पूर्णयोगाचे अधिष्ठान – ११
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ११
व्यक्ती ईश्वरी प्रभावाप्रत स्वतःला खुली करू शकते की नाही यावरच पूर्णयोगामध्ये सर्व काही अवलंबून असते. अभीप्सेमध्ये जर प्रामाणिकता असेल आणि उच्चतर चेतनेप्रत पोहोचण्याचा धीरयुक्त संकल्प असेल तर, कितीही अडथळे आले तरी, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये खुलेपण (opening) हे निश्चित येते. यासाठी कमी वेळ लागेल की जास्त हे मन, हृदय आणि शरीराच्या कमी-अधिक तयारीवर अवलंबून असते. आणि म्हणून व्यक्तीकडे आवश्यक तेवढा धीर नसेल तर, आरंभ करताना येणाऱ्या अडचणीमुळेच ती व्यक्ती ते प्रयत्न सोडून देईल, अशी शक्यता असते.
आपले (समग्र) अस्तित्व श्रीमाताजींनी हाती घ्यावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला, शक्यतो हृदयामध्ये लक्ष एकाग्र करून आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याद्वारे चेतनेचे रूपांतरण होणे याखेरीज पूर्णयोगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. तुम्ही मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकता परंतु बऱ्याच जणांना अशा प्रकारे उन्मुख, खुले होणे फारच कठीण जाते.
जेव्हा मन अविचल होते आणि एकाग्रता दृढ होते, जेव्हा अभीप्सा तीव्र होते, तेव्हा अनुभव येऊ लागतात. जितकी श्रद्धा अधिक तितकेच परिणाम लवकर प्राप्त होण्याची शक्यता असते. इतर साऱ्या गोष्टींसाठी व्यक्तीने फक्त स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून राहता कामा नये तर, ईश्वराशी संपर्क प्रस्थापित करण्यामध्ये आणि श्रीमाताजींची शक्ती व उपस्थिती ग्रहण करण्यामध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 107)
- चैत्य पुरुष खुला होणे - September 12, 2026
- शांती आणि शक्तीचे अवतरण - September 3, 2026
- शांतीचे अवतरण - September 2, 2026







