विचार शलाका – २८

आपण ‘देवा’ची प्रतिमूर्तीच बनावे, त्याच्यामध्येच आपण निवास करावा, त्याच्या सन्निध राहावे आणि त्याच्या आनंदाचे व शक्तीचे आपण एक माध्यम बनावे, त्याच्या कार्याचे आपण एक साधन बनावे यासाठीची हाक आपल्याला आलेली आहे. सर्व अशुभापासून शुद्धीकरण करतकरत, ईश्वराच्या स्पर्शाने जीवाचे रूपांतरण होत, आपल्याला दिव्य विद्युत-जनित्राप्रमाणे (dynamos) या जगामध्ये कार्य करायचे आहे आणि ती दिव्य ऊर्जा सर्व मानवजातीमध्ये वितरित करायची आहे. तिच्या प्रकाशाने मानवजात रोमांचित होत, प्रकाशमान होईल अशा रीतीने ती वितरित करायची आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणीही एखादा जिथे कोठे उभा असेल, त्याच्या अवतीभोवती असणारे शेकडो लोक ‘देवा’च्या प्रकाशाने, त्याच्या शक्तीने भारले जातील, ते ‘देवा’ने परिपूर्ण आणि आनंदाने परिपूर्ण होऊन जातील.

चर्च, परंपरा, धर्मविद्या, तत्त्वज्ञानं मानवजातीला वाचविण्यामध्ये अपयशी ठरली कारण त्यांनी स्वतःला बौद्धिक पंथ, सिद्धान्त, कर्मकांड, संस्था यांमध्ये, तसेच आचारशुद्धी, दर्शने यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवले, जणू काही यामुळे मानवजातीचे रक्षण होणार होते. हे करत असताना, जी गोष्ट करणे गरजेचे होते, त्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी आत्म्याच्या शक्तीकडे आणि तिच्या शुद्धीकरणाकडे लक्ष पुरविले नाही. आपण त्या आवश्यक गोष्टीकडे परतले पाहिजे. ‘ख्रिस्ता’ची पावित्र्याची आणि मानवजातीच्या परिपूर्णतेची शिकवण, ‘महंमद’च्या (पैगंबर) परिपूर्ण शरणागतीची, आत्मसमर्पणाची आणि ईश्वरसेवेची शिकवण, मानवातील ईश्वराच्या आनंदाची व प्रेमाची ‘चैतन्यां’नी (महाप्रभू) दिलेली शिकवण, सर्व धर्मांच्या एकत्वाची आणि मानवातील ‘देवा’च्या दिव्यत्वाची रामकृष्णांनी (परमहंस) दिलेली शिकवण अंगीकारत, या साऱ्या प्रवाहांचे एका मोठ्या नदीमध्ये एकत्रीकरण करत, ‘गंगे’प्रमाणे विशुद्ध करून घेत, त्यांना उद्धारून घेत आपणही, ‘भगीरथा’ने ज्याप्रमाणे ‘गंगे’चे अवतरण करून घेतले आणि आपल्या पूर्वजांच्या अस्थी त्यामध्ये विसर्जित केल्या, त्याप्रमाणे या भौतिकतावादी मानवतेच्या मृतवत झालेल्या जीवनावर, त्याचा वर्षाव करायला हवा. ज्यामुळे, या मानवजातीमधील आत्मतत्त्वाचे पुनरुत्थान होईल आणि पुन्हा एकदा काही काळासाठी या विश्वामध्ये ‘सत्ययुग’ अवतरेल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 90)

विचार शलाका – २७

माझी शिकवण ही आहे की, हे जग एका नवीन प्रगतीसाठी, एका नवीन उत्क्रांतीसाठी स्वतःला तयार करत आहे. जो कोणता देश, जो कोणता वंश या नवीन उत्क्रांतीची दिशा पकडेल आणि त्याची परिपूर्तता करेल तो देश, तो वंश हा मानववंशाचा नेता असणार आहे. या नवीन उत्क्रांतीचा पायाभूत विचार कोणता असणार आहे आणि ही नवीन उत्क्रांती कोणत्या ‘योग’पद्धतीने साध्य होऊ शकेल याचे मला जे दर्शन झाले ते मी ‘आर्य’मध्ये (श्रीअरविंद व श्रीमाताजी ‘आर्य’ नावाचे नियतकालिक प्रकाशित करत असत.) मांडले आहे. …ज्यांना जाणून घ्यावयाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तो संदेश तेथे आहे. वस्तुतः त्याचे तीन भाग आहेत.

०१) प्रत्येक मनुष्याने व्यक्ती म्हणून स्वतःला भविष्यकालीन दिव्य मानवतेच्या प्रकारामध्ये परिवर्तित करावे, उदयाला येण्यासाठी धडपडणाऱ्या नवीन सत्ययुगातील माणूस बनावे.

०२) मानववंशाचे नेतृत्व करू शकतील अशा माणसांचा एक वंश विकसित करावा.

०३) आणि या पथदर्शक लोकांच्या नेतृत्वाखाली, या निवडक वंशाच्या लोकांच्या नेतृत्वाखाली, या मार्गावरून वाटचाल करावी यासाठी म्हणून समस्त मानवजातीला आवाहन करावे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 225)

विचार शलाका – २६

तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, मठ, तपस्वी आणि संन्यासी तयार करणे हे काही माझे जीवितकार्य नाही; तर बलवान आत्म्यांना ‘कृष्ण’ आणि ‘काली’ यांच्या ‘लीले’मध्ये परत बोलविणे हे माझे कार्य आहे. ही माझी शिकवण आहे, ‘रिव्ह्यू’च्या अंकांमधूनही तुम्हाला ती पाहावयास मिळेल. माझे नाव कधीच मठादी प्रकारांशी किंवा संन्यासवादी आदर्शांशी जोडले जाता कामा नये. बुद्धाच्या काळापासून सुरु झालेल्या संन्यासमार्गाच्या प्रत्येक चळवळीमुळे भारत दुर्बल बनत गेला आहे आणि त्याचे कारण उघड आहे. जीवनाचा परित्याग ही एक गोष्ट आहे आणि खुद्द जीवनच मग ते राष्ट्रीय असो, वैयक्तिक असो, की वैश्विक जीवन असो ते जीवन महान आणि अधिक दिव्य बनविणे ही दुसरी गोष्ट आहे. …अहंकाराचा परित्याग आणि जीवनामध्ये ‘ईश्वरा’चा स्वीकार हा ‘योग’ मी शिकवितो – इतर कोणत्याही परित्यागाची शिकवण मी देत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 222)

विचार शलाका – २५

भावनिक आवेग, भावभावना आणि मानसिक उत्साह यांना मी आता पाया बनवू इच्छित नाही. विशाल आणि मजबूत अशा समतेलाच मी माझ्या योगाचे अधिष्ठान बनवू इच्छितो. समतेवर अधिष्ठित असलेल्या जिवाच्या सर्व तऱ्हेच्या कृतींमध्ये, मला पूर्ण, स्थिर आणि अविचल असे सामर्थ्य हवे आहे आणि या शक्तिसामर्थ्याच्या सागरावर मला ‘ज्ञानसूर्य’ तळपताना हवा आहे आणि त्या तेजोमय विशालतेमध्ये अनंत प्रेमाचा परमानंद आणि आनंद आणि एकत्व सुस्थापित झालेले हवे आहेत.

मला हजारो शिष्यांची आवश्यकता नाही. क्षुद्र अशा अहंकारापासून मुक्त असणारे, ‘ईश्वरा’चे साधन बनलेले असे शंभर जरी शिष्य मला लाभले, तरी ते माझ्यासाठी पुरेसे असतील. नेहमीच्या पद्धतीच्या गुरुबाजीवर माझा विश्वास नाही. मला गुरु बनायचे नाहीये. मला काय हवे आहे तर, कोणीतरी एखादा माझ्या स्पर्शाने किंवा इतर कोणाच्या तरी स्पर्शाने जागृत होईल, त्याच्या सुप्त अशा आंतरिक दिव्यत्वातून तो आविष्कृत होईल आणि दिव्य जीवन प्रत्यक्ष उतरवू पाहील. अशी माणसेच या देशाची उन्नती करतील.

– श्रीअरविंद
(Bengali Writings : 372-373)

विचार शलाका – २४

शरीराकडे ते जणू प्रेत आहे असे समजून पाहाणे, हे संन्यासवाद्यांचे लक्षण आहे. हा निर्वाणाचा मार्ग आहे. ही संकल्पना ऐहिक जीवनाच्या संकल्पनेशी मिळतीजुळती नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असला पाहिजे, चैतन्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच तो शरीरामध्येही असला पाहिजे. देह हा चैतन्याने बनलेला असतो, त्यामुळे देह हा देखील ‘ईश्वरा’चेच रूप आहे. मी या विश्वातील सर्व वस्तुमात्रांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहतो. येथील सर्व काही हे ‘ब्रह्म’च आहे, ‘वासुदेव’, ‘ईश्वर’ हाच सर्व काही आहे, (सर्वम् इदम् ब्रह्म, वासुदेवं सर्वमिति) ही दृष्टी वैश्विक आनंद मिळवून देते. आनंदाच्या सघन लहरी अगदी शरीरामधूनही उठत राहतात. या अवस्थेत, आध्यात्मिक भावनेने भरलेले असतानासुद्धा, व्यक्ती हे ऐहिक जीवन, वैवाहिक जीवन जगू शकते. प्रत्येक कृतीमध्ये व्यक्तीला दिव्यत्वाचा आनंददायी आत्माविष्कार आढळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 367)

विचार शलाका – २३

समर्पण हे संपूर्ण असले पाहिजे आणि त्याने अस्तित्वाच्या प्रत्येक घटकाचा ताबा घेतला पाहिजे. चैत्य (The psychic) प्रतिसाद देत आहे आणि उच्चतर मानसिक अंग स्वीकार करत आहे किंवा अगदी आंतरिक प्राणिक अंग शरणागत होत आहे आणि आंतरिक शारीरिक चेतनेला प्रभाव जाणवत आहे, फक्त एवढेच पुरेसे नाही. अस्तित्वाचा कोणताही घटक असा असता कामा नये, अगदी अत्यंत बाह्यवर्ती भागसुद्धा असा असता कामा नये की जो स्वतःला अलग राखत आहे, शंका, गोंधळ आणि डावपेच यांच्या मागे काहीतरी दडवून ठेवत आहे, किंवा एखादा भाग बंड करत आहे किंवा नकार देत आहे, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

विचार शलाका – २२

….खालून ऊर्ध्व दिशेप्रत असणारी उन्मुखता आणि वरून अवतरित होणारी सर्वोच्च अतिमानसिक ‘शक्ती’ या दोन गोष्टीच भौतिक प्रकृती आणि तिच्या अडीअडचणी यांना विजयपूर्वक हाताळू शकतील आणि त्यांचा निरास करू शकतील.

समर्पण हे संपूर्ण आणि प्रामाणिक असले पाहिजे; एकमेव दिव्य ‘शक्ती’प्रतच आत्म-उन्मुखता असली पाहिजे; अवतरित होणाऱ्या ‘सत्या’ची सातत्यपूर्ण आणि संपूर्ण निवड केली पाहिजे, मानसिक, प्राणिक आणि शारीरिक ‘शक्ती’ आणि त्यांची ‘रूपे’, जी अजूनही या ‘पृथ्वी-प्रकृती’वर शासन करत आहेत त्यांच्या मिथ्यत्वाला सातत्याने आणि पूर्णतया नकार दिला पाहिजे…

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

विचार शलाका – २१

मानवी स्तरावरील सामान्य प्राणिक मागण्यांच्या विरोधात, साधक जेव्हा स्वतःच्या योगमार्गावर अढळपणे उभा राहतो तेव्हा, ज्यांना त्या साधकाबाबत काही जाण नसते असे लोक नेहमीच (“हा दगडासारखा भावशून्य आहे’’ इ. प्रकारची) निंदा करत राहतात. पण त्यामुळे तुम्ही (साधकाने) अस्वस्थ होता कामा नये. मानवी प्रकृतीच्या सामान्य प्राणिक चिखलाने भरलेल्या मार्गावरील हलकी आणि निःसत्त्व माती बनून राहण्यापेक्षा, दिव्यत्वाकडे जाणाऱ्या मार्गावरील दगड होणे परवडले.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 315)

विचार शलाका – २०

समत्व हा ‘पूर्णयोगा’चा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; वेदना आणि दुःखभोग असतानादेखील समत्व बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की, दृढपणे आणि शांतपणे चिकाटी बाळगली पाहिजे; अस्वस्थ वा त्रस्त किंवा निराश वा उद्विग्न होता कामा नये तर, ‘ईश्वरी संकल्पा’वर अविचल श्रद्धा ठेवून वाटचाल केली पाहिजे. समत्वामध्ये उदासीन स्वीकाराचा समावेश होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या वेळी साधनेमधील काही प्रयत्नांबाबत तात्पुरते अपयश आले तरी व्यक्तीने समत्व राखले पाहिजे; व्यक्तीने त्रस्त किंवा निराश होता कामा नये; तसेच ते अपयश म्हणजे ‘ईश्वरी इच्छे’चा संकेत आहे असे समजून, प्रयत्न सोडून देताही कामा नयेत. उलट, तुम्ही त्याचे कारण शोधून काढले पाहिजे, त्या अपयशाचा अर्थ शोधून काढला पाहिजे आणि विजयाच्या दिशेने श्रद्धापूर्वक मार्गक्रमण केले पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे आजारपणाच्या बाबतीतसुद्धा – तुम्ही त्रस्त होता कामा नये, विचलित किंवा अस्वस्थही होता कामा नये, ‘ईश्वरी इच्छा’ आहे असे समजून तुम्ही ते आजारपण स्वीकारता कामा नये, तर ते शरीराचे अपूर्णत्व आहे या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहिले पाहिजे; मानसिक दोष किंवा प्राणिक अपूर्णत्व यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी जसे तुम्ही प्रयत्न करता तसेच प्रयत्न हे शरीराचे अपूर्णत्व काढण्यासाठीसुद्धा केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

विचार शलाका – १९

संसारी मनुष्य सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे सहन करू शकतो. तो हे समर्थ मानसिक नियंत्रणाच्या साहाय्याने करतो. परंतु ती समता नाही, ती तितिक्षा होय. सहन करण्याची ही ताकद म्हणजे समतेची केवळ पहिली पायरी किंवा समतेचा केवळ तो पहिला घटक होय.

*

समता नसेल तर साधनेचा भरभक्कम पायाच रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य धीराने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारायला शिकला पाहिजेत. या गोष्टी म्हणजे समतेची कसोटीच असते. जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत, माणसं आणि परिस्थिती सुखकारक आहे तेव्हा समत्व बाळगणे, धीर राखणे सहजसोपे आहे. परंतु जेव्हा यापेक्षा विपरित परिस्थिती असते तेव्हा धीर, शांती, समत्व ह्यांच्या पूर्णतेचा कस लागतो, अशा परिस्थितीमध्ये, त्या अधिक बळकट, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 135), (CWSA 29 : 129)