आत्मसाक्षात्कार – २८

(मागील भागावरून पुढे…)

(आत्मसाक्षात्कार २४ ते २८ हे भाग एकत्रित वाचल्यास श्रीअरविंद प्रणीत ‘दिव्य अतिमानव’ ही संकल्पना अधिक चांगल्या रितीने समजेल, असा विश्वास वाटतो.)

अतिमानस (Supermind) म्हणजे अतिमानव; त्यासाठी मनाच्या अतीत होणे ही अनिवार्य अट आहे.

अतिमानव होणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव-देवता या ईश्वराच्या शक्ती असतात. तुम्ही मानववंशामधील ईश्वराची शक्ती बनून राहा.

दिव्य अस्तित्वामध्ये वसती करून जीवन जगणे आणि आत्म्याच्या चेतनेला व परमानंदाला, आत्म्याच्या संकल्पशक्तीला व ज्ञानाला तुमचा ताबा घेऊ देणे आणि त्यांना तुमच्या समवेत व तुमच्या माध्यमातून लीला करू देणे, हा त्याचा अर्थ आहे.

हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वोच्च रूपांतरण असते. स्वत:मध्ये ईश्वराचा शोध घेणे आणि स्वत:च्या सर्व गोष्टींमध्ये त्याला प्रकट करणे हे सर्वोच्च रूपांतरण असते. त्याच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीसहित कृती करा, त्याच्या परमानंदामध्ये न्हाऊन निघा. तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा, आणि तो महासागर व्हा. तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ते सौंदर्य बना.

यांपैकी अंशभाग जरी तुम्ही प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवू शकलात तर, तुम्ही अतिमानवतेच्या (supermanhood) पहिल्या काही पायऱ्या गाठल्याप्रमाणे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 152)

‘आत्मसाक्षात्कार’ ही मालिका येथे समाप्त होत आहे. धन्यवाद!!

आत्मसाक्षात्कार – २७

(मागील भागावरून पुढे…)

उठा, (जागे व्हा आणि) स्वतःच्या अतीत जा, तुमचे स्वत:चे मूळ स्वरूप प्राप्त करून घ्या. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची समग्र प्रकृतीच अशी असते की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मानवामधील पशु-मानव (animal man) होता, तो आता त्याहूनही वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो सौंदर्योपासक आहे. पण त्याने आता विचारवंतापेक्षाही अधिक असे काही बनले पाहिजे; तो आता ज्ञानद्रष्टा झाला पाहिजे. त्याने आता कारागीरापेक्षा अधिक काही बनले पाहिजे; तो निर्माणकर्ता आणि त्याच्या निर्मितीचा स्वामी झाला पाहिजे. त्याने आता केवळ सौंदर्योपासक न राहता, अधिक काही बनले पाहिजे; कारण तो सर्व सौंदर्य आणि सर्व आनंद यांचा आस्वाद घेऊ शकतो.

मनुष्य हा शरीरधारी असल्यामुळे, तो त्याचे अमर्त्य सत्त्व (substance) मिळविण्यासाठी धडपडतो; तो प्राणमय जीव असल्यामुळे, तो अमर्त्य जीवनासाठी आणि त्याच्या अस्तित्वाच्या अनंत सामर्थ्यासाठी धडपडतो; तो मनोमय जीव असल्यामुळे आणि त्याच्याकडील ज्ञान आंशिक असल्यामुळे, तो संपूर्ण प्रकाश आणि शुद्ध दृष्टी यांच्या प्राप्तीसाठी धडपडतो.

हे सर्व प्राप्त करून घेणे म्हणजे अतिमानव बनणे; कारण तसे बनणे म्हणजे मनामधून अतिमानसाकडे उन्नत होणे. त्याला ‘दिव्य मन’ किंवा ‘दिव्य ज्ञान’ किंवा ‘अतिमानस’ काहीही नाव द्या; ते दिव्य संकल्पाची आणि दिव्य चेतनेची शक्ती व प्रकाश असतात. चैतन्याने (Spirit) अतिमानसाच्या माध्यमातून पाहिले आणि त्याने या जगतांमध्ये (worlds) स्वत:ची निर्मिती केली, अतिमानसाच्याद्वारे ते चैतन्य त्या जगतांमध्ये निवास करते आणि त्यांचे शासन करते. त्याच्यामुळेच ते स्वराट आणि सम्राट, म्हणजे अनुक्रमे स्व-सत्ताधीश आणि सर्व-सत्ताधीश आहे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 151-152)

आत्मसाक्षात्कार – २६

(मागील भागावरून पुढे…)

तुम्ही आत्म्यामध्ये मुक्त व्हा आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये स्वतंत्र व्हाल. कारण चैतन्य म्हणजे स्वातंत्र्य.

तुम्ही ईश्वर आणि सर्व जिवांशी एकरूप व्हा. तुम्ही तुमच्या क्षुद्र अहंकारामध्ये नव्हे तर, आत्म्यामध्ये राहून जीवन जगा. कारण चैतन्य म्हणजे एकत्व.

तुम्ही मृत्युवर विश्वास ठेवू नका. ‘स्व’ बना, अमर्त्य व्हा; कारण मृत्यू तुमच्या शरीराचा होतो, तुमचा नव्हे. कारण चैतन्य म्हणजे अमर्त्यत्व.

अमर्त्य असणे म्हणजे तुमचे अस्तित्व, तुमची चेतना आणि तुमचा आनंद अनंत असणे; कारण चैतन्य हे अनंत असते आणि सांत गोष्टी (finite) या केवळ अनंततेमुळेच जीवित असतात.

(स्वातंत्र्य, एकत्व, अमर्त्यत्व, अनंतत्व) या गोष्टी म्हणजे तुम्ही आहात, त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी बनू शकता; कारण या गोष्टी म्हणजे जर तुम्ही नसता, तर त्या गोष्टी म्हणजे तुम्ही कधीच बनू शकला नसतात. जे तुमच्या अंतरंगात असते, केवळ त्याचेच तुमच्या अस्तित्वामध्ये प्रकटीकरण होऊ शकते. मात्र तुम्ही आहात त्यापेक्षा काहीतरी वेगळेच (म्हणजे बद्ध, विभक्त, मर्त्य, सीमित) असल्याचे तुम्ही दिसता.

आणि मग, जर का (स्वातंत्र्य, एकत्व, अमर्त्यत्व, अनंतत्व या गोष्टी म्हणजे तुम्ही आहात) तर, तुम्ही दृश्य रूपांचे गुलाम होऊन का राहावे बरे? (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 12 : 151)

आत्मसाक्षात्कार – २५

(मागील भागावरून पुढे…)

इथे तुम्ही कोणतीही चूक करता कामा नये. कारण ही चूक म्हणजे स्वतःला न जाणणे. तीच तुमच्या सर्व दुःखांचे उगमस्थान असते आणि तुमच्या सर्व अध:पतनाचे कारण असते.

तुम्हाला जो ‘मी’ आहे असे वाटते, त्या ‘मी’च्या अतीत तुम्ही गेलेच पाहिजे आणि तुम्ही ज्याला मनुष्य म्हणून ओळखता तो मनुष्य म्हणजे प्रकट ‘पुरुष’ असतो. आणि हा मनुष्य म्हणजे कोण? मनुष्य म्हणजे प्राण आणि जडभौतिक शरीर यांचा गुलाम असलेला मनोमय पुरुष असतो. आणि जेथे तो प्राण व शरीर यांचा गुलाम झालेला नसतो, तेथे तो त्याच्या मनाचा गुलाम असतो. पण ही फार मोठी गुलामी असते, कारण मनाचे गुलाम असणे म्हणजे मिथ्यत्वाचे, मर्यादिततेचे आणि व्यक्ताचे, दृश्याचे (apparent) गुलाम असणे होय. जो ‘स्व’ हा मन, प्राण आणि शरीर यांच्या पडद्याआड अंतरंगामध्ये असतो, तो ‘स्व’ तुम्ही बनले पाहिजे. आध्यात्मिक बनणे, दिव्य बनणे, अतिमानव, खरा ‘पुरुष’ बनणे म्हणजे ‘स्व’ बनणे. कारण मनोमय पुरुषाच्या ऊर्ध्वस्थित जर कोणी असेल तर तो ‘अतिमानव’ (superman) असतो.

अतिमानव बनणे म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे, तुमच्या प्राणाचे आणि तुमच्या शरीराचे स्वामी बनणे; आत्ता तुम्ही ज्या प्रकृतीच्या हातचे साधन आहात, त्या प्रकृतीचे तुम्ही सम्राट बनणे. आत्ता तुम्ही तिच्या पायाखाली आहात, तेच तुम्ही तिच्याही वर जाण्यासाठी उचलले जाणे म्हणजे अतिमानव बनणे. अतिमानव बनणे म्हणजे गुलाम नव्हे तर, मुक्त होणे; विभक्त असणे नव्हे तर एकत्व पावणे; मृत्युने झाकोळलेले नसणे तर अमर्त्य असणे, अंधकारमय नव्हे तर संपूर्ण प्रकाशमान असणे; दुःखशोक यांच्या खेळामध्ये नसणे तर पूर्णतया आनंदमय असणे; दुर्बलतेच्या गर्तेत जाऊन पडणे नव्हे तर शक्तिसामर्थ्यामध्ये उन्नत होणे. अतिमानव बनणे म्हणजे अनंतामध्ये जीवन जगणे आणि सांत गोष्टींवर (finite) ताबा मिळवणे. अतिमानव बनणे म्हणजे ईश्वरामध्ये जीवन जगणे आणि त्याच्या अस्तित्वामध्ये राहून त्याच्याशी एकत्व अनुभवणे. हे सर्व बनणे आणि त्यापासून प्रवाहित होणाऱ्या साऱ्या गोष्टी बनणे म्हणजे ‘स्व’ बनणे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150-151)

आत्मसाक्षात्कार – २४

(‘अतिमानव होणे म्हणजे काय’, ही संकल्पना श्रीअरविंदांनी येथे सुस्पष्ट करून सांगितली आहे. हा मजकूर दीर्घ असल्याने क्रमश: देत आहोत…)

परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हे तुमचे कार्य आहे आणि हे तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आहे आणि त्याचसाठी तुम्ही इथे आहात. या व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला करावे लागेल ते म्हणजे एकतर तुमची तयारी करून घेणे आहे किंवा तो मार्गावरील आनंद आहे; अन्यथा ते म्हणजे उद्देशापासून स्खलन, ध्येयच्युती आहे. या मार्गाच्या आधारे मिळणारी सत्ता वा शक्तिसामर्थ्य किंवा मार्गावरील आनंद हे तुमचे गंतव्य आणि प्रयोजन नसून, (परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे) हेच तुमचे गंतव्य आणि प्रयोजन आहे; त्या ध्येयपूर्तीच्या आनंदामध्ये तुमच्या अस्तित्वाची महानता आणि आनंद सामावलेला आहे. तुम्हाला मार्गावरील हा आनंद मिळत आहे कारण तुम्हाला ज्याचा वेध लागला आहे, तो (ईश्वर) देखील या मार्गावर तुमच्यासोबत आहे. तुम्ही तुमची सर्वोच्च शिखरे सर करावीत यासाठीच आरोहणाची शक्ती तुम्हाला प्रदान करण्यात आली आहे.

तुमचे काही कर्तव्य असेलच तर ते हेच आहे! तुमचे ध्येय काय असावे असे जर तुम्ही विचारत असाल, तर ते ध्येय हेच असावे. तुम्ही जर सुखाची अभिलाषा बाळगत असाल तर उपरोक्त गोष्टीइतका आनंद तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत लाभणार नाही. कारण स्वप्नांचा आनंद असो, झोपेचा आनंद असो किंवा स्व-विस्मृतीचा आनंद असो, हे सारे आनंद खंडित वा मर्यादित असतात. पण उपरोक्त आनंद मात्र तुमच्या समग्र अस्तित्वाचा आनंद असतो. तुम्ही जर असे विचारत असाल की, माझे अस्तित्व काय आहे, तर ‘ईश्वर’ हेच तुमचे अस्तित्व आहे आणि इतर सर्वकाही ही त्याची केवळ खंडित वा विपर्यस्त रूपे आहेत. तुम्ही जर ‘सत्य’ शोधू पाहात असाल, तर ते ‘सत्य’ हेच आहे. सातत्याने तेच तुमच्या दृष्टीसमोर असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्याच्याशीच एकनिष्ठ राहा. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150)

आत्मसाक्षात्कार – २३

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

निश्चितच, ‘अधिमानस’ (Overmind) किंवा ‘अतिमानसा’च्या (Supermind) विकसनाच्या कितीतरी आधी ‘चैतन्या’चा (Spirit) साक्षात्कार होतो. प्रत्येक काळातल्या शेकडो साधकांना आजवर उच्चतर मनाच्या पातळीवर आत्मसाक्षात्कार झालेला आहे पण म्हणून त्यांना अतिमानसिक साक्षात्कार झाला आहे असे नाही. व्यक्तीला ‘आत्म्या’चा किंवा ‘चैतन्या’चा किंवा ‘ईश्वरा’चा मानसिक, प्राणिक किंवा अगदी शारीरिक पातळीवरही ‘आंशिक’ साक्षात्कार (partial realisations) होऊ शकतो मात्र व्यक्ती जेव्हा मनुष्याच्या सामान्य मानसिक पातळीच्या वर उच्चतर आणि विशालतर मनामध्ये उन्नत होते तेव्हा, ‘आत्मा’ त्याच्या सर्व सचेत व्यापकतेनिशी प्रकट व्हायला सुरुवात होते.

‘आत्म्या’च्या या व्यापकतेमध्ये संपूर्णतया प्रवेश केल्यामुळे, मानसिक कृती विराम पावणे शक्य होते आणि व्यक्तीला आंतरिक नीरवता लाभते. आणि मग त्यानंतर, व्यक्ती कोणत्याही प्रकारची कृती करत असली तरी तिच्यामधील ही आंतरिक नीरवता तशीच टिकून राहते; व्यक्ती अंतरंगांतून शांत-नीरव राहते. साधनभूत अस्तित्वामध्ये कृती चालू राहते आणि या कृतीच्या अंमलबजावणीसाठी — मग ती कृती मानसिक असो, प्राणिक असो किंवा शारीरिक असो — त्या कृतीसाठी आवश्यक असणारे सर्व संकेत, आत्म्याच्या या सारभूत शांतीला आणि स्थिरतेला धक्का न पोहोचवता, उच्चतर स्त्रोतापासून मिळत राहतात.

मात्र वर वर्णन केलेल्या अवस्थेपेक्षा ‘अधिमानसिक’ आणि ‘अतिमानसिक’ अवस्था या अधिक उच्च स्तरावरील असतात. व्यक्तीला त्यांचे आकलन व्हायला हवे असेल तर, तिला आधी आत्म-साक्षात्कार झालेला असला पाहिजे; आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाची व हृदयाची पूर्ण कृती तिच्या ठिकाणी होत असली पाहिजे; तिच्या ठिकाणी अंतरात्म्याबाबतची जागृती झालेली असली पाहिजे; बंदिस्त असलेल्या चेतनेची मुक्ती, तसेच आधाराचे शुद्धीकरण व त्याचे पूर्णतया उन्मीलन (opening) झालेले असले पाहिजे. त्यामुळे मुक्त झालेल्या प्रकृतीमध्ये, प्रथम उपरोक्त अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 413)

आत्मसाक्षात्कार – २२

पूर्णयोगाचे मूलभूत साक्षात्कार खालीलप्रमाणे आहेत.

१) संपूर्ण भक्ती ही ज्यायोगे हृदयाची मुख्य प्रेरणा व विचारांची स्वामिनी बनेल आणि ज्यायोगे जीवन व कर्म ‘श्रीमाताजीं’च्या आणि त्यांच्या ‘उपस्थिती’च्या नित्य एकत्वात घडत राहील अशा प्रकारचे चैत्य, अंतरात्मिक परिवर्तन (psychic change) घडणे.

२) शरीराच्या पेशी न्‌ पेशी ज्यामुळे भारल्या जातील अशा प्रकारे, ‘उच्चतर चेतने’च्या ‘शांती, प्रकाश, शक्ती’ इत्यादी गोष्टींचे मस्तकाद्वारे व हृदयाद्वारे संपूर्ण अस्तित्वामध्ये अवतरण होणे.

३) सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या ‘एकमेवाद्वितीय’ अशा ईश्वराची व श्रीमाताजींची अनुभूती येणे आणि त्या अनंत चेतनेमध्ये वास्तव्य घडणे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

आत्मसाक्षात्कार – २१

खालील चार गोष्टींवर साक्षात्कार आधारित केला गेला पाहिजे.

१) मनाच्या वर असणाऱ्या केंद्रामध्ये उन्नत होणे
२) वैश्विक चेतनेप्रत खुले होणे
३) चैत्य खुलेपण
४) उच्चतर चेतनेचे तिच्या शांती, प्रकाश, शक्ती, ज्ञान, आनंद इत्यादीसहित अस्तित्वाच्या अगदी भौतिक स्तरापर्यंतच्या सर्व स्तरांमध्ये अवतरण होणे.

श्रीमाताजींच्या शक्ती-कार्याला तुमच्या अभीप्सेची, श्रद्धेची आणि समर्पणाची जोड देऊन, उपरोक्त साऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. हाच मार्ग आहे. बाकी साऱ्या गोष्टी म्हणजे या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत, आणि त्यासाठी श्रीमाताजी तुमच्यामध्ये जे कार्य करत आहेत त्यावर श्रद्धा असणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

आत्मसाक्षात्कार – २०

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

ज्या विशालतेमध्ये, नितांत अशा स्थिर-प्रशांततेमध्ये आणि निश्चल-नीरवतेमध्ये विलीन झाल्याची जाणीव तुम्हाला होत आहे त्यालाच ‘आत्मा’ किंवा ‘शांत-ब्रह्म’ असे संबोधले जाते. या आत्म्याचा किंवा शांत-ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे आणि त्यामध्ये निवास करणे हेच अनेक योगमार्गांचे संपूर्ण ध्येय असते. परंतु आपल्या योगामधील (पूर्णयोगामधील) ईश्वराच्या साक्षात्काराची आणि रूपांतरणाची ही केवळ पहिली पायरी आहे. जीव उच्चतर किंवा दिव्य चेतनेमध्ये वृद्धिंगत होत जाणे यालाच आम्ही ‘रूपांतरण’ असे संबोधतो.

*

एखादा साधक, ‘अवैयक्तिक, निर्गुण ब्रह्मा’पाशीच थांबला आणि त्याने पुढे वाटचालच केली नाही तर मग, तो ‘पूर्णयोगाचा साधक’ आहे, असे म्हणता येणार नाही. ‘निर्गुण साक्षात्कार’ हा स्वयमेव शांत-‘आत्म्याचा’, विशुद्ध ‘सत्‌-चित्‌-आनंदा’चा साक्षात्कार असतो, पण त्यामध्ये ‘सत्यमया’ची, ‘चैतन्यमया’ची, ‘आनंदमया’ची कोणतीही जाणीव नसते. (म्हणजे हे सगुण-साकार विश्व सत्यमय, चैतन्यमय आणि आनंदमय असल्याची जाणीव नसते.) त्यामुळे हा साक्षात्कार ‘निर्वाणा’कडे घेऊन जातो.

आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी असली किंवा समग्र ज्ञानाचा तो एक महत्त्वाचा भाग असला तरी, समग्र ज्ञानामधील ती केवळ एक पायरी असते. सर्वोच्च साक्षात्काराचे ते अंतिम साध्य नसते, तर तो केवळ प्रारंभ असतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 393)

आत्मसाक्षात्कार – १९

ईश्वराचा साक्षात्कार हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि एखादी गोष्ट जर त्याकडे घेऊन जाणारी असेल किंवा त्यासाठी साहाय्यक ठरत असेल किंवा जर ती गोष्ट प्रत्यक्षात आणल्याने तो साक्षात्कार अधिक व्यापक होणार असेल किंवा त्या साक्षात्काराचे आविष्करण होणार असेल, तरच ती गोष्ट इष्ट असते.

साक्षात्कारासाठी वैयक्तिक व सामूहिक साधना आणि ईश्वराचा साक्षात्कार झालेल्या व्यक्तींचे सामुदायिक जीवन ही, ईश्वरी कार्यासाठी समग्र जीवनाचे सुसंघटन किंवा आविष्करण करण्यासाठी आवश्यक असणारी पहिली आवश्यक गोष्ट आहे. आणि यासाठी आवश्यक असणारी दुसरी गोष्ट म्हणजे, ‘प्रकाशा’प्रत वळण्यासाठी आणि त्यामध्ये जीवन जगता यावे यासाठी जगाला मदत करणे. हे माझ्या योगाचे (पूर्णयोगाचे) प्रयोजन आहे आणि तोच त्याचा सर्वार्थ आहे.

परंतु साक्षात्कार ही पहिली आवश्यक गोष्ट आहे आणि त्या भोवतीच सारे काही फिरत असते; अन्यथा, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीला काही अर्थ नाही.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 784)