पूर्णयोग आणि बौद्धमत – १२
धम्मपद : आपण अशा साधुपुरुषाच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे की जो आपल्याला आपले दोष दाखवून देतो. तो जणू काही आपला गुप्त खजिनाच आपल्याला दाखवून देतो. अशा व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावयास हवेत, कारण तो आपल्याला कोणतीही इजा पोहोचवित नाही. तो आपल्यासाठी हितकारकच ठरेल.
श्रीमाताजी : मानवीप्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे, पण येथे तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा ते म्हणजे जणू काही तुम्हाला अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे वाटेल.
“अरे देवा, अजून एक दोष !” असे म्हणत न बसता व त्याविषयी खंत बाळगत न बसता उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आली आहे. आणि एकदा का तुमच्या ती गोष्ट पकडीत आली की तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की जो योगसाधना करतो, त्याला ज्या क्षणी अमुक एक गोष्ट करण्याजोगी नाही असे समजते, त्याच क्षणी ती दूर सारणे, बाद करणे आणि नष्ट करणे ही शक्ती त्याच्या ठायी असते.
दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर घालवून दिलेल्या धूसतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.
जर तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तिचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे, ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट असता कामा नये ह्याची जाणीव होणे आणि तरी ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तिचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की, अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तिला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमची प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.
अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. ह्याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, ज्याला शोधून कोणत्याही परिस्थितीत नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 221)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२५ - January 17, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२४ - January 16, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२३ - January 15, 2025