ईश्वरी कृपा – १४

“खरोखरच, ईश्वरच साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर एखाद्याने पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या नाहीत तर त्याच्या सर्व चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करणारा ईश्वरच असतो.”
— श्रीमाताजी

(आपल्या ह्या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी एके ठिकाणी म्हणतात की,)

“व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. एखादी व्यक्ती जेव्हा चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचा तिच्या जीवनात काही ना काही परिणाम होत असतोच, ते कर्म संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची ताकद असते; पण यासाठी व्यक्तिने त्याच दोषाची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनिश्चित काळपर्यंत करत राहील आणि ईश्वरी ‘कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनिश्चित काळपर्यंत करत राहील, असे व्यक्तिने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नाही. भूतकाळाचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही, इतका भूतकाळ पुसला जाऊ शकतो, शुद्ध केला जाऊ शकतो. मात्र एक अट आहे – व्यक्तीने तो भूतकाळ पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढून आणता कामा नये, या एकाच अटीवर तो विशुद्ध केला जाऊ शकतो. तुम्ही स्वतःहूनच तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनिश्चित काळपर्यंत निर्माण करत राहता कामा नये.”

– श्रीमाताजी
(CWM 09 : 58)

ईश्वरी कृपा – १३

अज्ञानमूलक चुकांची दुरुस्ती करणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो, पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा लावलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा… असे करणे म्हणजे, अंधाराला हेतुत: परत बोलावण्यासारखेच आहे.

…ज्यांनी स्वतःला सुधारण्याचा निश्चय केलेला असतो त्यांना साहाय्य करण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ नेहमीच उपस्थित असते आणि त्यामुळे, “स्वतःला सुधारण्यासाठी आम्ही खूप कमकुवत आहोत,’ असे ते म्हणू शकत नाहीत. ते फार फार तर असे म्हणू शकतात की, त्यांनी स्वतःला सुधारण्याचा संकल्पच अजून केलेला नाही, म्हणजे त्यांच्या अस्तित्वामध्ये कोठेतरी असे काहीतरी असते की, ज्याने तो संकल्प केलेला नसतो, आणि हे मात्र अधिक गंभीर असते.

कमकुवत असल्याचा युक्तिवाद हे एक निमित्त असते. ज्यांनी संकल्प केलेला असतो त्यांना परमोच्च सामर्थ्य देण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ असतेच.

याचा अर्थ असा की, कमकुवतपणाचा युक्तिवाद हा युक्तिवाद नसतो तर तो अप्रामाणिकपणा असतो. आणि अप्रामाणिकपणा म्हणजे शत्रुसाठी नेहमीच मुक्तद्वार असते; म्हणजे तेथे विपरित गोष्टींबाबतची एक सुप्त सहानुभूती असते आणि ती गोष्ट अधिक गंभीर असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 306-307)

ईश्वरी कृपा – १२

आत्यंतिक जडभौतिक चेतनेला, आत्यंतिक जडभौतिक मनाला चाबकाने फटकारल्यावरच काम करण्याची, प्रयत्न करण्याची आणि प्रगत होण्याची सवय झालेली असते; अन्यथा ते तमस असते. आणि जेव्हा कधी मन कल्पना करते, तेव्हा ते नेहमी अडीअडचणींची, अडथळ्यांची व विरोधाचीच कल्पना करते आणि त्यामुळे गती मोठ्या प्रमाणात मंदावते. सर्व अपयशांच्या पाठीमागे ‘यश’ असते; सर्व वेदना, दुःखभोग, विरोधाभास या साऱ्यांच्या पाठीमागे ‘आनंद’ असतो; सर्व अडीअडचणींच्या पाठीमागे ‘ईश्वरी कृपा’ असते, हे पटवून देण्यासाठी अत्यंत सघन, अत्यंत स्पर्श्य आणि बरेचदा पुन्हापुन्हा येणाऱ्या अनुभूतींची आवश्यकता असते.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 02)

ईश्वरी कृपा – ११

मनाच्या पलीकडे, ‘ईश्वरी कृपे’वरील श्रद्धाच आपल्याला सर्व अग्निपरीक्षांमधून बाहेर पडण्याचे, आपल्या सर्व दुर्बलतांवर मात करण्याचे सामर्थ्य देते आणि ती श्रद्धाच आपला दिव्य चेतनेशी संपर्क करून देते, ही ‘दिव्य चेतना’ आपल्याला केवळ शांती आणि आनंदच देत नाही तर, शारीरिक संतुलन आणि उत्तम आरोग्यसुद्धा प्रदान करते, ही सारी शिकवण आपल्याला देण्यासाठीच जीवनातील सर्व परिस्थिती घडविण्यात आलेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 320)

ईश्वरी कृपा – १०

(तुम्ही केलेल्या धाव्याला ईश्वरी कृपेने प्रतिसाद दिला आणि नंतर ईश्वरी कृपेमुळे आपण संकटातून, अडचणीमधून बाहेर पडलो हे विसरलात तर काय होते, त्याबद्दल श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

तुम्ही कडीकोयंडा लावून दरवाजा बंद करून टाकता आणि त्यानंतर मग तुम्ही काहीही ग्रहण करू शकत नाही. तुमच्या अशा प्रकारच्या आंतरिक मूर्खपणापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतः काहीच करू शकत नाही, याची तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव व्हावी म्हणून, पुन्हा एखादा तीव्र झटका, एखादी भयानक अडचण आवश्यक होऊन बसते. कारण आपण शक्तिहीन आहोत याची जाणीव जेव्हा तुमच्यामध्ये वाढू लागते तेव्हाच, तुम्ही थोडेसे खुले आणि लवचीक होऊ लागता. कारण, तुम्ही जे काही करता ते तुमच्या स्वतःच्या कौशल्यावर आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून आहे असे जोवर तुम्हाला वाटत असते तोवर, तुम्ही एकच दरवाजा बंद करता असे नाही, तर खरोखरच तुम्ही एकापाठोपाठ अनेक दरवाजे बंद करत असता, अगदी कडीकोयंडे लावून ते बंद करत असता. तुम्ही जणू काही एखाद्या गढीमध्ये स्वतःला बंद करून घेता आणि मग त्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा प्रवेश होऊ शकत नाही. ही मोठीच उणीव आहे, व्यक्ती चटकन साऱ्या गोष्टी विसरून जाते. स्वाभाविकपणे ती स्वतःच्याच क्षमतांवर समाधानी राहते.

प्रामाणिक असणे खरोखरच खूप कठीण असते… आणि म्हणूनच धक्क्या-चपेट्यांची संख्या वाढते आणि ते आघात कधी कधी अधिक भयानक होतात कारण तुमच्यामधील मूर्खपणा मोडीत काढण्याचा तो एकमेव मार्ग असतो; याप्रकारे आपत्तींचे स्पष्टीकरण करता येते. फक्त जेव्हा तुम्ही अतीव वेदनादायी अशा परिस्थितिमध्ये सापडलेले असता आणि तुमच्यावर खोलवर परिणाम करेल अशा परिस्थितिला तुम्हाला सामोरे जावे लागते, तेव्हा तुमच्यातील मूर्खपणा काही अंशाने का होईना नाहीसा होतो. पण तो अगदी काही अंशाने जरी नाहीसा झाला तरी, अजूनही आतमध्ये काहीतरी शिल्लक राहतेच. आणि म्हणूनच या साऱ्या गोष्टी इतक्या दीर्घकाळ चालू राहतात…

आपण म्हणजे कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपण अस्तित्वातच नाही, आपण खरोखर अगदी कोणीच नाही, त्या दिव्य चेतनेखेरीज आणि ईश्वरी कृपेखेरीज खरोखर कोणते अस्तित्वच नाही, याची व्यक्तिला खोल अंतःकरणात जाण येण्यासाठी, जीवनामध्ये कितीतरी धक्केचपेटे आवश्यक असतात. आणि ज्या क्षणी व्यक्तिला या गोष्टीची जाण येते तेव्हा सारे (दुःखभोग) संपलेले असतात, साऱ्या अडचणी नाहीशा झालेल्या असतात. व्यक्तिला हे पूर्णपणे कळावे लागते आणि त्याला विरोध करणारे तिच्यामध्ये काहीच शिल्लक राहता कामा नये… अर्थात या गोष्टीला खूप काळ लागतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 323-324)

ईश्वरी कृपा – ०८

एक अशी ‘सत्ता’ आहे, जिच्यावर कोणताही सत्ताधीश हुकमत गाजवू शकणार नाही; असा एक ‘आनंद’ आहे की, जो कोणत्याही लौकिक यशातून प्राप्त होणार नाही; असा एक ‘प्रकाश’ आहे, जो कोणत्याही प्रज्ञेच्या ताब्यात असणार नाही; असे एक ‘ज्ञान’ आहे की, ज्यावर कोणतेही तत्त्वज्ञान किंवा कोणतेही विज्ञान प्रभुत्व मिळवू शकणार नाही; एक असा ‘परमानंद’ आहे की, कोणत्याही इच्छापूर्तीच्या समाधानातून तसा आनंद मिळू शकणार नाही; अशी एक ‘प्रेमा’ची तृष्णा आहे, जिची तृप्ती कोणत्याही मानवी नातेसंबंधातून होऊ शकत नाही; अशी एक ‘शांती’ आहे, जी व्यक्तिला कोठेच प्राप्त होत नाही, अगदी मृत्युमध्येसुद्धा प्राप्त होत नाही. ही ‘सत्ता’, हा ‘आनंद’, हा ‘प्रकाश’, हे ‘ज्ञान’, हा ‘परमानंद’, हे ‘प्रेम’, ही ‘शांती’ ‘ईश्वरी कृपे’पासूनच प्रवाहित होते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 380)

ईश्वरी कृपा – ०७

व्यक्ती संपूर्ण समर्पणाच्या स्थितीत असेल आणि तिने स्वत:चे सर्वस्व समर्पित केले असेल, तिने जर त्या ईश्वरी ‘कृपे’स स्वत:ला देऊ केले असेल आणि त्या कृपेला जे योग्य वाटते ते तिने आपल्या बाबतीत करावे अशी त्या व्यक्तिची भावना असेल तर, ते अधिक चांगले! पण त्यानंतर मात्र “ईश्वरी कृपेने हे काय केले, ते का केले” असे प्रश्न तिला विचारता कामा नयेत. व्यक्तिने असे म्हणता कामा नये की, “मला असे होईल असे वाटले होते, म्हणून मी असे असे केले,” कारण व्यक्तिला खरोखरच काहीतरी हवे असेल आणि त्या भावनेने साद घालायची असेल तर जे काही हवे, जसे काही हवे ते अगदी साधेपणाने, प्रामाणिकपणाने शब्दांत मांडणे केव्हाही चांगले. त्यानंतर, ईश्वरी ‘कृपा’ तसे करायचे किंवा नाही ते ठरवेल; पण कोणत्याही परिस्थितित, व्यक्तिने तिला काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे मांडणे केव्हाही चांगले ; त्यात काही गैर नाही.

जेव्हा केलेली मागणी मान्य केली जात नाही आणि अशा वेळी व्यक्ती बंड करून उठते तेव्हा मात्र गोष्टी बिघडून जातात. तेव्हा अर्थातच सारे काही बिनसते. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा व्यक्तिने समजून घेतले पाहिजे की, तिची जी इच्छा असते, अभीप्सा असते, ती नेहमीच प्रबुद्ध असेल असे नाही. तसेच त्या व्यक्तिसाठी जे हितावह होते त्याचीच तिने मागणी केलेली असेल, असेही नाही. अशा वेळी व्यक्तिने थोडेसे समजूतदार झाले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, “ठीक आहे, जशी तुझी इच्छा.” पण जोवर व्यक्तिला आतून काही आवडीनिवडी आहेत, अग्रक्रम आहेत तेव्हा तिने ते शब्दांमध्ये मांडण्यात गैर काही नाही. ती अगदी स्वाभाविक अशी क्रिया आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्याने मूर्खपणा केला असेल, काहीतरी चूक केली असेल आणि त्या व्यक्तिला खरोखर, मनापासून तशी चूक परत होऊ नये असे वाटत असेल, तर तशी विनवणी करण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. आणि खरंतर, व्यक्तिने अगदी अंत:करणपूर्वक, आंतरिक सचोटीने तशी विनवणी केली तर, तिची ती प्रार्थना मंजूर केली जाण्याची अधिक शक्यता असते.

तुम्हाला विरोध करणे हे ‘ईश्वरा’ला आवडते, असा विचार तुम्ही कधीच करता कामा नये. त्याला तसे करण्यामध्ये कोणताही रस नसतो. तुमच्यासाठी काय हिताचे आहे हे, तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले समजते; परंतु अगदी अनिवार्य असेल तेव्हाच तो तुमच्या इच्छेला विरोध करतो. अन्यथा तुम्ही जे काही मागितले असेल, ते द्यायला तो नेहमीच तत्पर असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 254-255)

ईश्वरी कृपा – ०६

(गूढविद्येचे कोणतेही ज्ञान नसतानादेखील, दूर अंतरावरील एखाद्या गरजू व्यक्तिला मदत किंवा संरक्षण पोहोचविणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला असता, श्रीमाताजींनी त्याचा एक मार्ग सांगितला, तो असा…)

व्यक्तिकडे जर (गूढविद्येचे) कोणतेही ज्ञान नसेल; पण तिचा ईश्वरी ‘कृपे’वर विश्वास असेल, – ईश्वरी ‘कृपा’ नावाची काहीतरी एक गोष्ट या विश्वामध्ये आहे, तीच आपल्या प्रार्थनेला, आपल्या अभीप्सेला, आपल्या हाकेला प्रतिसाद देते, अशी त्या व्यक्तिची श्रद्धा असेल आणि त्यावेळी व्यक्तिने मनोमय रचना करून, जर ती त्या ईश्वरी ‘कृपे’ला अर्पण केली आणि त्यावर विश्वास ठेवला, ईश्वरी ‘कृपे’ने हस्तक्षेप करावा म्हणून याचना केली आणि ईश्वरी ‘कृपा’ हस्तक्षेप करेलच अशी श्रद्धा बाळगली तर, ती यशस्वी होण्याची दाट शक्यता असते.

प्रयत्न करून पाहा, तुम्हाला खात्रीने त्याचे परिणाम दिसून येतील.

प्रश्न : ईश्वरी ‘कृपे’ने हस्तक्षेप करावा अशी मनापासून प्रार्थना जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा, तिला एखादा विशिष्ट असा परिणाम अपेक्षित असतो ना?

श्रीमाताजी : ते प्रार्थनेच्या भावार्थावर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तिने ईश्वराला किंवा ईश्वरी ‘कृपे’ला केवळ साद घातली आणि स्वत:ला त्याच्या हाती सोपवून दिले तर, ती व्यक्ती कोणत्याही विशिष्ट अशा फळाची अपेक्षा करत नसते. जर विशिष्ट परिणाम हवा असेल तर, व्यक्तिने स्वत:ची प्रार्थना स्वत:च शब्दबद्ध केली पाहिजे; व्यक्तिने त्यासाठी मागणी केली पाहिजे. तुम्ही जर ईश्वरी ‘कृपे’विषयी तीव्र आस बाळगत असाल, तिला आवाहन करत असाल, तिची विनवणी करत असाल आणि जर कोणतीही ठरावीक अशी तुमची मागणी नसेल तर, तुमच्या बाबतीत काय करायचे, हे ती ईश्वरी ‘कृपा’च ठरवेल, तुम्ही नाही.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 253-254)

ईश्वरी कृपा – ०५

ईश्वरासाठी जो अभीप्सा बाळगत असतो, त्याच्यासमोर नेहमी जी कोणती अडचण उभी राहते तीच स्वयमेव त्याच्यासाठी एक प्रवेशद्वार ठरते; त्या माध्यमातून तो स्वतःच्या व्यक्तिगत पद्धतीने ईश्वराची प्राप्ती करून घेणार असतो; त्याला ईश्वराच्या साक्षात्काराप्रत घेऊन जाणारा त्याचा तो विशिष्ट मार्ग असतो.

अशी देखील वस्तुस्थिती असते की, जर एखाद्याला शेकडो अडचणी आल्या तर, त्याला होणारा साक्षात्कारही विलक्षण असतो – अर्थात, हे उघड आहे की, त्याच्यामध्ये जर धीर आणि चिकाटी असेल, आणि ज्या दोषांमुळे अडचणी निर्माण झाल्या, त्या दोषांविरुद्ध अभीप्सेच्या अग्निची ज्वाला जर तो कायम तेवती ठेवेल, तरच त्याला तो तसा साक्षात्कार होईल.

आणि लक्षात ठेवा की : सर्वसाधारणपणे ईश्वराची कृपादेखील तुमच्या अडचणींच्या प्रमाणातच असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 :143)

ईश्वरी कृपा – ०४

प्रश्न : ईश्वराचा धावा केला तर ‘ईश्वरी कृपा’ हस्तक्षेप करते का?

श्रीमाताजी : धावा केला असताना? हो. मात्र केवळ त्यामुळेच आणि तेवढ्यासाठीच ‘ईश्वरी कृपा’ हस्तक्षेप करते असे मात्र नाही. पण खचितच, व्यक्तिची जर ईश्वरी कृपेवर श्रद्धा असेल आणि व्यक्ती तशी अभीप्सा बाळगत असेल आणि एखादे लहान मूल आईकडे धावत जाऊन जसे म्हणते की, “आई, मला अमुक अमुक दे,” त्या साधेपणाने जर व्यक्ती धावा करेल, आणि ईश्वरी कृपेकडे वळेल आणि म्हणेल, “मला अमुक अमुक दे,” तर माझा विश्वास आहे की, ती ते ऐकते. अर्थात व्यक्तिने स्वतःसाठी अहितकारक असेल असे जर काही मागितले तर मात्र ती ते ऐकत नाही. व्यक्ती जर काहीतरी घातक किंवा प्रतिकूल अशा एखाद्या गोष्टीची मागणी करेल, तर मग मात्र ती ऐकली जाणार नाही.

प्रश्न : हा धावा आणि त्याच्या परिणामाचे कारण काय?

श्रीमाताजी : कदाचित व्यक्तीने धावा करावा हे विधिलिखित असावे. म्हणजे ‘कोंबडी आधी की अंडे आधी?’ अशा सारखाच हा प्रकार आहे. ईश्वरी कृपेचा धावा करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणारी ‘ईश्वरी कृपा’च असते, का, ईश्वरी कृपेचा धावा केल्यामुळे ‘ईश्वरी कृपा’ होते, हे सांगणे कठीण आहे.

मूलतः श्रद्धेचाच अभाव असण्याची बहुतांशी शक्यता असते. आपल्या विचारांमध्येच एक छोटासा कोपरा असा असतो, की जो शंका उपस्थित करतो, वादविवाद करतो, आणि त्यानेच सारे काही बिनसून जाते. व्यक्ती जेव्हा अतिशय चिंताजनक परिस्थितिमध्ये असते, जेव्हा मनाला जाणवते की, ते काहीही करू शकत नाहीये, अगदी काहीच करू शकत नाहीये, जेव्हा ते अगदी वेड्यासारखे, असमर्थ होऊन चूपचाप उभे राहते, तेव्हा, त्या क्षणी, व्यक्ती जर उच्चतर मदतीसाठी धावा करेल, म्हणजे एखादी व्यक्ती निराशाग्रस्त असताना जसा धावा करते अगदी तेवढ्याच उत्कटतेने व्यक्ती धावा करेल, तर तेव्हा परिणाम दिसून येतो. पण जर का तुमचा विचार युक्तिवादच करत राहिला आणि म्हणाला, “हो, मी आस बाळगली आहे खरी, मी प्रार्थनाही केली आहे पण वेळ आली आहे की नाही देवच जाणे, आणि ईश्वरी कृपा होईल का, आणि ते शक्य आहे की नाही कोण जाणे,” असे झाले तर मग सगळेच संपून जाते, ती (‘ईश्वरी कृपा’) कार्य करत नाही. ही एक अगदी नेहमीच आढळून येणारी गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 366-367)