अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला जीवन समग्रतेने पाहता येईल. म्हणजे व्यक्तीला फक्त सद्यकालीन जीवनच समग्रतेने पाहता आले पाहिजे असे नव्हे तर, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्या समग्रतेमध्ये ते पाहता आले पाहिजे. म्हणजे जीवन पूर्वी कसे होते, ते आत्ता कसे आहे आणि ते कसे असेल या सर्वच गोष्टी व्यक्तीला नजरेच्या एका टप्प्यात पाहता आल्या पाहिजेत. कारण प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य स्थानी ठेवण्याचा हाच एकमेव मार्ग असतो.
कोणतीही गोष्ट वर्ज्य करता येत नाही, कोणतीही गोष्ट वर्ज्य करता कामा नये, तर प्रत्येक गोष्ट उर्वरित सर्व गोष्टींशी पूर्णपणे सुमेळ राखत, तिच्या योग्य स्थानी ठेवता आली पाहिजे. तसे करता आले तर, कर्मठ मनाला आज ज्या गोष्टी इतक्या ‘वाईट’, इतक्या ‘निंद्य’, इतक्या ‘अस्वीकारार्ह’ वाटतात, त्याच गोष्टी दिव्य जीवनामध्ये पूर्णतया आनंददायी आणि स्वातंत्र्याचा, मुक्ततेचा अनुभव देणाऱ्या ठरतील.
आणि मग, अनंतत्वाने जीवन जगत असताना, परमेश्वर त्याकडे पाहून जो अपार आनंद घेत असतो ते परमेश्वराचे अद्भुत हास्य जाणून घेण्यापासून, समजून घेण्यापासून, ते अनुभवण्यापासून किंवा ते जगण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. हा आनंद, हे अद्भुत हास्य प्रत्येक सावट, प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःखभोग नाहीसा करते. (उत्तरार्ध उद्या…)
– श्रीमाताजी (CWM 10 : 155-156)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४ - January 26, 2026







