जीवन जगण्याचे शास्त्र – १०
जीवन जगण्याचे शास्त्र – १०
(मागील भागापासून पुढे…)
वासनांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ लागल्यावर, मग एक वेळ अशी येते की, व्यक्ती परिपक्व होऊ लागलेली असते. तेव्हा व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, प्रत्येक स्पंदनामध्ये, अवतीभोवतीच्या प्रत्येक वस्तुमध्ये एक प्रकारचा आनंद, अस्तित्वाचा आनंद अनुभवायला मिळतो. केवळ माणसांमध्ये आणि सचेत जिवांमध्येच नव्हे तर, वस्तुंमध्ये, गोष्टींमध्येसुद्धा तो अनुभवायला येतो. केवळ झाडाफुलांपानांमध्ये आणि सजीवांमध्ये नव्हे तर, व्यक्ती वापरत असलेल्या कोणत्याही वस्तुमध्ये, तिच्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तुंमध्येसुद्धा व्यक्तीला त्या आनंदाचा अनुभव येतो. आणि तिला असे जाणवते की, प्रत्येक गोष्टच या आनंदाने स्पंदित होत आहे. व्यक्ती एखाद्या गोष्टीला स्पर्श करते आणि तिला हा आनंद अनुभवास येतो.
परंतु अर्थातच त्यासाठी, मी सुरुवातीला सांगितले तसा अभ्यास करावा लागतो. अन्यथा, जोपर्यंत व्यक्तीमध्ये इच्छावासना असतात, आवडीनिवडी असतात, आसक्ती आणि आकर्षण किंवा प्रतिकर्षण आणि त्यासारख्या इतर गोष्टी असतात तोपर्यंत तिला या आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही. व्यक्तीला एखाद्या गोष्टीमध्ये जोपर्यंत शारीरिक किंवा प्राणिक सुख अनुभवास येते तोपर्यंत तिला हा आनंद जाणवणार नाही.
हा आनंद सर्वत्र असतो. हा आनंद अतिशय सूक्ष्म असतो. तुम्ही वस्तुंमधून वावरत असता आणि जणू काही त्या वस्तू तुमच्याजवळ गाणे गुणगुणून तो आनंद व्यक्त करत असतात. आणि मग एक वेळ अशी येते की, जेव्हा तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीच्या जीवनामधील हा आनंद अगदी चिरपरिचित होऊन जातो. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 09 : 22)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८ - January 30, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026






