नैराश्यापासून सुटका – २६
नैराश्यापासून सुटका – २६
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
निराशेला कवटाळून बसू नका, जे जे योग मार्गाचे अनुसरण करतात त्यांना त्यांच्या अहंचे अडथळे जाणवतातच. परंतु जर खरीखुरी अभीप्सा असेल तर, उच्चतर चेतनेचा नेहमीच विजय होतो.
*
सातत्याने ईश-स्मरण ठेवावे आणि शांती व स्थिरतेमध्ये जीवन जगावे; जेणेकरून ‘ईश्वरी शक्ती’ तुमच्यामध्ये कार्य करू शकेल आणि ‘ईश्वरी प्रकाश’ तुमच्यामध्ये येऊ शकेल. दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी फक्त पृष्ठस्तरीय चेतनेमध्येच (surface consciousness) चालू राहिल्या पाहिजेत; पण त्यांनी पृष्ठस्तरीय चेतनेची फार मोठी जागादेखील व्यापता कामा नये. ‘ईश्वरी शक्ती’ आणि ‘ईश्वरी प्रकाश’ यांच्या द्वारे जोपर्यंत पृष्ठस्तरीय चेतनेचा ताबा घेतला जात नाही आणि दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी जोपर्यंत त्यांच्या थेट नियंत्रणाखाली येत नाहीत तोपर्यंत, त्या पृष्ठस्तरीय चेतनेपुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत.
अहंकार या किरकोळ गोष्टींना अति महत्त्व देतो. त्या अहंकारालाच नाउमेद केले पाहिजे. “माझ्यासाठी नाही तर ईश्वरासाठी,” हाच तुमच्या समग्र चेतनेचा, विचारांचा आणि कृतींचा मूलमंत्र म्हणून विकसित झाला पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टी एकाच वेळी पूर्ण करता येतील असे नाही, पण शक्य तितक्या लवकर मनामध्ये (“माझ्यासाठी नाही तर ईश्वरासाठी,”) हा मूलमंत्र सातत्याने निनादत राहिला पाहिजे.
• श्रीअरविंद (CWSA 31 : 187, 219)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025






