श्रीमाताजी आणि समीपता – ३३

श्रीमाताजी आणि समीपता – ३३

श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष सान्निध्यात असणे ही त्यांच्याशी आपले नाते असण्याची एक खूण आहे किंवा असे सान्निध्य लाभणे म्हणजे त्यांची आपल्यावर विशेष कृपा आहे असे मानणे किंवा असे सान्निध्य लाभणे हे वेगवान प्रगतीचे साधन आहे असे समजणे यासारख्या सर्व गोष्टी म्हणजे मनाच्या कल्पना असतात; ज्या अर्थातच अगदी स्वाभाविक असतात, मात्र त्या अनुभवातून नसतात. खरे महत्त्व असते ते आंतरिक समीपतेला!

असे काही जण आहेत जे श्रीमाताजींना दररोज भेटतात आणि असे असूनही, काही वर्षांपूर्वी ते प्रगतीच्या ज्या टप्प्यावर होते त्यापेक्षा त्यांच्यात फार काही प्रगती झाली आहे असे नाही. उलट काही जण असेही आहेत की ज्यांची अधोगतीच झाली आहे कारण, त्यामुळे (म्हणजे आपण श्रीमाताजींच्या जवळ आहोत असा अभिमान त्यांच्यामध्ये वाढीस लागल्यामुळे) त्यांच्या प्राणिक मागण्या वाढीस लागल्या. तर दुसऱ्या बाजूला असे काही जण आहेत, की जे अगदी कधीतरीच श्रीमाताजींना भेटायला येतात तरीही ते श्रीमाताजींच्या समीप आहेत आणि योगमार्गावर प्रगत झाले आहेत, आणि श्रीमाताजी त्यांचा सांभाळ करत आहेत. मी वानगीदाखल अशा एका व्यक्तीचे उदाहरण देऊ शकतो की, ती व्यक्ती श्रीमाताजींना वर्षातून एकदाच भेटते पण त्या व्यक्तीइतकी वेगाने प्रगती केलेला दुसरा कोणी नाही, तसेच त्या व्यक्तीमध्ये ज्या तीव्रतेने आणि उत्कटतेने भक्तीचे नाते विकसित झाले आहे तसे दुसऱ्या कोणामध्येही झालेले नाही.

सारांश असा की, या सर्वच बाबतीत श्रीमाताजींवर आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रकाशावर संपूर्ण विश्वास ठेवणे हे सर्वोत्तम!

– श्रीअरविंद (CWSA 32 : 494)

श्रीअरविंद