‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
पाँडिचेरीला अज्ञातवासामध्ये निघून गेल्यानंतर अरविंद घोष यांच्या साधनेचे स्वरूप काय होते, ते साधनेच्या कोणत्या अवस्थेत होते इत्यादीसंबंधी त्यांचे स्वतःचे विचार जाणून घ्यायचे असतील तर त्यांनी त्यांच्या धाकट्या भावाला म्हणजे बारीन्द्रकुमार घोष यांना लिहिलेले पत्र उपयुक्त ठरते. हे मूळ पत्र खूप विस्तृत आहे, परंतु त्यातील अंशभाग येथे विचारात घेऊ.
पाँडिचेरी, ०७ एप्रिल १९२०
प्रिय बारीन,
सर्वप्रथम तुझ्या योगाविषयी सांगतो. तू तुझी योगसाधना माझ्या हाती सोपवू इच्छितोस. आणि मीसुद्धा ती स्वीकारण्यास तयार आहे. परंतु याचा वास्तविक अर्थ असा की, ती साधना त्या ईश्वराकडे सोपवायची असते की, जो ईश्वर तुला आणि मला उघडपणे वा गुप्तपणे, त्याच्या दिव्य ‘शक्ती’ने संचालित करत आहे. आणि याचा अपरिहार्य परिणाम असा असेल की, त्या ईश्वराने जो मार्ग मला दाखविला आहे त्या मार्गाचे तू देखील अनुसरण केले पाहिजेस, हे तुला ज्ञात असले पाहिजे. या मार्गाला मी ‘पूर्णयोग’ असे संबोधतो.
….मी ज्यापासून योगसाधनेला आरंभ केला, विष्णू भास्कर लेले यांनी मला जे काही दिले किंवा कारावासात असताना मी जे काही केले ते सारे म्हणजे योगमार्गाचा शोध घेणे होते; इकडे शोध, तिकडे शोध असे करत त्याच त्या वर्तुळात फिरणे होते; जुन्या आंशिक योगमार्गांना स्पर्श करायचा, त्याचा अंगीकार करायचा, ते पडताळून पाहायचे, त्यांचा अनुभव घ्यायचा, कमी-अधिक प्रमाणात त्यापैकी एकाचा अनुभव घ्यायचा आणि मग दुसऱ्या मार्गाचा शोध घ्यायला सुरुवात करायची, असे सारे ते होते. त्यानंतर मी जेव्हा पाँडिचेरीला आलो तेव्हा मात्र माझी ही अस्थिर अवस्था नाहीशी झाली. नंतर ‘जगद्गुरू’ने – जो आपल्या आतमध्ये असतो त्याने मला माझा मार्ग पूर्णपणे दाखविला. त्याने त्याच्या पूर्ण सिद्धान्ताचा, या योगाच्या अंगांच्या दहा चरणांचा निर्देश केला आहे. मी त्या अनुभूतीमध्ये विकसित व्हावे म्हणून तो गेली दहा वर्षे मला घडवत आहे; आणि माझ्यामध्ये तो विकास अजूनही पूर्णत्वाला गेलेला नाही. त्याला कदाचित अजून दोन वर्षे तरी लागतील.
….तूर्तास मी एवढेच सांगू शकतो की, पूर्ण ज्ञान, पूर्ण कर्म आणि पूर्ण भक्ती यांचे एकत्रीकरण करणे, त्यांचा समन्वय करणे आणि त्यांना मनोमय पातळीवरून ‘विज्ञाना’च्या अतिमानसिक पातळीवर उन्नत करून, त्यांना संपूर्ण पूर्णत्व प्रदान करणे, हे या योगाचे मूलभूत तत्त्व आहे. मन आणि तर्कबुद्धी आणि ‘आत्मा’ या गोष्टी ज्ञात असूनही, पूर्वीच्या योगपद्धती मानसिक स्तरावरील आध्यात्मिक अनुभवामध्येच समाधानी राहिल्या; हा जुन्या योगपद्धतींचा दोष होता.
परंतु मन हे तुकड्यातुकड्यानेच आकलन करून घेऊ शकते; ते अनंत, अखंड अशा तत्त्वाला समग्रतेने कवळू शकत नाही. त्या तत्त्वाचे आकलन करून घेण्याचा मनाचा मार्ग म्हणजे, समाधीच्या तुर्यावस्थेत निघून जाणे, मोक्ष-मुक्ती मिळविणे, किंवा निर्वाणामध्ये विलय पावणे किंवा तत्सम काही गोष्टी हा असतो. त्याच्यापाशी अन्य कोणताच मार्ग नसतो. या मार्गाने कोठेतरी कोणीतरी एखादाच खरोखरी ही अलक्षण मुक्ती मिळविण्यामध्ये यशस्वी होतो, पण त्याचा काय उपयोग? ‘चैतन्य’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ कायम आहेतच की! परंतु मनुष्याने या इथेच स्वत: मूर्तिमंत ईश्वर व्हावे, व्यक्तिगतरित्या आणि सामूहिकरित्याही त्याने ईश्वरच व्हावे, त्याने या जीवनामध्येच ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घ्यावा, अशी ‘ईश्वरा’ची अपेक्षा आहे.
…प्रथमतः व्यक्तीने मानसिक स्तरावरील सर्व प्रकारचे आंशिक अनुभव घेतले पाहिजेत, व्यक्तीचे मन आध्यात्मिक आनंदाने ओथंबून वाहिले पाहिजे आणि ते आध्यात्मिक प्रकाशाने उजळून निघाले पाहिजे, त्यानंतर मग व्यक्ती ऊर्ध्वगामी चढून जाते. जोपर्यंत व्यक्ती अशा रीतीने ऊर्ध्वगामी उन्नत होत नाही, ती जोपर्यंत अतिमानसिक स्तरावर चढून जात नाही, तोपर्यंत तिला विश्वाच्या अस्तित्वाचे परमरहस्य ज्ञात होणे कदापिही शक्य नाही; विश्वाचे कोडे उलगडणे शक्य नाही.
….शरीर, प्राण, मन आणि तर्कबुद्धी, ‘अतिमानस’ (Supermind) आणि ‘आनंदमय’ अस्तित्व हे आत्म्याचे पाच स्तर आहेत. जसजसे आपण वर वर जातो तसतशी मनुष्याच्या आध्यात्मिक उत्क्रांतीच्या सर्वोच्च पूर्णत्वाची स्थिती जवळजवळ येत जाते. आपण एकदा का ‘अतिमानसा’पर्यंत उन्नत झालो की मग ‘आनंदमया’मध्ये उन्नत होणे सुकर होते. या अवस्था अविभाज्य आहेत आणि मग अनंत ‘आनंद’ हा केवळ कालरहित ‘परम’ सद्वस्तु’मध्येच नव्हे तर अगदी शरीर, विश्व आणि जीवनामध्ये सुद्धा दृढपणे प्रस्थापित होतो. पूर्ण सत्, पूर्ण चित्, पूर्ण आनंद बहरून येतो आणि या जीवनामध्ये आकार धारण करतो. आणि हा प्रयास हाच माझ्या योगामार्गाचे मध्यवर्ती सूत्र आहे, मूलभूत संकल्पना आहे.
परंतु ही काही सोपी गोष्ट नाही. पंधरा वर्षांनंतर आत्ता कुठे मी ‘अतिमानसा’च्या स्तरांपैकी केवळ खालच्या तीन स्तरांपर्यंत उन्नत होत आहे आणि सारे कनिष्ठ व्यापार त्यामध्ये उन्नत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा ‘ईश्वर’ माझ्या माध्यमातून हे अतिमानसिक पूर्णत्व इतरांना अगदी विनासायास देऊ करेल, याविषयी माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. तेव्हा मग माझ्या खऱ्या कार्यास प्रारंभ होईल. (क्रमश:)