पूर्णयोगाचे अधिष्ठान – ५३
अंतःकरणाच्या शुद्धीसाठी संपूर्ण प्रामाणिकपणा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. स्वत:च स्वत:ची फसवणूक करता कामा नये. ईश्वरापासून, स्वतःपासून किंवा सद्गुरूपासून काहीही लपवून ठेवता कामा नये, स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे थेट निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांना सुयोग्य बनविण्यासाठीची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना वेळ लागला तरी काही हरकत नाही; पण ईश्वरप्राप्ती करून घेणे हेच आपले जीवित-कार्य आहे, असे मानण्याची तयारी व्यक्तीने ठेवली पाहिजे.
अंतःकरणाची शुद्धी ही एक बऱ्यापैकी लक्षणीय उपलब्धी आहे आणि म्हणूनच, बदलायला हव्यात अशा अजून काही गोष्टी व्यक्तीला स्वतःमध्ये आढळल्या तर त्यामुळे तिने निराश होण्याचे, हताश होण्याचे काहीच कारण नाही. व्यक्तीने जर योग्य इच्छा व योग्य दृष्टिकोन बाळगला तर, अंतःसूचना व अंतर्ज्ञान या गोष्टी वाढीस लागतील; त्या अधिक स्पष्ट, अधिक नेमक्या व अचूक बनतील आणि त्यांचे अनुसरण करण्याची ताकदसुद्धा वाढत राहील. आणि मग, तुम्ही स्वतःबाबत समाधानी होण्याआधी ईश्वरच तुमच्याबाबत समाधानी होईल. मानवता ज्या सर्वोच्च गोष्टीची आस बाळगू शकते ती गोष्ट (म्हणजे ईश्वर). मात्र साधक अपरिपक्व असताना जर ती गोष्ट त्याच्या हाती लागली तर, ती त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते; परंतु असे होऊ नये यासाठी साधक व ईश्वर यांच्यामध्ये जो एक पडदा असतो की, ज्या पडद्याद्वारे ईश्वर स्वतःचे व साधकांचे संरक्षण करत असतो, तो पडदा ईश्वर स्वतःहून हळूहळू दूर करू लागतो.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 43)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५ - January 27, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७५ - January 12, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७४ - January 11, 2026






