अचंचल, अविचल मन (quiet mind) ही पहिली पायरी होय, त्यानंतरची खूप पुढची पायरी म्हणजे निश्चल-निरवता (silence). परंतु त्यासाठी (व्यक्तीमध्ये) आधी अविचलता असलीच पाहिजे. ‘अविचल मन’ असे म्हणत असताना, मला अशी एक मानसिक चेतना अभिप्रेत आहे की, ज्या चेतनेमध्ये विचार आत प्रविष्ट होताना दिसतील आणि तेथे ते इतस्ततः वावरताना दिसतील; परंतु आपण स्वतः विचार करत आहोत असे व्यक्तीला वाटणार नाही किंवा ते विचार आपले स्वतःचे आहेत किंवा ते विचार म्हणजेच आपण आहोत असेही त्या व्यक्तीला वाटणार नाही.

एखाद्या शांत प्रदेशामध्ये वाटसरू यावेत, काही काळ तेथे राहून नंतर तेथून निघून जावेत त्याप्रमाणे, मनामध्ये विचारतरंग येतील आणि निघून जातील. अविचल मन त्यांचे निरीक्षण करेल किंवा करणारही नाही, परंतु दोन्ही परिस्थितीमध्ये ते सक्रिय होणार नाही किंवा ते स्वतःची अविचलता देखील गमावणार नाही.

निश्चल-निरवतेमध्ये अविचलतेपेक्षा अधिक असे काही असते; आंतरिक मनामधून विचारांना पूर्णपणे हद्दपार करत, त्याला नि:शब्द करून किंवा विचारांना सीमेच्या बाहेरच ठेवून, ही अवस्था प्राप्त करून घेता येऊ शकते. परंतु वरून होणाऱ्या अवतरणाद्वारे (descent) ही अवस्था अधिक सुलभतेने प्रस्थापित करता येते. ही निश्चल-निरवता वरून खाली अवतरत आहे, आपल्या वैयक्तिक चेतनेमध्ये प्रवेश करून, ती तिला व्यापून टाकत आहे किंवा तिला ती कवळून घेत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते, आणि मग ती चेतना स्वतःला विशाल अशा अवैयक्तिक (impersonal) निश्चल-निरवतेमध्ये विलीन करू पाहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 141-142)

अचंचलता किंवा अविचलता, स्थिरता, शांती आणि निश्चल-निरवता या प्रत्येक शब्दांना अर्थांच्या त्यांच्यात्यांच्या अशा खास छटा आहेत आणि त्यांची व्याख्या करणे तितकेसे सोपे नाही.

Quiet म्हणजे अचंचलता, अविचलता – ही अशी एक अवस्था असते की, जेथे कोणतीही अस्वस्थता किंवा चलबिचल नसते.

Calm म्हणजे स्थिरता – ही एक अक्षुब्ध, अचल अशी अवस्था असते की, जिच्यावर कोणत्याही क्षोभाचा परिणाम होऊ शकत नाही. अविचलतेच्या तुलनेत स्थिरता ही अधिक सकारात्मक अवस्था असते.

Peace म्हणजे शांती – ही त्याहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते; शांतीसोबतच एक सुस्थिर व सुसंवादी विश्रामाची आणि मुक्ततेची भावनासुद्धा येते.

Silence म्हणजे निश्चल-निरवता – (ही शांतीहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते.) ही अशी एक अवस्था असते की, जेथे प्राणाचे किंवा मनाचे कोणतेही तरंग उमटत नाहीत. किंवा तसे नसेल तर, मग तेथे एक प्रगाढ अविचलता असते आणि त्या अविचलतेला कोणतीही पृष्ठवर्ती हालचाल भेदू शकत नाही किंवा त्यात बदल घडवू शकत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)

अंतःकरणाच्या शुद्धीसाठी संपूर्ण प्रामाणिकपणा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. स्वत:च स्वत:ची फसवणूक करता कामा नये. ईश्वरा‌पासून, स्वतःपासून किंवा सद्गुरू‌पासून काहीही लपवून ठेवता कामा नये, स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे थेट निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांना सुयोग्य बनविण्यासाठीची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना वेळ लागला तरी काही हरकत नाही; पण ईश्वर‌प्राप्ती करून घेणे हेच आपले जीवित-कार्य आहे, असे मानण्याची तयारी व्यक्तीने ठेवली पाहिजे.

अंतःकरणाची शुद्धी ही एक बऱ्यापैकी लक्षणीय उपलब्धी आहे आणि म्हणूनच, बदलायला हव्यात अशा अजून काही गोष्टी व्यक्तीला स्वतःमध्ये आढळल्या तर त्यामुळे तिने निराश होण्याचे, हताश होण्याचे काहीच कारण नाही. व्यक्तीने जर योग्य इच्छा व योग्य दृष्टिकोन बाळगला तर, अंतःसूचना व अंतर्ज्ञान या गोष्टी वाढीस लागतील; त्या अधिक स्पष्ट, अधिक नेमक्या व अचूक बनतील आणि त्यांचे अनुसरण करण्याची ताकदसुद्धा वाढत राहील. आणि मग, तुम्ही स्वतःबाबत समाधानी होण्याआधी ईश्वरच तुमच्याबाबत समाधानी होईल. मानवता ज्या सर्वोच्च गोष्टीची आस बाळगू शकते ती गोष्ट (म्हणजे ईश्वर). मात्र साधक अपरिपक्व असताना जर ती गोष्ट त्याच्या हाती लागली तर, ती त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते; परंतु असे होऊ नये यासाठी साधक व ईश्वर यांच्यामध्ये जो एक पडदा असतो की, ज्या पडद्याद्वारे ईश्वर स्वतःचे व साधकांचे संरक्षण करत असतो, तो पडदा ईश्वर स्वतःहून हळूहळू दूर करू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 43)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा असणे ही एकच अट आहे. आणि त्याचाच अर्थ असा होतो की, ‘परमसत्या‌’चा निरपवाद आग्रह बाळगणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे.

तसे झाले तर मग, व्यक्तीमध्ये मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर लगेचच व्यक्तीला एक प्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सतर्क खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात आपल्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. किंवा कधीकधी तिच्या स्वभावाची एक (उजळ) बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच (अंधारी) बाजू व्यक्त होते किंवा व्यक्ती काही जणांशी जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांशी वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीमध्ये स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची एक आत्मपरीक्षणात्मक दृष्टी असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. आणि बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ईश्वरी कृपेमुळेच साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या कमतरता असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ईश्वरी कृपेमध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम होतोच होतो; तुम्ही जर प्रामाणिक असाल तर तुम्ही दिव्य जीवनामध्ये उन्नत होता.

पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे, फक्त आणि फक्त दिव्य सत्याचीच आस बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या एकमेव अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व वासना यांना नकार देणे; जीवनातील प्रत्येक कृती ईश्वरालाच समर्पण करणे आणि हे कार्य ईश्वराने नेमून दिलेले आहे हे जाणून, त्याच्या आड कोणताही अहंकार येऊ न देता, ते कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे.

व्यक्तीमध्ये एकदम, एकाएकी असा बदल घडून येऊ शकत नाही. पण जर व्यक्ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून त्या शक्तीचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ, प्रामाणिक इच्छेने नेहमी धावा करत राहील तर, व्यक्ती या चेतनेमध्ये अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

प्रामाणिक (असणे) हे फक्त एक विशेषण आहे. त्याचा अर्थ असा की, तुमची इच्छा ही खरीखुरी इच्छा असली पाहिजे. “मी अभीप्सा बाळगतो” असा जर तुम्ही नुसताच विचार करत बसाल आणि त्या अभीप्सेशी विसंगत अशा गोष्टी करत राहाल किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छावासनांचीच पूर्ती करत राहाल किंवा विरोधी प्रभावाप्रत स्वतःला खुले कराल, तर ती इच्छा प्रामाणिक नाही, (असे समजावे).

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)

प्रामाणिकपणामध्ये (Sincerity) नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करत असता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या इच्छेमध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ईश्वराचे साधन बनण्याची आणि ईश्वराशी एकरूप होण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाचा अर्थ असा असतो की, तो खरोखरच कळकळीने अभीप्सा बाळगत असतो व ईश्वराव्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)

तुम्हाला योगाभ्यासातून काय अपेक्षित आहे यासंबंधी तुम्हीच तुमच्या स्वतःच्या कल्पनांची एक उभारणी केली आहे आणि तुम्हाला जे अनुभव येऊ लागले आहेत त्याचे मूल्यमापन तुम्ही त्या आधारावरच नेहमी करत आहात आणि ते अनुभव तुमच्या अपेक्षेला धरून नसल्यामुळे किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या तोलामोलाचे ते नसल्याने, तुम्ही एका क्षणानंतर म्हणू लागता की, “ते अनुभव अगदीच किरकोळ स्वरूपाचे आहेत.” आणि या असमाधानामुळेच तुम्ही प्रत्येक पावलागणिक (नकारार्थी) प्रतिक्रिया किंवा अंगचोरपणाकडे (recoil) वळत आहात आणि त्यामुळे सातत्यपूर्ण प्रगतीला खीळ बसत आहे.

ज्या योग्यांना अनुभूती येत असते त्यांना हे माहीत असते की, भलेही सुरुवातीस आलेले अनुभव अगदी किरकोळ असतील पण त्याला खूप महत्त्व असते आणि म्हणून सुरुवातीच्या त्या छोट्या-छोट्या अनुभवांची जोपासना केली पाहिजे आणि त्यांच्या विकसनासाठी पुष्कळ धीर धरला पाहिजे.

उदाहरणार्थ, तटस्थ अविचलता (neutral quiet) ही साधकाच्या प्राणिक अधीरतेला असमाधानकारक वाटू शकते पण तीच अवचिलता ही, सर्व आकलनाच्या अतीत असणाऱ्या शांतीकडे नेणारे पहिले पाऊल असू शकते. आंतरिक आनंदाची एखादी बारीकशी झुळूक किंवा चित्तथरार हा आनंदसागरामधील पहिलावहिला तुषार असू शकतो. (मिटल्या डोळ्यांपुढे चालणारा) प्रकाशाचा किंवा रंगांचा खेळ ही अंतर्दृष्टी आणि आंतरिक अनुभूतींची दालनं खुली करणारी गुरुकिल्ली असू शकते. दिव्य शक्तीच्या अवतरणांमुळे, शरीराचे होणारे स्तंभन आणि त्यातून शरीराचे स्थिरपणाने एकाग्र होणे, म्हणजे ज्याच्या अखेरीस ईश्वराची उपस्थिती आहे, अशा कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा पहिला स्पर्श असू शकतो; हे त्या योग्यांना माहीत असते. तो योगी अधीर नसतो. तर सुरू झालेल्या प्रगतीमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये याची तो काळजी घेत असतो.

निश्चितपणे, काही साधकांना साधनेच्या आरंभिक काळात निर्णायक आणि ठोस अनुभव आलेले असतात पण त्यानंतर दीर्घ परिश्रम करावेच लागतात आणि त्यामध्ये काही कालावधी अनुभवविरहित किंवा संघर्षाचे असतात.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 14-15)

अधिक गहन व आध्यात्मिक अर्थाने सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे ती गोष्ट, जेव्हा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही अधिक वास्तव व गतिशील आणि चेतनेच्या दृष्टीने अधिक निकट असल्याचे जाणवते, तेव्हा अशा साक्षात्काराला ‘सघन साक्षात्कार’ (concrete realisation) म्हणतात.

अशा प्रकारे सगुण ईश्वराचा (personal Divine) किंवा निर्गुण ब्रह्माचा (impersonal Brahman) किंवा आत्म्याचा (Self) साक्षात्कार हा सहसा, साधनेच्या प्रारंभीच किंवा साधनेच्या पहिल्या काही वर्षांत होत नाही किंवा साधनेला खूप वर्ष झाली तरीही होत नाही. साधनेच्या प्रारंभीच असा साक्षात्कार होणे ही गोष्ट फारच थोड्या जणांच्या बाबतीत घडते. कोणतीही योगसाधना न करतासुद्धा, लंडनमध्ये मला आलेल्या अनुभवानंतर, पंधरा वर्षांनी म्हणजे, मी योगसाधनेला सुरुवात केल्यानंतर, पाचव्या वर्षी मला तो अनुभव आला. आणि तो सुद्धा माझ्या दृष्टीने खूप असाधारणरित्या लवकरच आलेला आहे, जणू जलदगती आगगाडीचा वेगच. अर्थात, यापेक्षाही अधिक लवकर काही उपलब्धी घडून आल्या आहेत, यात शंका नाही.

पण इतक्या लवकर त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्याची मागणी करणे आणि अनुभव आला नाही म्हणून हताश होणे, तसेच युगा-युगामध्ये दोन तीन व्यक्तींचा अपवाद वगळता, इतरांना हा योग करता येणे अशक्य आहे असे म्हणणे, ही गोष्ट एखाद्या अनुभवी योग्याच्या किंवा साधकाच्या दृष्टीने पाहता, उतावळ्या आणि विकृत अधीरतेमध्ये गणली जाईल. बहुतेक जण हेच सांगतील की, पहिल्या काही वर्षांमध्ये धीम्या गतीने प्रगतीची आशा बाळगणे हे चांगले. आणि जेव्हा प्रकृती तयार होते आणि जेव्हा ती पूर्णपणे ईश्वराभिमुख होते, तेव्हाच असे परिपक्व अनुभव येऊ शकतात.

काही जणांच्या बाबतीत तुलनेने अगदी सुरुवातीच्या काळात देखील, काही पूर्वतयारी करून घेणारे अनुभव अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, पण तेथेही चेतनायुक्त परिश्रम करावेच लागतात, त्यापासून त्यांची सुटका नसते; या प्रयत्नांमुळे पुढे अशा अनुभवांची, चिरस्थायी आणि परिपूर्ण अशा साक्षात्कारामध्ये परिणती होते…

वास्तविक, जी माणसं कृतज्ञ असतात, आनंदी असतात; आवश्यकता पडली तर, अगदी छोटी छोटी पावले का असेनात, पण एकेक पाऊल टाकण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसंच खरंतर अधिक वेगाने वाटचाल करतात आणि आणि जे प्रत्येक पावलागणिक निराश होतात, कुरकूर करत राहतात अशा अधीर, उतावळ्या लोकांपेक्षा ही माणसं अधिक खात्रीने वाटचाल करतात. मला तरी नेहमी असेच आढळून आले आहे; याला विरोधी अशीही काही उदाहरणे असतील देखील, पण मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्ही ‘आशा, उत्साह आणि श्रद्धा’ कायम बाळगू शकलात तर, अधिक मोठ्या शक्यतेला वाव असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 112)