‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंद यांनी क्रिप्स यांच्या प्रस्तावाला संमती दिली होती कारण तो प्रस्ताव स्वीकारल्याने भारत आणि ब्रिटन यांना आसुरी शक्तींच्या विरोधात एकत्रितपणे उभे राहणे शक्य झाले असते आणि क्रिप्स यांची योजना स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणून उपयोगात आणता आली असती.

दि. ३१ मार्च १९४२ रोजी श्रीअरविंदांनी ब्रिटिश मुत्सद्याला पुढील संदेश पाठविला : मी तुमचे निवेदन ऐकले आहे. जरी मी आता राजकीय क्षेत्रात कार्यरत नसून आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलो, तरीसुद्धा, हा प्रस्ताव मांडण्यासाठी तुम्ही जे काही केले आहे त्याबद्दल एके काळचा एक राष्ट्रीय नेता आणि भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतला एक कार्यकर्ता या नात्याने, मी आपले अभिनंदन करू इच्छितो. भारताला त्याच्या स्वातंत्र्याबाबत आणि एकात्मतेबाबत, स्वतःसाठी काही ठरविण्याची आणि त्याला जे निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे त्याची सर्वार्थाने व्यवस्था लावण्याची आणि जगातील स्वतंत्र राष्ट्रांमध्ये स्वतःचे एक प्रभावशाली स्थान निर्माण करण्याची जी संधी देण्यात आली आहे तिचे मी स्वागत करतो. सारे मतभेद, सारे कलह बाजूला सारून, या योजनेचे स्वागत केले जाईल आणि त्याचा यथायोग्य उपयोग केला जाईल अशी मला आशा आहे. भारत आणि ब्रिटन यांमधील पूर्वीच्या संघर्षाची जागा मैत्रीपूर्ण संबंधांनी घेतली जाईल आणि ती एका महत्तर वैश्विक एकतेची पायरी असेल, ज्यामध्ये, भारत एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने, आपल्या आध्यात्मिक शक्ती साहाय्याने, समस्त मानवसमूहासाठी एक अधिक चांगले आणि आनंदी जीवन निर्माण करण्यासाठी योगदान देईल, अशीही मला आशा आहे. या भूमिकेतून, तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये काही मदत होणार असेल तर, मी जाहीरपणे माझा पाठिंबा देत आहे.

‘क्रिप्स’ योजना स्वीकारावी म्हणून श्रीअरविंद यांनी तत्कालीन काँग्रेस नेत्यांना तार पाठविली होती आणि त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचविण्यासाठी, वैयक्तिकरित्या एक दूत देखील पाठविला होता. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

क्रिप्स योजना नाकारली गेली आणि श्रीअरविंदांनी त्यांच्या परीने निष्काम कर्म करूनदेखील, आध्यात्मिक शक्तीचा उपयोग करून घेण्याच्या त्यांच्या मार्गाकडेच त्यांना पुन्हा वळणे आवश्यक ठरले होते. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांनी सुरुवातीला स्वतःला (दुसऱ्या) महायुद्धाशी सक्रियपणे जोडून घेतलेले नव्हते. पण हिटलर जेव्हा त्याच्या विरोधात असणाऱ्या सर्व शक्तींना चिरडून टाकणार आणि या जगावर नाझींचे वर्चस्व प्रस्थापित होणार, असे दिसू लागले तेव्हा मग, त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

त्यांनी जाहीरपणे मित्रराष्ट्रांची (चीन, रशिया, इंग्लंड व अमेरिका) (Allies) बाजू घेतली, निधी गोळा करण्यासाठी जे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी काही आर्थिक साहाय्यही देऊ केले होते तसेच सैन्यामध्ये प्रवेश करण्यासंबंधी किंवा युद्धासाठी जे प्रयत्न केले जात होते त्यामध्ये सहभागी होण्यासंबंधी त्यांचा सल्ला मागायला जी मंडळी त्यांच्याकडे येत असत त्यांना ते प्रोत्साहन देत असत.

येथे ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, श्रीअरविंदांनी जेव्हा जाहीरपणे मित्रराष्ट्रांची बाजू घेतली तेव्हा संपूर्ण भारत हा अगदी ठळकपणे विरोधी पक्षाला म्हणजे अक्ष (Axis) शक्तींना (जर्मनी, इटली, जपान) साहाय्य पुरविण्याच्या पक्षाचा होता. त्या काळी भारतीयांची ब्रिटिशविरोधी राष्ट्रीय भावना एवढी कडवी होती की, हिटलरचा प्रत्येक विजय हा आपला विजय आहे, असे त्यांना वाटत असे.

‘वंदे मातरम्’च्या दिवसांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी जी धारणा श्रीअरविंदांच्या मनात होती ती १९४२ सालीसुद्धा तशीच कायम होती; परंतु त्यामुळे नाझी आक्रमणाच्या खऱ्या स्वरूपाकडे कानाडोळा करण्याइतके ते अंध झाले नव्हते.

हिटलर आणि नाझी यांच्या पाठीशी काळोख्या आसुरी शक्ती आहेत हे त्यांना दिसले आणि त्यांचा विजय म्हणजे अनिष्ट शक्तींच्या सत्तेची मानववंशाला करावी लागणारी गुलामी आणि परिणामतः उत्क्रांतिक्रमाची परागती, विशेषतः मानववंशाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीला बसणारी खीळ! यातून केवळ युरोपच नाही तर आशियासुद्धा गुलामगिरीकडे ओढला गेला असता आणि भारताबाबत तर ही गुलामगिरी अधिकच भयावह ठरली असती, भारताने या पूर्वी कधीच अशी गुलामी अनुभवली नसेल अशी ती गुलामगिरी ठरली असती आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आजवर जे प्रयत्न झाले होते ते सगळे विफल ठरले असते.

श्रीअरविंदांच्या सेवेमध्ये असणारे श्री. ए. बी. पुराणी यांनी लिहून ठेवले आहे की, ”नाझीवादाच्या धोकादायक राजवटीपासून मानवतेला वाचविण्याच्या कार्यासाठी श्रीअरविंद स्वतःची ऊर्जा कशी पणाला लावत होते, हे पाहणे हा एक अनमोल अनुभव होता. कोणत्याही फलाच्या किंवा बक्षिसाच्या अपेक्षेविना, किंबहुना आपण काय करत आहोत याची यत्किंचितही कल्पना दुसऱ्यांना येऊ न देता, मानवतेसाठी ठोस कार्य कसे करता येते, याचा तो एक आदर्श वस्तुपाठ होता. श्रीअरविंद जणू ईश्वरच बनून, ईश्वर या जगाची काळजी कशी घेतो, आणि तो खाली उतरून, मानवासाठी कसे कार्य करतो, हे स्वतःच्या उदाहरणाने प्रत्यक्ष दाखवून देत होते.

श्रीअरविंदांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, – जे एकेकाळी, “केवळ अ-सहकार पुकारणारेच नव्हते तर ते ब्रिटिश साम्राज्यवादाचे कट्टर शत्रू होते,” असे – श्रीअरविंद आता, विन्स्टन चर्चिल यांच्या प्रकृतीसंबंधीचे वार्तापत्र कसे काळजीपूर्वक ऐकत असत आणि चर्चिल यांच्या तब्येतीची काळजी ते कसे वाहत असत, ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. ते ईश्वरी कार्य होते, ईश्वराने या जगासाठी केलेले ते कार्य होते.

युद्धाच्या बातम्या सातत्याने ऐकणे किंवा काही आर्थिक हातभार लावणे किंवा काही जाहीर विधाने करणे एवढ्यापुरताच श्रीअरविंदांचा सहभाग मर्यादित नव्हता. जेव्हा प्रत्येकजण इंग्लंडच्या तत्काळ पराभवाची आणि हिटलरच्या निश्चित विजयाची अपेक्षा बाळगून होते अशा वेळी, डंकर्कच्या क्षणापासून (मे १९४०) श्रीअरविंदांनी आपली आध्यात्मिक शक्ती आंतरिक रीतीने युद्धामध्ये लावली होती आणि तेव्हा त्यांना जर्मनीच्या वेगाने चाललेल्या विजयवारूला रोख लागल्याचे दिसून आले आणि युद्धाची लाट ही विरोधी दिशेने वळायला लागली असल्याचे दिसल्यावर त्यांना समाधान लाभले होते.

श्रीअरविंद त्यांची शक्ती त्यांच्या साधकांसाठी, त्यांचे आजारपण दूर करण्यासाठी, किंवा त्यांच्या साधनेमध्ये त्यांना साहाय्य करण्यासाठी बऱ्याच काळापासून उपयोगात आणत असत, हे आम्ही पाहिले आहे. परंतु आध्यात्मिक शक्तीची श्रेणी ही भौतिक अंतरावरून ठरविता येत नाही. श्रीअरविंद यांनी एकदा एका पत्रामध्ये लिहिले होते, ‘निश्चितच, माझी शक्ती ही केवळ आश्रम आणि आश्रमातील परिस्थिती एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. युद्धाची योग्य प्रगती होण्यासाठी आणि मानवी जगतामध्ये बदल घडून येण्यासाठी साहाय्य व्हावे यासाठी ती शक्ती मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जात आहे, हे तुम्हाला माहीत आहे.’ योगसाधनेव्यतिरिक्त आश्रमाच्या कक्षाच्या पलीकडे ती वैयक्तिक कारणासाठीसुद्धा उपयोगात येत असे पण अर्थातच हे सारे कार्य शांतपणे आणि आध्यात्मिक कृतीच्या द्वारे केले जात असे.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

आता येथील आश्रमीय जीवन म्हणजे साधकांची साधना, त्यांचे कर्म, आणि त्याहून अधिक म्हणजे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींची साधना या साऱ्या गोष्टी एका लयीमध्ये सुरू होत्या… अगदी २४ नोव्हेंबर १९३८ च्या दर्शनदिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत सारे काही सुरळीत चालू होते.

श्री. ए. बी. पुराणी (श्रीअरविंद यांचे निकटवर्ती अनुयायी) यांच्या शब्दांत सांगायचे तर, “दि. २४ च्या पहाटे, २.२० ते २.३० च्या दरम्यान श्रीमाताजींनी बेल वाजवली. मी जिन्यावरून धावतपळत वर जाऊन पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आले की, श्रीअरविंदांच्या पायाला अपघात झाला आहे आणि मी डॉक्टरांना बोलवावे. या अपघातामुळे त्यांच्या एकांतवासामध्ये बदल घडून आला आणि आता त्यांची देखभाल करणाऱ्या लोकांशी ते बोलू-भेटू लागले. येथे बारा वर्षांचा एक दीर्घ कालावधी सुरु झाला, ज्यामध्ये आंतरिक व बाह्य परिस्थितीनुसार कमीअधिक फरक करण्यात आला, आणि त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाशी सुद्धा थेट भौतिक संपर्क साधणे शक्य झाले.”

झालेल्या अपघातामुळे, २४ नोव्हेंबर आणि २१ फेब्रुवारी १९३९ ला त्यांचे दर्शन होऊ शकले नाही. साधकांच्या विनंतीला मान देत श्रीअरविंदांनी दि. २४ एप्रिल १९३९ ला विशेष दर्शन दिले, श्रीमाताजी १९२० साली जेव्हा पाँडिचेरीला कायमच्या वास्तव्यास आल्या तो हा दिवस होता. तेव्हापासून हा दिवस ‘दर्शनदिन’ म्हणून संबोधण्यात येऊ लागला.

अपघाताचा परिणाम म्हणून आता श्रीअरविंद यांनी साधकांबरोबरचा पत्रव्यवहार थांबविला होता. परंतु त्यांच्या बरोबरच्या संपर्काचे एक नवीनच रूप उदयाला आले. तो संपर्क आता अधिक मर्यादित होता पण तो अधिक निकटचा होता. या अपघातानंतर श्रीअरविंदांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईपर्यंत सहासात साधकांवर, (त्यामध्ये बहुतांशी डॉक्टर मंडळी होती) श्रीअरविंदांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कालावधीमध्ये या साधकांसमवेत श्रीअरविंद यांची अनेकानेक विषयांवर चर्चा होत असे. या चर्चामधूनच श्री. निरोदबरन लिखित ‘Twelve years with Sri Aurobindo’ या पुस्तकाची निर्मिती झाली. बरेचदा चालू जागतिक घडामोडींवर या चर्चा चालत असत. १९३९ मध्ये जेव्हा युरोपामध्ये युद्धाची घोषणा करण्यात आली तेव्हा श्रीअरविंद वर्तमानपत्र, नियतकालिकं आणि रेडिओच्या माध्यमातून युद्धाची खबरबात घेऊ लागले. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांनी डिसेंबर १९३८ मध्ये परत एकदा सांगितले की, ”साधना जेव्हा जडभौतिकामध्ये (physical) आणि अवचेतनेमध्ये (subconscient) खाली उतरली तेव्हा गोष्टी खूपच अवघड झाल्या. मला स्वतःला त्यासाठी दोन वर्षे संघर्ष करावा लागला कारण अवचेतन हे अतिशय जड असते, ते एखाद्या दगडासारखे जड असते. माझे मन ऊर्ध्वदिशेने जागृत असूनसुद्धा ते स्वतःचा कोणताही प्रभाव निम्नस्तरावर टाकू शकले नाही. हे भगीरथ परिश्रम होते, कारण जेव्हा व्यक्ती तेथे प्रवेश करते तेव्हा जणू काही अस्पर्शित प्रदेशामध्ये प्रवेश केल्यासारखे ते असते. पूर्वीचे योगी हे प्राणशक्तीपर्यंत खाली आलेले होते… पण मी माझे कार्य जर तेथेच सोडून दिले असते तर माझे खरे कार्य अपुरेच राहिले असते. जडभौतिकावर एकदा का विजय प्राप्त झाला की, माझ्यानंतर माझ्या मागून जे लोक या मार्गावर वाटचाल करतील त्यांच्यासाठी या गोष्टी सुकर होतील, यालाच ‘सर्वांमध्ये त्या एकमेवाद्वितीयाचा साक्षात्कार’ असे म्हणता येईल.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंद १९३४ साली एकदा सांगत होते की, “अतिमानसिक शक्ती (Supramental) अवतरत आहे. पण तिने अजूनपर्यंत शरीराचा किंवा जडद्रव्याचा ताबा घेतलेला नाही – कारण तेथे तिला अजूनही बराच प्रतिरोध आहे. अतिमानसिकीकरण झालेल्या ‘अधिमानसिक’ (Overmind) शक्तीचा जडद्रव्याला स्पर्श झालेला आहे आणि अधिमानसिक शक्तीचे आता कोणत्याही क्षणी अतिमानसामध्ये परिवर्तन होईल किंवा अतिमानसाला त्याच्या स्वतःच्या शक्तीनिशी कार्य करू देण्यासाठी, ही अधिमानसिक शक्ती जागा उपलब्ध करून देईल.’

या काळामध्येच आश्रमाच्या बाह्य जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येत होते. १९२७ सालापासून १९३३ सालापर्यंत साधकांची संख्या आता चोवीस वरून एकशे पन्नासपर्यंत वाढलेली होती, आणि अजूनही वाढतच चाललेली होती. आलेल्या सर्व नवागतांना आश्रमाच्या विस्तार पावत चाललेल्या सेवांपैकी एखाद्या कामामध्ये सामावून घेतले जात असे – डायनिंग रूममध्ये असो, किंवा एखादे वर्कशॉप असेल, इमारत विभाग असेल, फर्निचरची सेवा असेल किंवा एखाद्या गोदामामध्ये असेल, प्रत्येकाला कोणते ना कोणते काम सोपविले जात असे. कर्माच्या माध्यमातून, तसेच ध्यान व भक्तीच्या माध्यमातून, श्रीमाताजींच्या थेट देखरेखीखाली साधकांची अगदी उत्कट साधना चालत असे. श्रीमाताजींच्या पाठीशी श्रीअरविंदांचा शांत आधार असे.

साधकांना श्रीअरविंदांचे थेट साहाय्य मिळण्याचे दोन मार्ग होते : एक म्हणजे त्यांचे दर्शन आणि दुसरा मार्ग म्हणजे त्यांच्याशी होणारा पत्रव्यवहार. १९२० च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये श्रीअरविंद काही साधकांना थोडी पत्रं लिहीत असत; तरीही १९३० सालापर्यंत साधकांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे हा आश्रमाच्या साधनेचा एक नियमित भाग बनलेला नव्हता. “१९३३ सालापर्यंत श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्यापर्यंत साधकांच्या वह्या, पत्रं ढिगाने येऊन जमा होत असत आणि कित्येक रात्री महिन्यामागून महिने श्रीअरविंद साधक-साधिकांनी विचारलेल्या प्रश्नांना, मग ते प्रश्न अगदी उदात्त असू देत नाहीतर किरकोळ असू देत, उत्तरे देत असत. ही उत्तरे देण्यामध्ये त्यांचा दिवसाचा बराचसा वेळ आणि पूर्ण रात्र व्यतीत होत असे.

तात्काळ उत्तर न मिळाल्याने नाराज झालेल्या एका साधकाला उद्देशून श्रीअरविंद पत्र लिहीत आहेत, १९३३ साली लिहिलेल्या त्या पत्रामध्ये ते नमूद करतात की, ”सामान्य पत्रव्यवहार, असंख्य अहवाल या सगळ्यामध्ये मला बारा बारा तास खर्च करावे लागतात हे तुमच्या लक्षात येत नाही. दुपारी तीन तास आणि सकाळी ६ वाजेपर्यंत आख्खी रात्र मी यामध्ये गुंतलेला असतो.” साधकांबाबत आपल्याला जे कार्य करायचे आहे त्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग या दृष्टिकोनातून श्रीअरविंद या पत्रव्यवहाराकडे पाहत असत.

श्रीअरविंद म्हणतात ‘माझा हा पत्रव्यवहार म्हणजे माझ्या मुख्य हेतूच्या दिशेने नेणारे एक प्रभावी साधन होते आणि म्हणूनच मी त्याला इतके महत्त्व देत असे. प्रत्येकावर या पत्रव्यवहाराचा काही ना काही सकारात्मक परिणाम होत असे, त्याविषयी सांगून झाल्यावर श्रीअरविंद म्हणतात, ”अर्थातच हा केवळ पत्रवव्यहाराचा परिणाम होता असे नाही तर त्या पत्रव्यवहाराच्या पाठीमागे, जडभौतिक प्रकृतीवर ‘शक्तीचा’ जो दाब वाढत चाललेला होता, ती शक्तीच हे सारे करू शकत होती, परंतु तरीही त्यास एक योग्य वळण देणे आवश्यक होते आणि त्या पत्रव्यवहारातून तो हेतू साध्य झाला.”

श्रीअरविंदांच्या प्रकाशित झालेल्या पत्रव्यवहाराची पृष्ठसंख्या पाहिली तर ती संख्या दोन हजार छापील पृष्ठसंख्येपेक्षा जास्त आहे. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

‘अधिमानस’ आणि ‘अतिमानस’ यातील फरक स्पष्ट करताना श्रीमाताजी म्हणतात, पृथ्वी-रूपांतरणाचे एक आगळेवेगळे कार्य हे श्रीअरविंदांचे मुख्य कार्य आहे. मनाच्या वर चेतनायुक्त जिवाचे अनेकानेक स्तर आहेत, त्यामध्येच जे खरे दिव्य विश्व आहे, ज्याला श्रीअरविंदांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ते सत्याचे विश्व आहे. परंतु त्या दरम्यान (पृथ्वी आणि अतिमानसिक विश्व यांच्या दरम्यान) ज्याला त्यांनी ‘अधिमानस’ (Overmind) म्हणून ओळखले होते ते वैश्विक देवदेवतांचे जगत आहे. आत्तापर्यंत आपल्या विश्वाचे शासन या ‘अधिमानसा’ने केले होते. स्वतःच्या प्रदीप्त अशा चेतनेमध्ये मनुष्याला अधिमानसाचीच प्राप्ती करून घेता येणे शक्य झाले होते. आणि तेच परमोच्च दिव्य आहे असे समजण्यात येत होते आणि आजवर जे कोणी तेथवर जाऊन पोहोचले होते त्यांच्या मनात, त्यांनी सत्य-चैतन्याला स्पर्श केला आहे, याविषयी तीळमात्रही शंका नव्हती. कारण सामान्य मानवी चेतनेच्या दृष्टीने याचे (अधिमानसाचे) वैभव एवढे महान असते, ते एवढे चमकदार असते की, त्यामुळे आपण अंतिमतः शिखरस्थानी असणाऱ्या सत्याप्रत पोहोचलो आहोत असे मानण्यास ते मनुष्याला प्रवृत्त करते. तथापि वास्तव हे आहे की ‘अधिमानस’ हे अस्सल ‘दिव्यत्वा’च्या पुष्कळ खाली आहे. ते सत्याचे खरेखुरे धाम नाही. तर इतिहासाच्या आरंभापासून माणसं ज्यांच्यापुढे नतमस्तक होत आली आहेत अशा पूर्वसुरींचे, सर्व सर्जक शक्तींचे आणि सर्व देवदेवतांचे ते क्षेत्र आहे. पण अस्सल दिव्यत्व आजवर आविष्कृत झालेले नाही आणि त्याने या पृथ्वी-प्रकृतीमध्ये रूपांतरण घडविलेले नाही. याचे कारण हेच की, आजवर ‘अधिमानसा’लाच ‘अतिमानस’ म्हणून समजण्याची चूक झाली. वैश्विक देवदेवता सत्य-चेतनेमध्ये पूर्णतः वसती करत नाहीत : तर त्या केवळ त्या ‘सत्य-चेतने’च्या संपर्कात असतात आणि त्या देवदेवता त्या वैभवाच्या प्रत्येकी एकेका पैलूचे प्रतिनिधित्व करत असतात.

….’अधिमानसा’मध्ये मानवतेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर करण्याची क्षमता नसते आणि ती त्याच्याकडे असूही शकत नाही. त्यासाठी, ‘अतिमानस’ हेच एकमेव प्रभावी मध्यस्थ आहे. आणि येथेच आमचा योग (पूर्णयोग) हा जीवनाचे आध्यात्मिकीकरण करू पाहणाऱ्या भूतकाळातील इतर प्रयत्नांपेक्षा वेगळा ठरतो. कारण ‘अधिमानसा’चे वैभव हे सर्वोच्च वास्तव नाही तर, मन आणि अस्सल ‘दिव्यत्व’ या दोहोंच्या दरम्यानची ती केवळ एक पायरी आहे, हे आमचा योग (पूर्णयोग) जाणतो. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीमाताजी सांगत आहेत की, “बाह्य कामकाजाची सर्व जबाबदारी श्रीअरविंदांनी आता माझ्यावर सोपविली होती कारण अतिमानसिक चेतनेचे आविष्करण त्वरेने व्हावे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून ते सर्व बाह्य कामकाजापासून दूर जाऊ इच्छित होते. आणि त्यांनी काही मोजक्या लोकांपाशी असे जाहीररित्या सांगितलेही होते की, त्या सर्वांना साहाय्य करण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी माझ्यावर सोपविलेले आहे. मी श्रीअरविंदांच्या संपर्कात राहीन आणि अर्थातच ते माझ्या माध्यमातून कार्य करतील, असेही त्यांनी सांगितले होते.

अचानकपणे, गोष्टींना एक विशिष्ट आकार येऊ लागला : एका असाधारण बारकाव्यानिशी एक अतिशय प्रतिभाशाली अशी निर्मिती झाली होती, अतिशय अदभुत असे अनुभव येत होते, दिव्य जिवांसोबत संपर्क प्रस्थापित होत होते, आणि ज्याला चमत्कार मानले जाते अशा सर्व प्रकारचे आविष्कार घडून येत होते. एका पाठोपाठ एक ‘अनुभव’ येत होते आणि गोष्टी अगदी झगमगीतपणे उलगडत चाललेल्या होत्या… अतिशय अदभुत रीतीने त्या घडत होत्या, असे मी नक्की म्हणू शकते.

एके दिवशी मी नेहमीप्रमाणे श्रीअरविंदांना घडलेल्या गोष्टी सांगायला गेले, आम्ही एका खरोखरच स्वारस्यपूर्ण गोष्टीपाशी येऊन पोहोचलो होतो आणि काय घडले ते सांगत असताना मला वाटते मी, काहीसा अधिकच उत्साह दाखविला असावा… श्रीअरविंदांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाले, “हो, ही ‘अधिमानसिक’ सृष्टी आहे. खरोखरच ती अतिशय स्वारस्यपूर्ण गोष्ट आहे, छान झाले. ज्यामुळे तुम्ही जगप्रसिद्ध व्हाल असे चमत्कार तुम्ही घडवून आणू शकाल, तुम्ही खरोखरच या पृथ्वीवरील घटनांमध्ये उलथापालथ घडवून आणू शकाल…”

ते हसून म्हणाले, “ते एक महान यश असेल. परंतु ही ‘अधिमानसिक’ सृष्टी आहे. आणि आपल्याला अपेक्षित असलेले यश हे नव्हे, आपल्याला या पृथ्वीवर ‘अतिमानसा’ची (supramental) स्थापना करायची आहे. एका नवीन जगताच्या निर्मितीसाठी, अतिमानसिक जगताच्या अखंड निर्मितीसाठी, हाती आलेल्या तात्कालिक यशाचा कसा परित्याग करायचा, हे व्यक्तीला माहित असले पाहिजे.”

श्रीअरविंद काय म्हणू पाहत आहेत हे मला माझ्या आंतरिक चेतनेनिशी लगेचच लक्षात आले… काही तासांमध्ये ती (अधिमानसिक) सृष्टी नाहीशी झाली होती आणि त्या क्षणापासून आम्ही पुन्हा अन्य गोष्टींच्या आधारे नव्याने कार्याला सुरुवात केली. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(श्रीअरविंद स्वत: आश्रमाच्या स्थापनेविषयी येथे खुलासा करत आहेत. श्रीअरविंद स्वत:च्या नावाचा उल्लेख, त्रयस्थ व्यक्तीचा उल्लेख करावा त्याप्रमाणे, श्रीअरविंद असाच करत असत, हे कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.)

श्रीअरविंद राजकारण-संन्यास घेऊन, सुरुवातीला पाँडिचेरी येथे चार-पाच शिष्यांसमवेत राहात होते. त्यांच्या आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्यासाठी येणाऱ्या साधकांची संख्या हळूहळू वाढू लागली आणि ती एवढी वाढली की, उच्चतर जीवनासाठी सर्वस्वाचा त्याग करून आलेल्या या साधकांच्या निर्वाहासाठी आणि त्यांना सामूहिक मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून साधकपरिवाराची रचना करणे अत्यावश्यक ठरले. अशा रीतीने, ‘श्रीअरविंद आश्रमा’ची स्थापना झाली. ती करण्यात आली असे म्हणण्यापेक्षा, श्रीअरविंदांभोवती केंद्र म्हणून त्याची स्वाभाविकपणे वाढ होत गेली, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

सुरुवातीला आश्रम नव्हता. तर काही थोडे लोक श्रीअरविंदांपाशी येऊन राहू लागले आणि साधना करू लागले. कालांतराने जेव्हा श्रीमाताजी जपानहून परतल्या, तेव्हा त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला. श्रीअरविंदांचा किंवा श्रीमाताजींचा तसा काही हेतूही नव्हता किंवा तसे काही नियोजनही नव्हते, पण बऱ्याच साधकांना त्यांचे समग्र आंतरिक व बाह्य जीवन श्रीमाताजींवर मोठ्या विश्वासाने सोपवायचे होते आणि त्यामधून त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला. दरम्यानच्या काळात, श्रीमाताजी फ्रान्स आणि जपानमधील दीर्घ वास्तव्यानंतर दि. २४ एप्रिल १९२० रोजी पाँडिचेरीला परतल्या आणि त्यानंतर मग अनुयायांची संख्या वेगाने वाढू लागली, असे दिसून आले. (१९२६ साली फक्त २४ साधक होते, पण लवकरच ती संख्या वाढत गेली. १९२७ मध्ये ती संख्या ३६ झाली आणि नंतरच्या वर्षांत ती संख्या ८५ झाली.) जेव्हा आश्रम विकसित होऊ लागला तेव्हा त्याची व्यवस्था लावण्याची जबाबदारी श्रीमाताजींवर आली. श्रीअरविंद लवकरच एकांतवासामध्ये निघून गेले आणि आश्रमाची सारी भौतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी श्रीमाताजींवर आली.

श्री. के. आर. श्रीनिवास अय्यंगार त्यांच्या श्रीअरविंद-चरित्रामध्ये नमूद करतात की, “योगाचे स्वामी (श्रीअरविंद) आता दृश्य-पटलाच्या मागे सरकले होते आणि श्रीमाताजींनी शिष्यांच्या साधनेची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती आणि आता ‘श्रीअरविंद आश्रम’ औपचारिकरित्या अस्तित्वात आला होता.” श्रीअरविंदांचा एकांतवास हा अगदी निरपवाद असा नव्हता. कारण ते वर्षातून तीनवेळा साधकांना दर्शन देत असत.

दि. २१ फेब्रुवारी (श्रीमाताजींचा जन्मदिवस),
दि. १५ ऑगस्ट (श्रीअरविंद यांचा जन्मदिवस)
आणि दि. २४ नोव्हेंबर (सिद्धी दिन)

या तीन दिवशी ते साधकांना दर्शन देत असत. आणि १९३९ नंतर, दि. २४ एप्रिल हा दिवसही ‘दर्शनदिन’ म्हणून साजरा व्हायला सुरूवात झाली. (श्रीमाताजी कायमस्वरूपी पाँडिचेरी येथे वास्तव्यास आल्या तो दिवस.)

श्रीमाताजी आणि एकदोन निवडक साधक, श्रीअरविंदांच्या कायम संपर्कात असत. आणि श्रीअरविंद साधकांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पत्रांच्या माध्यमातून देत असत. त्यांची आश्रमीय जीवनामधील आस्था पूर्वीप्रमाणेच कायम होती पण त्याचे रूप मात्र बदलले होते. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(श्रीअरविंदांचे एक अनुयायी श्री. के. डी. सेठना ‘श्रीअरविंद’ या नामाविषयी काही खुलासा करत आहेत…)

श्रीअरविंदांनी स्वतःच्या आध्यात्मिक वाटचालीच्या दरम्यान एका विशिष्ट टप्प्यावर ‘श्रीअरविंद’ असे नाम धारण केले. त्यापूर्वी ते अरविंद घोष किंवा ए.जी. अशी सही करत असत. ‘आर्य’ च्या कालखंडामध्ये देखील ते अरविंद घोष अशीच सही करत असत. विसाव्या दशकाच्या मध्यावर ‘श्री. अरविंद घोष’ हे ‘श्रीअरविंद’ बनले असावे असे मला वाटते. त्यांच्या स्वाक्षरीमधील बदल हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील रूपांतरणाचे द्योतक होते. कदाचित त्यांच्या स्वतःच्या देहामध्ये जेव्हा अधिमानस चेतनेचे अवतरण झाले त्या दिवसानंतर म्हणजे दि. २४ नोव्हेंबर १९२६ नंतर हा बदल घडून आला असावा. वास्तविक हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. हे नवीन नाम महत्त्वाचे आहे कारण ते आध्यात्मिक साक्षात्कारानंतर उदयाला आलेले होते. ते केवळ साधकवर्गाने केलेल्या गौरवातून उदयाला आलेले नव्हते. श्रीमाताजी एकदा म्हणाल्या होत्या, “आपण आपल्या प्रभूंना (श्रीअरविंद यांना) ज्या नामाने ओळखतो त्या नामाचा ‘श्री’ हा अविभाज्य भाग आहे.”

यातून हेच ध्वनित होते की, आपण म्हणजे भारतीयांनी आणि पाश्चात्त्यांनीदेखील त्यांना श्रीअरविंद असेच म्हणावे असे श्रीमाताजींना अपेक्षित होते.

कदाचित या अवस्थांतराची चाहूल श्रीअरविंद यांना आधीच लागली होती असे दिसते. कारण दि. २२ मार्च १९२६ च्या एका पत्रामध्ये आशीर्वाद देताना, पत्राखाली ‘श्रीअरविंद’ असा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(श्रीमाताजींकडे श्रीअरविंद-आश्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली तो प्रसंग त्या येथे सांगत आहेत.)

व्यक्तीमध्ये देवदेवतांचे अवतरण घडवण्यासाठी, मी तेव्हा ‘अधिमानसिक निर्मिती’ला (Overmind Creation) एक प्रकारे सुरुवात केली होती आणि त्यावेळी गोष्टी एका असामान्य ऊर्ध्वगामी वळणावर जाऊन पोहोचल्या होत्या. मी माझ्या स्वत:च्या अंत:चक्षुंनी पाहिले, तेव्हा श्रीकृष्णाने स्वत:ला श्रीअरविंदांमध्ये एकजीव केले आहे, असे मला दिसले. मग मी श्रीअरविंदांच्या खोलीत गेले आणि त्यांना म्हणाले, ”मला आत्ता असे असे दिसले.” ते म्हणाले, “हो, मला माहीत आहे. हे उत्तम झाले. आता मी माझ्या खोलीतच राहायचे ठरविले आहे, तेव्हा तुम्ही आता सर्व साधकांची जबाबदारी घ्या.”

पुढे श्रीमाताजी सांगतात, आलेल्या प्रत्येकाला भेटण्यासाठी पूर्वी, श्रीअरविंद व्हरांड्यामध्ये जात असत आणि त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येकाशी ते बोलत असत. (येथेच श्री. निरोदबरन यांच्या ‘Talks with Sri Aurobindo’ या प्रसिद्ध पुस्तकाची निर्मिती झाली.) तेव्हा मी आतल्या खोलीमध्ये थांबत असे आणि कोणालाही भेटत नसे. ते मात्र व्हरांड्यात जात असत, प्रत्येकाला भेटत असत, आलेल्या लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, चर्चा करणे असे सारे चालत असे. ते जेव्हा आत येत असत तेव्हाच फक्त मी त्यांना भेटत असे. कालांतराने मी देखील सर्वांबरोबर ध्यानाला बसू लागले.

तेव्हा त्यांनी भेटीसाठी सर्वांना एकत्रित बोलाविले. ते स्वत: बसले आणि त्यांच्या शेजारी मला बसवून घेतले आणि ते बोलू लागले, “मी येथे तुम्हाला असे सांगायला बोलाविले आहे की, आजपासून मी माझ्या साधनेसाठी म्हणून एकांतवासात जात आहे आणि यापुढे आता तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी श्रीमाताजी घेतील. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही त्यांना सांगावे. त्या माझे प्रतिनिधित्व करतील आणि त्याच सर्व कार्य करतील.” (येथेच प्रथमच ‘श्रीमाताजी’ हा शब्द श्रीअरविंदांकडून उच्चारण्यात आला होता, पूर्वी श्रीअरविंद त्यांना ‘मीरा’ असे संबोधत असत.)

सर्वजण त्यांना विचारू लागले, “असे का? असे का?” ते म्हणाले, “ते तुम्हाला सांगण्यात येईल.” मी कोणतीच गोष्ट स्पष्ट करू इच्छित नव्हते म्हणून मी खोलीत जाण्यासाठी म्हणून त्यांच्याबरोबरच बाहेर पडले पण तेवढ्यात दत्ताने बोलायला सुरुवात केली.

(दत्ता या एक इंग्लिश स्त्री होत्या. आणि त्या माझ्यासोबतच युरोप सोडून येथे आल्या होत्या. त्यांना काही ‘अंत:प्रेरणा’ येत असत.) दत्ताने सगळ्यांना सांगितले की, श्रीअरविंद त्यांच्या माध्यमातून बोलत आहेत अशी त्यांना जाणीव झाली आहे आणि मग त्यांनी सारे काही स्पष्ट करून सांगितले. ते असे की, “श्रीकृष्णाचे अवतरण झालेले आहे. श्रीअरविंद आता अतिमानसाच्या अवतरणासाठी खूप कठोर साधना करणार आहेत; या सगळ्याचा अर्थ असा की, श्रीकृष्णाची पृथ्वीवरील अतिमानसाच्या अवतरणाला संमती आहे. आणि आता येथून पुढे श्रीअरविंद त्या कार्यामध्ये इतके व्यग्र होऊन जातील की, त्यामुळे त्यांना आता लोकांशी भेटणे बोलणे शक्य होणार नाही आणि म्हणून त्यांनी श्रीमाताजींकडे ही जबाबदारी सोपविली आहे आणि म्हणून आता पुढील सारे कार्य त्याच पाहतील.”

ही तारीख होती, २४ नोव्हेंबर १९२६. तेव्हापासून हा दिवस श्रीअरविंद आश्रमात ‘सिद्धी-दिन’ म्हणून ओळखला जातो. (क्रमश:)