पूर्णयोगाचे अधिष्ठान – २८
पूर्णयोगाचे अधिष्ठान – २८
(इच्छावासनांचा किंवा रागलोभादी विकारांचा आघात झाल्यास काय करावे असा प्रश्न एका साधकाने विचारलेला आहे. त्यावर उपाय म्हणून आधी साधकाने स्वत:ची संकल्पशक्ती उपयोगात आणावी, असे श्रीअरविंद यांनी त्याला सांगितले असावे. पण तसे करता नाही आले तर काय करावे, हे श्रीअरविंद त्या साधकाला लिहीत आहेत…)
तुम्ही तुमची संकल्पशक्ती उपयोगात आणू शकत नसाल तर मग एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ‘दिव्य शक्ती’ला आवाहन करणे. एखाद्या आघातापुढे हार पत्करणे आणि काहीच न करणे यापेक्षा, त्या शक्तीला आवाहन करणे अधिक बरे. मग ते आवाहन केवळ मनाने केलेले असो किंवा मानसिक शब्दांनी केलेले असो! या आवाहनाचा अगदी त्वरित परिणाम घडून आला नाही तरी, चेतना पुन्हा एकदा (चैत्य पुरुषाप्रत) खुली होण्यामध्ये आणि ‘दिव्य शक्ती’चे आगमन होण्यामध्ये त्याची परिणती होऊ शकते. कारण प्रत्येक गोष्ट त्यावरच अवलंबून असते.
बहिर्मुख झालेल्या चेतनेमध्ये (externalised consciousness) नेहमीच अंधकार आणि दुःखभोग असू शकतात; मात्र (तुमच्यामध्ये) आंतरिक चेतनेची सत्ता जितकी वाढत जाईल तेवढ्या प्रमाणात दुःखभोगादी गोष्टी मागे सारल्या जातील आणि (कालांतराने) त्या निघून जातील. कारण पूर्णतया आंतरिकीकरण झालेल्या चेतनेपुढे (internalised consciousness) त्यांचा टिकाव लागू शकत नाही. आणि समजा दुःखभोगादी गोष्टी अगदी आल्याच तर, त्या गोष्टी बाह्यवर्ती स्पर्शाप्रमाणे (वरवरच्या) असतात, त्या तुमच्या अस्तित्वामध्ये घर करू शकत नाहीत.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 721-722)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







