जीवन जगण्याचे शास्त्र – ०४

जीवन जगण्याचे शास्त्र – ०४

(सहजस्फूर्त असणे म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, यासंबंधीचा विचार कालच्या भागात आपण केला. मनोकल्पित रचनांच्या पलीकडे जात, अंत:प्रेरणेवर विसंबून कार्य कसे करायचे याचाही निर्देश त्यामध्ये देण्यात आला होता. आता योगसाधनेमधील त्याची आवश्यकता व त्यामधील धोके श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

तुम्ही योगसाधना करू इच्छित असाल आणि तुम्ही योगमार्गामध्ये प्रवेश केलात तर, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनोरचनांच्या हातचे बाहुले बनता कामा नये, ही गोष्ट अतिशय आवश्यक असते. तुम्हाला जर तुमच्या अनुभवांवर विश्वास ठेवायचा असेल तर, जे अनुभव यावेत असे तुम्हाला वाटते किंवा त्याविषयी तुमची जी कल्पना असते, जे रूप पाहण्याची तुम्हाला इच्छा किंवा अपेक्षा असते, तशा मनोमय रचना तुमच्या मनामध्ये निर्माण न करण्याची अतिशय काटेकोर काळजी तुम्ही घेतली पाहिजे.

कारण मनोमय रचना या बऱ्याचदा एक प्रकारच्या वास्तव रचना (real formation) असतात, ती एक खरी निर्मिती असते. आणि तुम्ही तुमच्या कल्पनेच्या साहाय्याने अशी रूपं तयार करता की, जी काही ठरावीक प्रमाणात तुमच्यापासून स्व-तंत्र असतात आणि ती रूपं जणू बाहेरून आल्यासारखी तुमच्यापाशी परत येतात आणि ती रूपं तुम्हाला ‘अनुभव आल्याचा’ भास निर्माण करतात. परंतु हे ईप्सित असलेले अनुभव किंवा ज्याच्या मागे तुम्ही धावत असता ते किंवा तुम्हाला अपेक्षित असणारे अनुभव सहजस्फूर्त नसतात आणि ते आभासी असल्याने त्यामध्ये जोखीम असते. कधीकधी तर ते अतिशय धोकादायक असे भ्रम असतात.

म्हणून जेव्हा तुम्ही मानसिक साधनेचे (mental discipline) अनुसरण करत असता तेव्हा, तुम्ही विशिष्ट अनुभवांविषयी कोणतीही पूर्वकल्पना न करण्याची किंवा ते प्राप्त व्हावेत अशी अभिलाषा न बाळगण्याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. कारण तसे केलेत तर, तुम्हीच तुमच्यासाठी या अनुभवांचा एक भ्रम तयार करता. योगाच्या क्षेत्रामध्ये, ही अगदी काटेकोर आणि कठोर सहजस्फूर्तता अगदी अपरिहार्य असते. या मार्गावर खात्रीने आणि निर्भयपणे पुढे जायचे असेल तर, त्यासाठी, तुमच्यामध्ये कोणतीही आकांक्षा किंवा इच्छा किंवा बेसुमार कल्पना असता कामा नयेत; किंवा ज्याला मी ‘आध्यात्मिक स्वप्नरंजन’ (spiritual romanticism) म्हणते ते असता कामा नये किंवा चमत्कारसदृश गोष्टींची आवडदेखील असता कामा नये; या सर्व गोष्टी तुम्ही अगदी काळजीपूर्वक दूर सारल्या पाहिजेत. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 282-283)

श्रीमाताजी