अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – २२
(श्रीअरविंद यांनी एका श्रीकृष्ण-भक्ताला केलेले मार्गदर्शन…)
तुम्ही श्रीकृष्णासमीप साधेसरळपणाने का जात नाही? त्यासाठीचा साधासरळ मार्ग म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तुम्ही प्रार्थना केलीत तर ती प्रार्थना श्रीकृष्ण ऐकतो यावर विश्वास ठेवा. तुम्हाला त्याच्याकडून प्रतिसाद मिळण्यास वेळ लागत असला तरी, तो सारे काही जाणतो आणि तो तुमच्यावर प्रेम करतो यावर विश्वास ठेवा. आणि (तुम्हाला कधी प्रतिसाद द्यायचा त्या) वेळेची निवड करण्याबाबत तो सर्वाधिक सूज्ञ आहे, याची खात्री बाळगा.
परंतु त्या दरम्यान, तुम्ही शांतपणे तुमची भूमी (आधार) स्वच्छ करा. म्हणजे जेव्हा तो येईल तेव्हा त्याला काट्याकुट्यामधून, दगडधोंड्यांमधून वाट काढावी लागणार नाही. हे माझे सांगणे आहे आणि मी काय सांगत आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण तुम्ही ज्या अडचणी सांगत आहात त्या सर्व मानवी अडीअडचणींची, संघर्षांची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्यावरील उपायही मला माहीत आहेत. त्यामुळे, संघर्ष व अडीअडचणी ज्यामुळे कमी होतील, त्यांचा कालावधी ज्यामुळे कमी होईल अशा गोष्टींवर म्हणजे आंतरात्मिक वळण, श्रद्धा, साधासरळ आणि परिपूर्ण विश्वास व भरवसा या गोष्टींवर मी नेहमी भर देत असतो.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 487-488)
- मानवी अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ - July 16, 2026
- ‘परमानंद’ हे विश्वाचे रहस्य - July 15, 2026
- जग – ईश्वराचे आविष्करण - July 14, 2026





