‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०३

शिष्यवृत्ती मिळवून अरविंद घोष इ. स. १८९० मध्ये केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले. तेथे त्यांनी दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यांचे वडील त्यांना भारतामधून वर्तमानपत्रे पाठवत असत. इंग्रजांनी भारतीयांना दिलेल्या वाईट वागणुकीची उदाहरणे असलेली कात्रणे खुणा करून ते पाठवून देत आणि भारतातील ब्रिटिश शासन हे कसे निर्दयी व हृदयशून्य शासन आहे असे दोषारोप करणारी पत्रेदेखील ते पाठवत असत. काही खळबळजनक आणि महान क्रांतिकारी बदल घडून येतील असा काळ जगाच्या इतिहासात येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही भूमिका पार पाडावी लागणार आहे अशी स्पष्ट जाणीव अरविंदांना वयाच्या अकराव्या वर्षीच झाली होती. आता त्यांचे लक्ष भारताकडे ओढले गेले आणि त्यांची ती संवेदना मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवाहित झाली. पण हा ‘ठाम निश्चय’ पूर्णत्वाला जाण्यासाठी मात्र पुढची चार वर्षे जावी लागली. ते केंब्रिजला गेले आणि तिथे ‘इंडियन मजलिस’ या संघटनेचे सदस्य आणि काही काळ सचिव झाले. तेव्हा त्यांनी क्रांतिकारक स्वरूपाची भाषणे दिली होती.

लंडनमधील काही भारतीय विद्यार्थ्यांनी एक गुप्त संघटना स्थापन केली होती, त्या संघटनेचे नाव ‘Lotus and Dagger’ असे होते. त्या संघटनेमध्ये प्रत्येक सदस्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याची आणि त्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काहीतरी विशेष काम पुढे नेण्याची शपथ घेत असे. अरविंदांनी या संघटनेची स्थापना केली नव्हती पण त्यांच्या भावंडांसहित ते या संघटनेचे सदस्य मात्र झाले होते. पण ती संघटना जन्मत:च मृतवत् झाली. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता.

इ. स. १८९० मध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या खुल्या स्पर्धेत अरविंद घोष उत्तीर्ण झाले पण पुढील दोन वर्षांच्या कालावधीत घोडेस्वारीच्या परीक्षेस ते बसले नाहीत आणि त्यामुळे त्या सेवेसाठी ते बाद ठरले.

अरविंद घोष स्वत:च्या विद्यार्थी-जीवनाविषयीची आठवण सांगताना म्हणतात की, ”मी कादंबऱ्या व कविता वाचत असे. मी फक्त परीक्षेच्या आधी काही काळ थोडा अभ्यास करीत असे. कधीही वेळ मिळाला की मी ग्रीक आणि लॅटिन पद्य लिहीत असे. पुढे जेव्हा मी शिष्यवृत्तीसाठी, केंब्रिजला किंग्ज कॉलेजमध्ये गेलो तेव्हा तेथे मि. ऑस्कर ब्राऊनिंग ह्यांनी माझे पेपर्स पाहिले आणि ‘असे इतके चांगले पेपर्स यापूर्वी मी कधीच पाहिले नव्हते’ असा शेरा त्यांनी दिला.” (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०२

इंग्लंड येथे चौदा वर्षे अरविंद घोष यांचे वास्तव्य होते. इ. स. १८८४ मध्ये लंडन येथील सेंट पॉल शाळेमध्ये ते शिकू लागले. अरविंदांनी मँचेस्टर आणि सेंट पॉल येथे असताना अभिजात साहित्य अभ्यासण्याकडे लक्ष पुरविले. अभ्यासाव्यतिरिक्तचा उरलेला सगळा वेळ ते अवांतर वाचन, विशेषत: इंग्लिश काव्य, साहित्य आणि कथाकादंबरी, फ्रेंच साहित्य आणि युरोपातील प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास अशा वाचनात व्यतीत करत असत. काही थोडा वेळ ते इटालियन, जर्मन आणि थोडेफार स्पॅनिश शिकण्यासाठी देत असत. ते बराचसा वेळ काव्यलेखनामध्ये व्यतीत करत असत. शाळेच्या अभ्यासामध्ये त्यांना गती असल्याने, त्यावर फार कष्ट करायला हवेत असे अरविंदांना वाटत नसे, त्यामुळे शालेय अभ्यासासाठी त्यांना फारच थोडा वेळ खर्च करावा लागत असे. किंग्ज कॉलेजमध्ये असताना तर त्यांनी ग्रीक आणि लॅटिन काव्यासाठी असलेली सर्व पारितोषिके पटकाविली होती. त्यांचे ग्रीक, लॅटिन आणि इंग्लिश व फ्रेंच भाषांवर प्रभुत्व होते तसेच जर्मन आणि इटालियन या भाषांसारख्या इतर युरोपीय भाषादेखील त्यांना अवगत होत्या. (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०१

अरविंद घोष यांचा जन्म दि. १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रचंड क्षमता असलेले अरविंद घोष यांचे वडील श्री. कृष्णधन घोष हे, शिक्षणासाठी सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये जाणाऱ्या काही लोकांपैकी एक होते. श्री. कृष्णधन घोष भारतात परतले तेव्हा सवयी, कल्पना आणि आदर्श यांबाबत ते पूर्णपणे इंग्रजाळलेले होते. त्यांच्यावर इंग्रजांचा एवढा प्रभाव पडला होता की, आपल्या मुलांना पूर्णपणे युरोपियन पद्धतीनेच वाढवायचे हा जणू श्री. कृष्णधन घोष यांनी पणच केला होता.

घोष कुटुंबीय भारतात रहात होते तेव्हा अरविंदांना दार्जिलिंगमधील आयरीश ननच्या शाळेत शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. १८७९ साली श्री. कृष्णधन घोष यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना इंग्लंडला नेले आणि तेथे एका इंग्लिश धर्मोपदेशकाकडे व त्याच्या पत्नीकडे त्यांना सोपविले. त्या तिघांवर कोणतेही भारतीय संस्कार होऊ नयेत वा त्यांचा भारतीयांशी कोणताही परिचय होऊ नये अशी खबरदारी त्यांनी घ्यावी अशा सक्त सूचना त्या पती-पत्नीला देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले. त्यामुळे अरविंद लहान असताना भारत, भारतातील लोक, भारतीयांचा धर्म, भारतीयांची संस्कृती या साऱ्यांविषयी पूर्णपणे अनभिज्ञच राहिले होते. (क्रमश: …)