‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

बडोदा संस्थानामध्ये असलेल्या अरविंद घोष यांच्या विशेष हुद्द्यामुळे त्यांना जाहीररित्या कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होता येणे शक्य नव्हते त्यामुळे, शेवटचा काही काळ ते सुट्टीवर राहून, पडद्याआडून राजकीय हालचालींमध्ये सक्रिय राहिले. इ. स. १९०५ साली मात्र वंगभंगामुळे उसळलेल्या जनक्षोभ आंदोलनामुळे त्यांना बडोदा येथील सेवेतून मुक्त होण्याची संधी मिळाली आणि तेव्हा त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. याच वर्षी बंगालची फाळणी झाली आणि त्यानंतर जी एक बंडाची धुमाळी उडाली त्यामध्ये, जहाल पक्षाच्या उदयाला आणि महान राष्ट्रीय चळवळीला चालना मिळाली. तेव्हा अरविंद घोषांचे सर्व कृतिकार्यक्रम अधिकाधिकपणे त्या दिशेने वळू लागले.

बारीन्द्र यांच्या (अरविंदांचे धाकटे बंधू) सूचनेनुसार, अरविंदांनी ‘युगांतर’ नावाचे एक वृत्तपत्र प्रकाशित करावयास संमती दिली; ह्या वृत्तपत्रातून ब्रिटिश सत्तेचा पूर्ण निषेध आणि उघड विद्रोह याची शिकवण दिली जात असे. त्या वृत्तपत्रामध्ये ‘गनिमी कावा’ या युद्धपद्धतीविषयी पद्धतशीर प्रशिक्षण देणारी लेखमालिका चालविली जात होती. या वृत्तपत्राच्या प्रारंभिक अंकांमधून अरविंदांनी स्वत: सुरुवातीचे काही लेख लिहिले होते आणि कायमच त्या वृत्तपत्रावर त्यांचे सर्वसाधारणपणे नियंत्रण असे. स्वत: सादर केलेल्या प्रस्तावासाठी, संपादकीय विभागातील एक सदस्य, स्वामी विवेकानंदांचे बंधू, वृत्तपत्राच्या मुख्य संपादकांच्या शोधात आलेल्या पोलिसांना आपणहून शरण गेले होते आणि जेव्हा त्यांच्यावर खटला चालविण्यात आला होता तेव्हा, अरविंदांच्या आदेशानुसार ‘युगांतर’ने, ‘आम्ही विदेशी शासन ओळखत नाही’ या कारणास्तव, ब्रिटिश न्यायासनासमोर स्वत:ची बाजू मांडण्यास नकार दिला होता. आणि त्यामुळे या वृत्तपत्राची प्रतिष्ठा आणि प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढीस लागला. बंगालमधील तीन युवा लेखक या वृत्तपत्राचे मुख्य लेखक व संचालक होते; एकाएकी या वृत्तपत्राचा बंगाल प्रांतामध्ये प्रभाव वाढला. इ. स. १९०६ मध्ये अरविंद घोष यांनी बडोदा सोडले आणि नव्याने स्थापन झालेल्या ‘बंगाल नॅशनल कॉलेज’च्या प्राचार्यपदी रूजू होण्यासाठी ते कलकत्त्याला गेले.

बंगाल नॅशनल कॉलेजच्या स्थापनेमुळे अरविंदांना आवश्यक असलेली संधी चालून आली आणि त्यामुळे बडोदा संस्थानमधील नोकरीचा राजीनामा देऊन ते या नवीन कॉलेजचे प्राचार्य म्हणून रुजू होऊ शकले. अरविंदांच्या गुप्त कार्यामधील त्यांचे सहकारी आणि नंतरच्या काळातदेखील काँग्रेसप्रणीत राजकारणामध्ये त्यांचे सहकारी असणारे श्री. सुबोध मलिक; यांनी या कॉलेजच्या स्थापनेसाठी एक लाख रूपये देऊ केले आणि अरविंदांना या कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर दरमहा १५० रू. पगारावर नेमण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली; अशा प्रकारे देशकार्याच्या सेवेमध्ये पूर्ण वेळ देण्यासाठी अरविंद घोष आता पूर्णपणे मोकळे झाले. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(अरविंद घोष यांनी पत्नी मृणालिनीदेवी यांना लिहिलेले पत्र – दि. ३० ऑगस्ट १९०५)

वेडेपणाच्या वाटतील अशा तीन गोष्टी माझ्या मनात आहेत. त्यापैकी पहिले वेड म्हणजे, माझा असा दृढ विश्वास आहे की जे गुण, जी प्रतिभा, जे उच्च शिक्षण, जी विद्या व जे धन देवाने मला दिले आहे, ते सगळे त्याचे आहे. कुटुंब पोषणासाठी जेवढे लागेल व अत्यंत जरुर असेल, तेवढेच स्वत:साठी खर्चण्याचा मला अधिकार आहे. बाकी उरेल ते सगळे ईश्वराला परत करणे उचित आहे. मी जर सगळे काही माझ्या स्वत:करता, माझ्या सुखाकरता व चैनीखातर खर्च केले तर मी चोर ठरेन.

…ईश्वराला धन अर्पण करणे म्हणजे तरी काय? तर त्याचा अर्थ चांगल्या कामासाठी खर्च करणे. ह्या कठीण काळात सबंध देश माझ्या दाराशी आश्रय मागत आहे. माझे तीस कोटी बहिणभाऊ ह्या देशात आहेत. त्यांच्यातले बरेचसे भुकेने मरत आहेत. त्याहून अधिक लोक दुःख, कष्ट यांनी जर्जर होऊन कसेतरी प्राण धरून आहेत. त्यांनासुद्धा मदत करायला पाहिजे. याबाबतीत, तू माझी सहधर्मिणी होशील का?

माझ्या दुसऱ्या वेडाने मला नुकतेच पछाडले आहे. ते म्हणजे, मला देवाची साक्षात अनुभूती आली पाहिजे. …ईश्वर जर असेल तर त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याचा, त्याचे साक्षात दर्शन घेण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे. मग तो कितीही कठीण असला तरी त्या मार्गाने जाण्याचे मी ठरवून टाकले आहे. हिंदुधर्म सांगतो की तो मार्ग आपल्याच शरीरामध्ये आहे. आपल्याच मनामध्ये आहे. त्या मार्गाने जाण्याचे नियमही धर्माने घालून दिले आहेत. त्या नियमाचे पालन करण्याचा आरंभ मी केला आहे. एका महिन्याच्या अनुभवावरून मला असे दिसून आले आहे की, हिंदुधर्म सांगतो ते काही खोटे नाही. त्याने सांगितलेल्या सगळ्या खाणाखुणा माझ्या अनुभवास आल्या आहेत. आता तुलाही मी त्या मार्गाने घेऊन जाऊ इच्छितो….

माझे तिसरे वेड असे आहे की, काही लोक स्वदेशाला कुरणे, शेते, जंगले, डोंगर, नद्या असलेला एक जड भू-भाग समजतात. पण मी स्वदेशाला माता समजतो, तिची भक्ती करतो, पूजा करतो. आईच्या छातीवर बसून एखादा राक्षस तिचे रक्त पिण्यास उद्युक्त झाला तर तिचा मुलगा काय करेल? आरामात खातपीत बसेल, आपल्या बायकामुलांमध्ये रमेल, की आपल्या आईस सोडविण्यासाठी धावून जाईल?

या पतित राष्ट्राचा उद्धार करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे मी जाणून आहे. पण ते सामर्थ्य म्हणजे शारीरिक बळ नव्हे (तलवार वा बंदुकीने मी युद्ध करणार नाही.) माझे बळ आहे ज्ञानबळ. क्षात्रतेज हेच एक तेज असते असे नाही, तर ब्राह्मतेजही आहे व ते ज्ञानतेजावर अधिष्ठित आहे. ही माझी भावना काही नवीन किंवा आजकालची नाही. ती घेऊनच मी जन्माला आलो आहे. ती माझ्या हाडीमासी भिनलेली आहे. हे महान कार्य करायला देवाने मला पृथ्वीवर पाठविले आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी या भावनेचे बीज माझ्यामध्ये अंकुरित होऊ लागले. वयाच्या अठराव्या वर्षी त्या बीजाची मूळं घट्ट आणि पक्की झाली…

आता मी तुला विचारतो की, तू या बाबतीत काय करणार आहेस? ….एक सोपा उपाय आहे. ईश्वराला शरण जा. ईश्वर-साक्षात्काराच्या मार्गामध्ये प्रवेश कर. देव तुझ्यातील उणिवा भरून काढील. जी व्यक्ती ईश्वराचा आसरा घेते त्या व्यक्तीपासून भीती हळूहळू दूर जाते.

….पत्नी ही पतीची शक्ती असते. याचा अर्थ हा की, पत्नीच्या ठायी पती स्वत:चे प्रतिबिंब पाहतो व स्वत:च्याच उच्च आकांक्षांचा प्रतिध्वनी तिच्यापासून निघालेला ऐकून दुप्पट शक्ती प्राप्त करून घेतो.

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(बडोद्यात राहत असताना आपल्याला आलेल्या आध्यात्मिक अनुभवांविषयी व त्यांनी केलेल्या साधनेविषयी उत्तरायुष्यात एके ठिकाणी श्रीअरविंद सांगत आहेत…)

मी बडोद्यात राहत असताना, दिवसभरात सकाळी तीन तास आणि संध्याकाळी दोन तास असा साधारणपणे पाच तास प्राणायामाचा अभ्यास करीत असे. माझे मन महान अशा प्रकाश आणि शक्तीने कार्य करू लागले आहे असे मला आढळून आले. त्या काळात मी काव्यलेखन करीत असे. प्राणायामाच्या अभ्यासापूर्वी, मी दिवसाकाठी साधारणपणे पाच ते आठ ओळी, म्हणजे महिन्याभरात साधारण दोनशे ओळी लिहित असे; प्राणायामाच्या अभ्यासानंतर मात्र मी अर्ध्या तासात दोनशे ओळी लिहू शकत असे. केवळ हा एकच परिणाम झाला असे नाही. आधी माझी स्मरणशक्ती कमी होती. पण या अभ्यासानंतर मला असे आढळून आले की, जेव्हा मला स्फूर्ती येत असे तेव्हा मला सर्व ओळी क्रमाने आठवत असत आणि मी त्या कधीही क्रमाने लिहून काढू शकत असे. या प्रगत अशा कार्यांबरोबरच मी माझ्या मेंदूच्या सभोवार चालणाऱ्या विद्युतप्रभावित हालचाली पाहू शकत असे, आणि त्या सर्व गोष्टी सूक्ष्म द्रव्याने बनलेल्या आहेत व हे सर्व सूक्ष्म द्रव्याचेच कार्य आहे हे मला जाणवत असे.

याच काळात अरविंदांचा भारतीय संस्कृती, साहित्य यांचा अभ्यास सुरु होता, त्या काळात ते प्रचंड वाचन करत असत. त्यासंबंधीची एक हकिकत त्यांच्या एका मित्राने सांगितली आहे – “एकदा अरविंद कॉलेजमधून परतले आणि आल्या आल्या लगेच तेथे पडलेले एक पुस्तक उघडून त्यांनी ते वाचायला सुरुवात केली. तेव्हा तेथे आम्ही सर्व मित्र बुद्धिबळाचा डाव मांडून जोरजोराने हसतखिदळत बसलो होतो. सुमारे अर्ध्या तासाने अरविंदांनी पुस्तक वाचून संपविले. आम्ही त्यांना असे करताना बरेचदा बघितले होते. ते पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचून काढतात की केवळ वरवर चाळतात हे आम्हाला बरेच दिवसांपासून जाणून घ्यायचे होते. आता ती कसोटी घेण्याची वेळ आली. आमच्यातील एकाने पुस्तकातील एक ओळ वाचून दाखविली आणि नंतर त्यापुढची ओळ कोणती असे अरविंदांना विचारले. त्यांनी क्षणभर मन एकाग्र केले आणि नंतर ती ओळ ज्या पानावर होती त्या पानावरील संपूर्ण मजकूर, एकही चूक न करता जसाच्या तसा म्हणून दाखविला. जर ते अशा प्रकारे अर्ध्या तासात शंभरेक पाने वाचू शकत असतील तर त्यांनी अल्पावधीतच त्या पेटाऱ्यातील सगळी पुस्तके वाचून संपवली यात नवल ते काय?”

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

इ. स. १९०३ मध्ये कामाचा भाग म्हणून अरविंद घोष बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत काश्मीर दौऱ्यावर गेले होते. तेव्हा श्री शंकराचार्य मंदिराच्या टेकडीवर अरविंदांना अद्वैताचा साक्षात्कार झाला. त्यांचा तो अनुभव पुढे कवितारूपाने अभिव्यक्त झाला. तो असा –

जिथे शंकराचार्यांचे छोटेसे मंदिर उभे आहे त्या,
तख्त-ए-सुलेमानच्या राजमार्गावरून मी चालत होतो.
पृथ्वीचा व्यर्थ प्रणय संपुष्टात आणणाऱ्या
एका उघड्यावागड्या कड्यावरून,
काळाच्या कड्यावरून, मी एकाकीपणे
अनंततेला सामोरा जात होतो.

माझ्या सभोवताली निराकार एकांत पसरलेला होता.
अपरिमित उत्तुंग आणि अथांग
विश्व-नग्न अजन्मा एकमेव अशी ‘वास्तविकता’
येथे चिर-स्थिर झाली होती.
सारे काही एक अनोखे ‘अनामिक’ बनले होते.

‘मौन’ हाच त्या ‘सद्वस्तु’चा एकमेव शब्द होता,
आरंभ अज्ञात होता आणि अंत निःशब्द होता.
क्षणिक पाहिलेल्या वा ऐकलेल्या साऱ्या गोष्टींचा निरास करत,
‘निसर्ग’ रहस्यांच्या मूक शिखरावर
एकाकी ‘प्रशांत’ आणि शून्य अविकारी ‘शांती’ची
सत्ता पसरलेली होती.

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, मृणालिनीदेवी यांच्याशी झाला. परदेशगमन करून आलेल्या अरविंदांचे, तत्कालीन प्रथेनुसार शुद्धीकरण करण्याचा प्रसंग समोर उभा ठाकला, प्रागतिक विचारसरणीच्या अरविंदांनी त्याला साफ नकार दिला. कलकत्ता येथे संपन्न झालेल्या या विवाहप्रसंगी सर जगदीशचंद्र बोस सपत्निक उपस्थित होते. अरविंद घोष तेव्हा २९ वर्षांचे होते.

अरविंद हे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या सचिवालयात कार्यरत होते. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत.

कालांतराने अरविंदांनी सर्व तऱ्हेच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधून स्वत:ला बाजूला केले आणि ते गुप्तपणाने राजकीय कार्यात इ. स. १९०५ पर्यंत कार्यरत राहिले. परंतु क्रांतिकारक पक्षाचा संभाव्य नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल अशा टिळकांशी त्यांनी संपर्क साधला आणि अहमदाबाद काँग्रेस परिषदेमध्ये (इ. स. १९०२) ते लोकमान्य टिळकांना भेटले. टिळकांनी त्यांना मंडपाच्या बाहेर नेले आणि तेथील मैदानावरच त्यांनी, महाराष्ट्रामध्ये त्यांना अभिप्रेत असलेली कार्यपद्धती कोणती त्याविषयी अरविंदांशी एक तासभर चर्चा केली. असे करत असताना, सुधारणावादी वा उदारमतवादी चळवळीविषयीचा तिरस्कारही टिळकांच्या शब्दांमधून अभिव्यक्त होत राहिला. (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०८

इंग्लंडमध्ये असतानाच अरविंद घोष यांनी त्यांचे आयुष्य देशसेवेसाठी आणि त्याच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वाहून घेण्याचे ठरविले होते. भारतात आल्याबरोबर, राष्ट्राला भविष्याबद्दलच्या कल्पनांविषयी जागृत करावे या हेतूने केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी लगेचच दैनिकामधून राजकीय विषयांवर निनावी पद्धतीने लिखाण करायला सुरुवात केली.

भारतात आल्यानंतर अरविंदांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. काही काळातच त्यांनी मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘इंदुप्रकाश’ या वृत्तपत्रामध्ये ‘New lamps for old’ ही लेखमाला चालविली. त्या लेखमालेमधून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. त्यामध्ये तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या विनंती, अर्जविनवण्या आणि विरोध या धोरणावर कडाडून टिका करण्यात आली होती आणि स्वयंसहाय्यतेवर आणि निर्भयतेवर आधारित कृतिशील नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये, इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेषतः इंग्रज सरकारचे…

याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी तत्कालीन संपादक श्री. के. जी. देशपांडे यांच्या मार्फत असे जहाल लिखाण लिहू नये, असा निरोप अरविंदाना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका न्या. रानडे यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, अरविंदांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली. (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०७

बडोद्यामध्ये आल्यानंतरही अरविंद घोषांवर काही काळ पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव टिकून होता. मुंबई व कलकत्त्याहून मागविलेल्या पेट्यांमधील पुस्तके ते वाचत असत. अरविंदांना बंगाली शिकविणारे शिक्षक सांगतात, “अरविंद त्यांच्या टेबलाजवळ बसून तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात, डासांचे असह्य दंश रात्रभर सोसत, अगदी सकाळ होईपर्यंत वाचत बसत असत. ध्यानावस्थेत मग्न असलेल्या योग्याला जसे आजूबाजूच्या घटनांचे काही भान नसते त्याप्रमाणे, पुस्तकावर डोळे खिळलेल्या अशा स्थितीत तास न् तास बसून त्यांचे वाचन चालत असे. आगीने घर वेढले गेले असते तरीही त्यांची एकाग्रता भंग पावली नसती.”

इंग्रजी, रशियन, जर्मन, फ्रेंच भाषेतील कादंबऱ्या ते वाचत असत. त्याचबरोबर ते भारतातील धर्मग्रंथांचे, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचे वाचन करत असत.

अरविंदांच्या निकटवर्तीयांपैकी एकाने सांगितलेली अजून एक आठवण –

मी अरविंद घोषांची अजून एक गोष्ट पाहिली ती म्हणजे, त्यांना पैशाबद्दल आसक्ती नव्हती. त्यांना एका पिशवीमध्ये तीन महिन्यांचा पगार एकत्रितपणे मिळत असे, तो पगार टेबलावर असलेल्या एका ट्रे मध्ये ते रिकामा करत असत. पैसे कडीकुलुपामध्ये, तिजोरीमध्ये बंदिस्त करून ठेवणे त्यांना मानवत नसे. होणाऱ्या खर्चाचा ते कधीही हिशोब मांडत नसत. एकदा असेच मी सहज त्यांना विचारले की “तुम्ही पैसे असे का ठेवता?” ते हसले आणि म्हणाले, “आपण चांगल्या आणि प्रामाणिक लोकांमध्ये राहत आहोत याची ही खूणच नाही का?’ त्यावर मी त्यांना विचारले, “पण तुमच्या भोवतीच्या या लोकांचा प्रामाणिकपणा पारखण्यासाठी तरी तुम्ही त्या पैशाचा हिशोब कुठे ठेवता?” तेव्हा गंभीर चेहऱ्याने ते म्हणाले, “तो ईश्वरच माझा जमाखर्च सांभाळतो. मला जेवढे आवश्यक आहे तेवढे तो मला देतो आणि उरलेले स्वत:कडेच ठेवतो. तो मला काही कमी पडू देत नाही, मग मी कशाला काळजी करू?” (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०६

अरविंद घोष इ. स. १८९३ ते १९०६ या तेरा वर्षांच्या कालखंडामध्ये बडोदा संस्थानच्या सेवेत होते. सुरुवातीला ते महसूल खात्यात व महाराजांच्या सचिवालयात काम करत असत. नंतर ते इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि शेवटी बडोदा कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते.

अरविंदांच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल एका विद्यार्थ्याने सांगितलेली एक आठवण –

“इंटरमिजिएटच्या वर्गामध्ये श्री. घोष सरांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. पुस्तकातील आशयाशी विद्यार्थ्यांची ओळख व्हावी म्हणून सुरुवातीला ते त्या विषयासंबंधी प्रास्ताविकपर व्याख्याने देत. आणि नंतर पुस्तक वाचत, मध्येच थांबून जिथे आवश्यक आहे तेथे अवघड शब्दांचे, वाक्यांचे अर्थ सांगून स्पष्टीकरण देत असत. आणि परत शेवटी त्या पुस्तकातील आशयासंबंधी साररूपाने काही व्याख्याने देत असत.

पण वर्गातील या व्याख्यानांपेक्षा, त्यांची व्यासपीठावरील भाषणे ही आम्हासाठी एक पर्वणी असायची. कॉलेजच्या वादविवाद मंडळाचे अध्यक्ष या नात्याने ते कधीकधी सभांना उपस्थित राहत असत. जेव्हा ते स्वत: भाषण करायचे तेव्हा कॉलेजमधील सेंट्रल हॉल श्रोत्यांनी भरून जात असे. ते भाषणपटू नसले तरी उच्च दर्जाचे वक्ते होते, लोक खूप लक्षपूर्वक त्यांचे भाषण ऐकत असत. विद्यार्थ्यांसमोर सर कोणतेही हावभाव, हालचाली न करता उभे राहत. त्यांच्या वाणीतून शब्द एखाद्या झऱ्याप्रमाणे माधुर्याने, सहजतेने बाहेर पडत असत; लोक त्यांचे भाषण ऐकून मंत्रमुग्ध होत असत… पन्नास वर्ष उलटून गेली तरी आजही माझ्या कानांमध्ये त्यांची ती मंजुळ वाणी रुंजी घालत आहे.” (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०५

(पाँडिचेरीला एकदा श्रीअरविंद स्वत:विषयी, आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी पत्रातून एका साधकाला सांगत आहेत.)

भारतात परतल्यापासूनच, लौकिक किंवा पारलौकिक असा कोणताही भेद माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या योगामध्ये मी कधी केला नाही. मला वाटते, माणसांना ज्या गोष्टींमध्ये रस असतो, त्या साऱ्या गोष्टी बहुधा भौतिकातील असतात. आणि त्यातील बहुतेक गोष्टींचा माझ्या मानसिक क्षेत्रात प्रवेश झाला होता. उदाहरणार्थ, राजकारण. त्याचा तर माझ्या जीवनातच प्रवेश झाला होता. पण त्याच वेळी, मी मुंबईतील अपोलो बंदरावर, या भारताच्या भूमीवर जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून मला आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली; पण त्या अनुभवांची लौकिक जीवनाशी फारकत नव्हती तर त्यांचा या लौकिक जीवनाशी आंतरिक आणि जवळचा संबंध होता. भौतिक क्षेत्राला ‘अनंत’ व्यापून आहे आणि ‘अंतर्यामी’ असणारा ‘तो’ भौतिक वस्तुंमध्ये, देहांमध्ये वास्तव्यास आहे असे मला जाणवत असे. अगदी त्याच वेळी, ज्यांचा प्रभाव व परिणाम या भौतिक जगतावर घडून येतो अशा पातळ्यांवर, अशा पारलौकिक विश्वांमध्ये माझा स्वत:चा प्रवेश झालेला मला दिसत होता. त्यामुळे ‘अस्तित्वाची दोन टोकं आणि त्यामधील सर्व काही’ असे ज्याला मी संबोधतो त्यामध्ये मी कधीच परस्परविसंगत विरोध वा फारकत करू शकलो नाही. माझ्यासाठी सर्व काही ‘ब्रह्म’च होते आणि मला सर्वत्र ‘ईश्वर’च दिसत असे. पण जर कोणाला या लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल, आणि त्यात त्याला शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून, असे करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या परिघामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो असे मला आढळून आले. हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक आध्यात्मिक ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा मागोवा घेणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला काळिमा फासला जाईल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. वास्तव आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप, याविषयीचा माझातरी हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुसरण करणे याला मी ‘पूर्णयोग’ म्हणतो. (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०४

इंग्लंडमधील वास्तव्याच्या शेवटच्या वर्षी, अरविंद घोष आध्यात्मिक शोधाकडे वळले. ते प्रोटेस्टंट पंथाच्या धर्मोपदेशकाच्या कुटुंबात राहत असत. ते कधीही ख्रिश्चन बनले नाहीत, मात्र ख्रिस्तीधर्म हा असा एकच धर्म होता आणि बायबल हा असा एकच धर्मग्रंथ होता की ज्याच्याशी त्यांची लहानपणीच ओळख झाली होती; पण ज्या पद्धतीने त्यांची या साऱ्यांशी ओळख झाली त्यामुळे त्याकडे आकर्षित होण्याऐवजी त्यापासून ते अधिक दूरच गेले. त्यांचा काही थोडा काळ नास्तिक विचारांमध्ये गेला, पण लवकरच त्यांनी अज्ञेयवादी दृष्टिकोन स्वीकारला. आय.सी.एस.च्या त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून, अगदी त्रोटकपणे भारतातील ‘षड्दर्शने’ त्यांच्या वाचनात आली. त्यावेळी विशेषत: ‘अद्वैता’मधील ‘आत्म्या’च्या संकल्पनेकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. हे जीवन आणि हे विश्व यापलीकडे असणाऱ्या वास्तवासंबंधी काहीएक धागा येथे मिळू शकेल असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी ‘स्व’ काय आहे, ‘आत्मा’ काय आहे हे जाणून घेण्याचा, ती अमूर्त कल्पना स्वत:च्या जाणिवेमध्ये मूर्त स्वरूपात उतरविण्याचा, खूप तीव्र पण प्राथमिक मानसिक प्रयत्न करून पाहिला; ती सद्वस्तु ही ह्या भौतिक जगाच्या मागे आणि पलीकडे आहे अशा समजुतीने केलेला तो प्रयत्न होता – ती सद्वस्तु स्वत:च्या अंतर्यामी आणि सर्वांमध्ये, विश्वाच्या अंतर्यामी आहे असे तेव्हा त्यांच्या लक्षात आले नव्हते.

डिसेंबर १८९२ च्या सुमारास, बडोदानरेश श्री. सयाजीराव गायकवाड हे लंडनमध्ये होते, तेथे त्यांची अरविंदांशी भेट झाली. अरविंदांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली आणि तेथे रुजू होण्यासाठी अरविंदांनी दि. २ जानेवारी १८९३ रोजी इंग्लंडचा निरोप घेतला. (क्रमश: …)