जीवन जगण्याचे शास्त्र – ०६

जीवन जगण्याचे शास्त्र – ०६

(व्यक्तित्व विभागलेले असताना कशी स्थिती असते, ते आपण कालच्या भागात पाहिले. प्रामाणिकपणासाठी काम करणे कसे आवश्यक आहे तेही श्रीमाताजींनी अधोरेखित केले. आता ते कसे करायचे यासंबंधी त्या मार्गदर्शन करत आहेत.)

तुमच्या व्यक्तित्वामधील एखादा भाग तुम्हाला (तुमच्या ध्येयाच्या) विरुद्ध दिशेने खेचत आहे, असे जेव्हा तुमच्या लक्षात येते तेव्हा तुम्ही त्याला काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. एखाद्या बालकाला समजावून सांगावे त्याप्रमाणे, त्याला समजावून सांगितले पाहिजे आणि त्याला केंद्रवर्ती अस्तित्वाशी सुसंवादी केले पाहिजे. हे करणे म्हणजे प्रामाणिकपणासाठी कार्य करणे आणि ते अत्यावश्यक असते.

जेव्हा व्यक्तित्वाच्या सर्व भागांमध्ये ऐक्य असते, सहमती असते, सर्व इच्छांमध्ये सुसंगती असते तेव्हा तुमचे व्यक्तित्व साधे, सालस आणि कृती व प्रवृत्तींमध्ये एकसंध असते. तुमचे समग्र व्यक्तित्व जेव्हा एकाच मध्यवर्ती तत्त्वाभोवती गुंफले जाते तेव्हाच तुम्ही सहजस्फूर्त (spontaneous) बनू शकता. कारण जर, तुमच्यामध्ये, असे काहीतरी असेल की, जे ईश्वराभिमुख आहे आणि अंतःस्फूर्ती व प्रेरणा मिळावी यासाठी प्रतीक्षा करत आहे आणि त्याचवेळी तुमच्यामधीलच एक भाग त्याच्या स्वतःच्याच स्वार्थासाठी धडपडत असेल, स्वतःच्या वासना भागवण्याच्या दृष्टीने धडपडत असेल तर तुम्ही घेतलेली भूमिका नक्की काय आहे हेच तुम्हाला कळेनासे होते. तसेच तुमच्या बाबतीत काय घडणार आहे हेदेखील तुम्हाला कळेनासे होते. कारण तुमच्यामधील एक भाग हा, दुसरा भाग जे करू इच्छित असतो ते केवळ उद्ध्वस्तच करतो असे नाही तर, तो त्याला पूर्ण विरोध करत असतो.

काय आवश्यक आहे आणि काय केले पाहिजे हे आपण इथे स्पष्टपणे पाहिले. परंतु हे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कोणतीही जबरदस्ती करता कामा नये किंवा अतिरेकी घाई देखील करता कामा नये. कारण त्यामुळे दिव्य चेतनेच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या शांती, समचित्तता आणि स्थिरता या गोष्टींना हानी पोहोचू शकते.

आणि सरतेशेवटी आपल्या असे लक्षात येते की, येथे संतुलन (Balance) अत्यावश्यक असते. कोणत्याही दोन टोकाच्या गोष्टी काळजीपूर्वक टाळू शकेल असा एक मार्ग आवश्यक असतो. अति घाई तुम्हाला संकटात लोटते; अधीरता तुम्हाला प्रगत होण्यापासून अडवते. आणि त्याचबरोबर हेही खरे आहे की, अति संथपणा, जडता (inertia) तुमचे पाय मागे खेचते. आणि म्हणूनच, गौतम बुद्ध ज्याला ‘मध्यम मार्ग’ असे संबोधतात तो मार्ग सर्वोत्तम असतो.

– श्रीमाताजी (CWM 08 : 284-285)

श्रीमाताजी