पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१
(मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन का देत नाहीये? असा प्रश्न एका साधकाने विचारला असावा, असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)
तुम्ही असे म्हटले पाहिजे की, “मला फक्त ईश्वरच हवा आहे, त्यामुळे मला यशाची खात्री आहे. मी फक्त त्याकडे पूर्ण विश्वासाने वाटचाल केली पाहिजे म्हणजे मग तो माझ्याही नकळत मला, स्वतःच्या हाताने त्याच्या स्वतःच्या मार्गावर आणि त्याने निर्धारित केलेल्या वेळी निश्चितपणे घेऊन जाईल.” हा तुमचा नित्य-मंत्र असला पाहिजे. आणि खरे तर, करण्यासारखी हीच एकमेव तर्कशुद्ध आणि सयुक्तिक गोष्ट आहे. कारण या व्यक्तिरिक्त कोणतीही गोष्ट करणे म्हणजे लक्षणीय स्वरूपाचा तर्कहीन विरोधाभास असतो.
हे जग म्हणजे कायम मानवसमूहांची युद्धभूमीच राहणार का, त्याव्यतिरिक्त हे जग दुसरे काही असूच शकणार नाही का? यासारख्या इतर कोणत्याही गोष्टींबाबत व्यक्ती शंका उपस्थित करू शकते. कारण या शंका तर्कसंगत असू शकतात. पण जी व्यक्ती केवळ एका ईश्वराचीच आस बाळगते ती व्यक्ती ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
प्रत्येक साधकाच्या हृदयाच्या तळाशी ही श्रद्धा असणे आवश्यकच आहे. कारण या वाटचालीमध्ये साधक जर समजा अडखळून पडला, त्याला काही आघात सहन करावा लागला, त्याला जर अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले तर, त्या प्रत्येक वेळी ही श्रद्धाच त्याला साहाय्य करून, तारून नेते.
(पण) तुमच्या मनावर अजूनही मिथ्या संकल्पनाचे सावट आहे आणि त्यामुळे तुमच्यामध्ये श्रद्धा निर्माण होण्यामध्ये अडचण येत आहे. या मिथ्या संकल्पना एकदाच कायमच्या दूर करा आणि या साध्यासरळ आंतरिक सत्याकडे अगदी साधेपणाने व सरळपणाने पाहा, म्हणजे मग, तुमच्या अडचणीच्या मूळ कारणाचाच बिमोड होईल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 97)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ - December 9, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० - December 8, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025





