उषेचे आगमन अपरिहार्य
साधना, योग आणि रूपांतरण – ३०६
अचेतनाचे रूपांतरण
(जुलै १९४८ मध्ये जागतिक परिस्थितीबद्दल खंत व्यक्त करणाऱ्या काही व्यक्तींसंबंधी, एका साधकाला उद्देशून लिहिलेले हे पत्र…)
सध्या गोष्टी काही ठीक चालल्या आहेत असे नाही, त्या दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालल्या आहेत आणि कोणत्याही क्षणी त्या अजूनही वाईट होतील किंवा वाईटाहूनही वाईट असे काही घडणे शक्य असेल तर तसेही घडू शकेल. सध्याच्या अस्वस्थ जगामध्ये, गोष्टी कितीही विरोधाभासी असल्या तरी त्या घडणे शक्य आहे, असे आता वाटू लागले आहे. त्या तुमच्या स्नेह्यांसाठी सर्वोत्तम गोष्ट कोणती असेल तर ती हीच की जे चाललेले होते ते सर्व आवश्यक होते, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. कारण एक नूतन आणि अधिक चांगले जग प्रत्यक्षात येण्यासाठी, काही विशिष्ट शक्यता उदयास येऊन, त्यांच्यापासून सुटका होण्याची आवश्यकता होती. ‘नंतर कधीतरी करू’ असे म्हणून त्या पुढे ढकलता येण्यासारख्या नव्हत्या.
योगामध्ये ज्याप्रमाणे, व्यक्तित्वामध्ये सक्रिय किंवा सुप्त अशा ज्या कोणत्या गोष्टी असतात, त्यांना प्रकाशामध्ये आणून कार्यान्वित करावे लागते म्हणजे त्यांचा सामना करता येतो आणि त्यांना हद्दपार करता येते किंवा तळाशी सुप्तपणे पडून असलेल्या गोष्टींना शुद्धिकरणाच्या हेतुने पृष्ठभागावर आणावे लागते, अगदी तसेच येथेही आहे.
‘उषःकालापूर्वीची रात्र ही अधिक काळोखी असते आणि उषेचे आगमन हे अपरिहार्य असते,’ ही म्हण त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मात्र त्यांनी ही गोष्टदेखील लक्षात ठेवली पाहिजे की, ज्या नवीन जगताचे आगमन आमच्या दृष्टीस (स्पष्टपणे) दिसत आहे ते जगत म्हणजे जुन्याच जगताच्या पोतापासून (texture) बनलेले पण प्रकाराने काहीसे वेगळे असणारे, असे नाही तर, त्या नूतन जगताचा उदय हा अन्य मार्गाने, म्हणजे बाहेरून नव्हे तर, अंतरंगातूनच झाला पाहिजे. म्हणून बाहेर घडणाऱ्या शोचनीय गोष्टींविषयी खूप जास्त चिंतित राहू नये, तर आपण अंतरंगामध्ये वृद्धिंगत होत राहावे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अंतरंगामध्ये वृद्धिंगत होत राहिल्याने, नवीन जगत, मग ते कोणत्याही रूपात साकार झाले तरी, तुमचे ते (स्नेही) त्यासाठी सज्ज राहू शकतील.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 691)
*
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







