जीवन जगण्याचे शास्त्र – २४
जीवन जगण्याचे शास्त्र – २४
साधक : “सर्व कर्मं म्हणजे अनुभवाची पाठशाळा असते,” असे श्रीअरविंदांनी का म्हटले आहे?
श्रीमाताजी : तुम्ही जर कोणतेही कर्मच केले नाही, तर तुम्हाला कोणताच अनुभव येणार नाही. समग्र जीवन हे अनुभवाचे क्षेत्र आहे. तुम्ही केलेली प्रत्येक हालचाल, तुमच्या मनात उमटलेला प्रत्येक विचारतरंग, तुम्ही केलेले प्रत्येक कर्म हा एक अनुभव असू शकतो आणि तो अनुभव असलाच पाहिजे. आणि विशेषतः तुमचे कार्यक्षेत्र हे तर तुमचे अनुभवाचे क्षेत्र असते; तुम्ही जी प्रगती करण्यासाठी आंतरिकरित्या प्रयत्न करत असता ती सर्व प्रगती, त्या (बाह्य) क्षेत्रामध्येसुद्धा उपयोगात आणली गेली पाहिजे.
तुम्ही कोणतेही काम न करता केवळ ध्यानामध्ये किंवा निदिध्यासनामध्ये राहिलात, तर तुम्ही प्रगती केली आहे किंवा नाही, हे तुम्हाला कळणार नाही. आणि मग तुमची प्रगती झाली आहे अशा भ्रमात तुम्ही राहाल. उलट, जेव्हा तुम्ही एखादे काम करायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती, तुमचे इतरांशी येणारे संबंध, तुमचा नोकरीव्यवसाय या सर्व गोष्टी म्हणजे अनुभवाचे असे एक क्षेत्र असते की, जेथे तुम्हाला तुम्ही केलेल्या प्रगतीची जाणीव तर होतेच; पण अजून जी कोणती प्रगती करून घ्यायची राहिली आहे, त्याचीही जाणीव तुम्हाला होते.
तुम्ही जर काहीही काम न करता, स्वतःमध्येच बंदिस्त होऊन राहिलात तर, कदाचित पूर्णपणे व्यक्तिगत भ्रमामध्ये तुम्ही तुमचे जीवन व्यतीत कराल, अशी शक्यता असते. परंतु ज्याक्षणी तुम्ही बाह्य जगात कृती करू लागता आणि इतरांच्या संपर्कात येता; विविध प्रकारच्या परिस्थितीच्या आणि जीवनामधील विविध वस्तुंच्या संपर्कात येता, तेव्हा तुम्हाला तुम्ही प्रगती केली आहे किंवा नाही; तुम्ही अधिक स्थिर, शांत झाला आहात की नाही; अधिक सचेत, अधिक सशक्त, अधिक निःस्वार्थी झाला आहात की नाही; तुमच्यामध्ये इच्छावासना शिल्लक आहेत की नाहीत; काही अग्रक्रम, काही दुर्बलता, काही अविश्वासूपणा शिल्लक तर नाही ना, इत्यादी सर्व गोष्टींची कर्म करत असताना तुम्हाला पूर्णतया वस्तुनिष्ठपणे जाणीव होऊ लागते.
परंतु तुम्ही जर फक्त ध्यानामध्येच स्वतःला बंदिस्त करून घेतलेत तर ते पूर्णपणे वैयक्तिक असते, आणि मग तुम्ही पूर्णपणे एका भ्रमामध्ये जाण्याची आणि त्यामधून कधीही बाहेर न पडण्याची शक्यता असते. आणि मग तुम्हाला असे वाटू शकते की, तुम्हाला काही असामान्य गोष्टींचा साक्षात्कार झाला आहे. प्रत्यक्षात मात्र तुम्हाला तशी प्रचिती आली असल्याचा किंवा तुम्ही प्रगती केली असल्याचा एक आभास, एक भ्रम तुमच्यापाशी असतो. श्रीअरविंद येथे हेच सांगू इच्छित आहेत.
– श्रीमाताजी (CWM 07 : 287-288)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८ - January 30, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026






