जीवन जगण्याचे शास्त्र – ०३
जीवन जगण्याचे शास्त्र – ०३
(सर्वसाधारणपणे मनुष्य प्राधान्याने मानसिक जीवन जगत असतो. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन, जीवन सहजस्फूर्तपणे कसे जगता येते आणि त्यामुळे ते अधिक सुकर कसे होते, यासंबंधी श्रीमाताजी येथे मार्गदर्शन करत आहेत.)
एखादी गोष्ट विचारपूर्वक, आखणी करून, ठरवून, स्वतःच्या व्यक्तिगत इच्छेने साध्य करण्याचा खटाटोप न करणे म्हणजे सहजस्फूर्त (spontaneous) असणे होय. खरी सहजस्फूर्तता काय असते हे समजावे म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगते.
श्रीअरविंदांनी ‘आर्य’ नियतकालिकासाठी लेखन सुरू केले तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यामध्ये त्यांनी जे लेखन केले ते केवळ मानसिक ज्ञान नव्हते किंवा ती मनोमय रचनादेखील नव्हती. लेखनाआधी ते त्यांचे मन शांत करत असत आणि टंकलेखन यंत्रासमोर बसत असत आणि मग जे काही लेखन करायचे असे, ते वरून म्हणजे उच्चतर स्तरांवरून, जणू काही अगदी तयार होऊन येत असे. उच्चतर स्तरांवरून येणाऱ्या त्या ज्ञानाला आणि एवढेच नव्हे तर, त्याच्या अभिव्यक्तीला श्रीअरविंदांच्या माध्यमातून, त्यांच्या मनाच्या शांत अवस्थेत वाव मिळत असे. तेव्हा श्रीअरविंदांना टंकलेखन यंत्रावरून फक्त बोटे फिरवावी लागत असत आणि त्यानंतर ते लेखन (अगदी सहजगत्या) कागदावर उमटत असे. अशा रितीने श्रीअरविंद ‘आर्य’ मासिकाची दरमहा चौसष्ट छापील पाने होतील एवढे लेखन करत असत. या पद्धतीमुळेच ते एवढे लेखन करू शकत असत. श्रीअरविंद जर केवळ मानसिक स्तरावर खटपट करून लेखन करत असते तर, त्यांच्या हातून असे आणि एवढे लेखन झाले नसते. ही असते खरी मानसिक सहजस्फूर्तता!
आणि याबाबत आणखी थोडे पुढे जाऊन सांगायचे तर असे म्हणावे लागेल की, (व्यक्तीला जर लेखनात व भाषणात अशी सहजस्फूर्तता विकसित करायची असेल तर) तिला जे लिहायचे असते किंवा जे बोलायचे असते त्याचा तिने अगोदर विचार करता कामा नये किंवा तिने त्याची आधीच आखणी करता कामा नये. (त्यापेक्षा) तिला तिचे मन शांत करता आले पाहिजे आणि एखाद्या धारकपात्राप्रमाणे (receptacle) ते मन उच्चतर चेतनेच्या दिशेने वळविता आले पाहिजे आणि जे काही वरून येते, जे काही ग्रहण केले जाते ते त्या व्यक्तीने मानसिक निश्चल-नीरवतेमध्ये आविष्कृत केले पाहिजे. ही खरी सहजस्फूर्तता ठरेल.
अर्थातच, ही गोष्ट काही साधीसोपी नाही. त्यासाठी पूर्वतयारीची आवश्यकता असते. तुम्ही आणखी खाली प्रत्यक्ष व्यवहारात उतरलात तर मग, ते अधिकच अवघड होते. कारण सहसा, तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट तर्कसंगत रितीने करायची असते तेव्हा, तुम्हाला जे काही करायचे असते त्याचा तुम्हाला आधी विचार करावा लागतो; ती कृती करण्यापूर्वी तुम्हाला योजना आखावी लागते. अन्यथा खऱ्या अंतःप्रेरणेऐवजी (inspiration), त्यापासून कित्येक योजने दूर असणाऱ्या सर्व प्रकारच्या इच्छाआकांक्षा आणि आवेगांवरच तुम्ही हेलपाटत राहण्याची शक्यता असते. आणि तसे झाले तर, (खऱ्या अंतःप्रेरणेऐवजी) ‘कनिष्ठ प्रकृती’ तुम्हाला कृती करण्यास भाग पाडत आहे, असा त्याचा सरळसरळ अर्थ होईल. त्यामुळे, जोपर्यंत तुम्ही प्रज्ञेच्या आणि निर्लिप्ततेच्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत, तुम्ही तुमच्या दैनंदिन कृतींमध्ये सहजस्फूर्ततेचा अवलंब करता कामा नये. अन्यथा तुम्ही सर्वाधिक विस्कळीत आवेगांच्या आणि प्रभावांच्या हातचे बाहुले बनून राहण्याचा धोका संभवतो. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 08 : 281-282)
- नैराश्यापासून सुटका – ३३ - October 22, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३२ - October 21, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३१ - October 20, 2025






