हा मी त्यांना श्रद्धेच्या शिकवणीपुढे उचलून घेऊ पाहतो. आणि तरीसुद्धा जर निराशा आणि अंधकाराचे झटके आलेच तर, व्यक्तीने शक्य तितक्या त्वरेने त्यातून बाहेर पडावे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात पुन्हा यावे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 95-96)

मानसिक परिपूर्णत्व – १५

 

आत्मप्रकाशाशी आणि ईश्वरी हाकेशी एकनिष्ठ राहण्यासंबंधी मी जे बोलत होतो त्यामध्ये, मी तुमच्या गतायुष्यातील कोणत्या गोष्टीविषयी किंवा तुमच्यामधील एखाद्या उणिवेविषयी बोलत नव्हतो. तर सर्व संघर्षामध्ये, हल्ल्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या एका गोष्टीकडे निर्देश करत होतो – सत्यप्रकाशाला, सत्याच्या हाकेला विरोध करणाऱ्या कोणत्याही सूचना, आवेग, प्रलोभन यांचे म्हणणे ऐकण्यास नकार देण्याच्या आवश्यकतेकडे, मी निर्देश करत होतो. सर्व शंकाकुशंका आणि निराशेच्या वेळी असे म्हणावे की, ”मी ईश्वराचा आहे, मी अपयशी होऊ शकणार नाही.” अशुद्धतेच्या आणि अपात्रतेच्या सर्व सूचनांना उत्तरादाखल म्हणावे की, ”मी ईश्वराने निवडलेले अमर्त्यतेचे बालक आहे. मी फक्त माझ्याशी आणि ईश्वराशी प्रामाणिक असावयास हवे, तर विजय निश्चित आहे; अगदी मी जरी पडलो, धडपडलो तरी मी खात्रीने पुन्हा उभा राहीन.” कोणतेतरी कनिष्ठ ध्येय पूर्ण करण्यासाठी, या उच्च्तर ध्येयापासून दूर जाऊ पाहणाऱ्या सर्व आवेगांना उत्तर द्यावे की, “हे सर्वात महान असे ध्येय आहे. माझ्या अंतरंगात वसणाऱ्या आत्म्याचे समाधान करू शकेल असे हे एकमेव सत्य आहे; या दिव्यत्वाच्या प्रवासामध्ये कितीही परीक्षा आणि संकटांना सामोरे जावे लागले, तरी मी धीराने ध्येयापर्यंत पोहोचेनच.” ‘प्रकाशाशी आणि हाकेशी एकनिष्ठता’ याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ हा होता.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 99)

मानसिक परिपूर्णत्व – १४

 

ज्याचे अजूनपर्यंत आविष्करण झाले नाही, जे प्राप्त झाले नाही किंवा साध्य झाले नाही अशा गोष्टींकडे आत्म्याच्या साक्षीत्वाने पाहणे म्हणजे श्रद्धा. आपल्या अंतरंगामध्ये असणारा जो ज्ञाता, त्याला, कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ही जाणीव असते की, हे सत्य आहे किंवा अनुसरण्याजोगी वा प्राप्त करून घेण्याजोगी ही परमोच्च गोष्ट आहे. आपल्या अंतरंगामध्ये असणारी ही गोष्ट अशी असते की, जी मनाला निश्चित खात्री नसली, अगदी प्राण संघर्ष करत असला, बंड करत असला किंवा नकार देत असला तरीसुद्धा ती टिकून राहते. जो योगसाधना करतो आणि तरीही अशा तऱ्हेचे निराशेचे, अपयशाचे, अश्रद्धेचे आणि अंधाराचे दीर्घ कालावधी त्याच्या आयुष्यात आलेले नाहीत, असा कोण आहे? – पण तरीसुद्धा त्यामध्ये असे काहीतरी असते की, ज्यामुळे तो तग धरून राहतो. इतकेच नाही तर, वाटचाल करत राहतो, कारण त्याला जाणवत असते की, ज्याचे तो अनुसरण करत आहे ती गोष्ट सत्य आहे. आणि जाणवत असते म्हणण्यापेक्षा त्याला हे नक्की माहीत असते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. ईश्वर अस्तित्वात आहे आणि तीच एक अशी गोष्ट आहे की, जिचे अनुसरण केले पाहिजे, त्याच्या तुलनेत जीवनातील दुसरी कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्याजोगी नाही, ही जीवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, योगमार्गामधील मूलभूत श्रद्धा आहे. ह्या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगाकडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत झालेली नाही किंवा मंदावलेली नाही. तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, ती अधिक आग्रही आणि अतूट झाली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ती टिकून आहे तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी निवडली गेली आहे, असे म्हणता येईल. मी तर असे म्हणेन की, त्याची प्रकृती ही कितीही अडथळेयुक्त असू दे, अडीअडचणी आणि नकारांनी ठासून भरलेली असू दे तरी, आणि अगदी अनेक वर्षे संघर्ष करत राहावा लागलेला असू दे तरीसुद्धा, व्यक्तीला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 93)

मानसिक परिपूर्णत्व – १३

 

श्रद्धा ही कोणत्याही अनुभवावर अवलंबून असत नाही. ती अशी गोष्ट आहे की जी अनुभवपूर्व असते. व्यक्ती योगसाधनेला सुरुवात करते ती अनुभवाच्या बळावर नाही, तर ती सहसा श्रद्धेच्या बळावर सुरुवात करते. हे केवळ योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच आहे असे नाही; तर सामान्य जीवनात सुद्धा हेच लागू पडते. कार्यकर्ते, संशोधक, ज्ञाननिर्माते सुरुवात करतात ती श्रद्धेनेच आणि जोपर्यंत पुरावा सापडत नाही, किंवा ती गोष्ट घडून येत नाही तोपर्यंत निराशा आली, अपयश आले, विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच काहीतरी त्यांना सांगत असते की, यामध्ये तथ्य आहे, या गोष्टीचे अनुसरण केले पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे. आंधळी श्रद्धा ही चुकीची गोष्ट नाही का, असे रामकृष्णांना विचारले असताना ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे आंधळी श्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर आंधळीच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती किंवा स्थापित झालेले ज्ञान असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 92-93)

मानसिक परिपूर्णत्व – १२

 

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत. ”मला दुसरेतिसरे काहीही नको, ईश्वरच हवा,” असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते. …”मी ईश्वराला माझे समर्पण करू इच्छितो आणि माझ्या आत्म्याचीच ती मागणी असल्याने, इतर काहीही नाही, तर फक्त तेच. मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी इतर काहीही मागणार नाही, केवळ हीच माझी मागणी असेल. जेणेकरून, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग त्याचे ते कार्य गुप्त असेल वा प्रकट असेल, ते झाकलेले असेल वा आविष्कृत झाले असेल, मग ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. मी माझ्या स्वतःच्या मार्गासाठी आणि वेळेसाठी आग्रह धरणार नाही; त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे; मी त्याच्यावर विश्वास ठेवेन; त्याची इच्छा प्रमाण मानेन; त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन; कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्ण विसंबून राहीन आणि कधीही मार्ग सोडणार नाही. माझे मन शांत होऊन, त्याच्याकडे वळू दे आणि ते त्याच्या प्रकाशाप्रत खुले होऊ दे; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे; त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत तो खुला होऊ दे. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच. काहीही झाले तरी, मी अभीप्सा आणि आत्मदान दृढ बाळगेन आणि हे घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.” व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण ह्या गोष्टी परिपूर्णतया एकदम होणे शक्य नाहीत; मानसिक व प्राणिक हालचाली आड येत राहतात; पण जर व्यक्ती वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये विकसित होत राहतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 70-71)

मानसिक परिपूर्णत्व – ११

 

समर्पणाची प्रक्रिया म्हणजेच एक तपस्या आहे. इतकेच नव्हे तर, वास्तविक ती तपस्येची दुहेरी प्रक्रिया आहे; समर्पणाची प्रक्रिया आधीपासून चांगल्या रीतीने सुरु झालेली असतानाही, चढतेवाढते समर्पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. नंतर मग एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्तीला ईश्वरी अस्तित्व आणि ईश्वरी शक्ती सातत्याने आणि अधिकाधिक रीतीने जाणवू लागते; तीच सारे काही करत आहे असे अधिकाधिक जाणवू लागते आणि त्यामुळे अगदी अतिशय अवघड अडचणीसुद्धा ह्या जाणिवेला धक्का पोहोचवू शकत नाहीत. आणि वैयक्तिक प्रयत्नांची आता आवश्यकता उरत नाही आणि ते शक्यही होत नाहीत. प्रकृतीचे ईश्वराच्या हाती पूर्ण समर्पण झाल्याची ही खूण असते. काही जण असेही असतात की, जे हा अनुभव येण्याच्या आधीच श्रद्धेच्या आधारे ही भूमिका घेतात. आणि जर व्यक्तीची भक्ती आणि श्रद्धा खूप बळकट असेल तर, या गोष्टी त्या अनुभवाप्रत व्यक्तीला घेऊन जातात. परंतु सर्वच जण अगदी सुरुवातीपासून अशी भूमिका घेऊ शकत नाहीत आणि कधीकधी तर हे धोकादायकसुद्धा ठरू शकते; कारण ईश्वर आहे असे समजून, त्यांनी स्वतःला एखाद्या चुकीच्या शक्तीच्या हाती, सोपवून देण्याची शक्यता असते. पण बहुतेकांच्या बाबतीत तरी, त्यांनी तपस्येच्या माध्यमातूनच समर्पणामध्ये वृद्धिंगत होणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82)

मानसिक परिपूर्णत्व – १०

 

देवावर श्रद्धा, विश्वास, ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान आणि समर्पण या आवश्यक आणि अनिवार्य गोष्टी आहेत. पण देवावरील विश्वास हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांप्रत शरणागती, दुर्बलता, निरुत्साह यांचा बहाणा बनता कामा नये. दिव्य सत्याच्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार दिला पाहिजे; तो नकार आणि अथक अभीप्सा यांच्या समवेत त्या विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे. ईश्वराप्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांना, कनिष्ठ हालचालींना शरण जाण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराला शरण जाण्याचे किंवा ईश्वराचे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींना शरण जाण्याचे एक कारण, एक बुरखा, एक निमित्त बनता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 87)

मानसिक परिपूर्णत्व – ०९

 

दोन शक्यता असतात. एक म्हणजे वैयक्तिक प्रयत्नांच्या दवारे शुद्धीकरण, पण याला बराच कालावधी लागतो. दुसरी शक्यता म्हणजे ईश्वरी कृपेने त्यामध्ये थेट हात घालणे, ही कृती सहसा अधिक जलद असते. या दुसऱ्या गोष्टीसाठी संपूर्ण समर्पण, आत्मदान यांची आवश्यकता असते. आणि त्यासाठी पुन्हा कशाची आवश्यकता असते तर ती म्हणजे, ईश्वरी शक्तीस कार्य करू देईल इतपत, बऱ्यापैकी शांत राहू शकेल अशा मनाची ! प्रत्येक पावलागणिक संपूर्ण एकनिष्ठ राहून, ईश्वरी शक्तीकार्यास साहाय्यकारी ठरेल असे मन असले पाहिजे, अन्यथा त्याने किमान स्थिर व शांत तरी राहिले पाहिजे. रामकृष्णांनी ज्या मांजरीच्या पिल्लासारख्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला होता, त्या दृष्टिकोनाशी मिळतीजुळती अशी ही दुसरी अवस्था असते. ज्या व्यक्तींना, त्या जे काही करत असतात त्यामध्ये विचार आणि इच्छेच्या द्वारे खूप गतिशील हालचालींची सवय झालेली असते अशा व्यक्तींना या गतिविधी स्थिर करणे आणि मानसिक आत्मदानाची शांतता आत्मसात करणे अवघड जाते. त्यांना योगसाधना करता येणार नाही किंवा ते आत्मदानापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असा याचा अर्थ नाही; मात्र शुद्धीकरण आणि आत्मदान पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांना अधिक कालावधी लागतो; तेव्हा अशा व्यक्तींकडे धीर, स्थिर प्रयत्नसातत्य आणि सर्व गोष्टींच्या पार जाण्याचा निश्चय हवा, असा याचा अर्थ होय.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 83)

मानसिक परिपूर्णत्व – ०८

 

दिव्य शक्तीने सर्वाचा स्वीकार करावा आणि त्यात परिवर्तन घडवून आणावे म्हणून, तुमचे म्हणून जे काही आहे ते सर्व आणि तुम्ही स्वतः यांना, ईश्वराला समर्पित करणे म्हणजे आत्मसमर्पण.

*

स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह न धरता, सर्वत्र त्यांची जागा ईश्वरी सत्याला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या इच्छेद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे घेता यावी म्हणून सहमती देणे म्हणजे समर्पण. स्वतःमध्ये जे काही आहे ते ईश्वराप्रत निवेदित करणे, व्यक्तीने ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे काही आहे ते ईश्वराप्रत अर्पण करणे, म्हणजे समर्पण !

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)

मानसिक परिपूर्णत्व – ०७

 

ईश्वराप्रत केलेले आत्मदान म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सारे ईश्वराला देऊ करणे; काहीही स्वत:चे नाही असे समजणे; इतर कोणतीही आज्ञा न पाळता, केवळ ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नाही तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.
*
जे हातचे काहीही राखून न ठेवता, स्वतःच्या सर्व अंगांनिशी ईश्वराप्रत स्वतःला देऊ करतात, त्यांना ईश्वर स्वतःलाच देऊन बसतो. आणि मग त्यांना स्थिरता, प्रकाश, शक्तिसामर्थ्य, आनंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता, आनंदसागर या गोष्टी प्राप्त होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)