साधना, योग आणि रूपांतरण – २४४
साधना, योग आणि रूपांतरण – २४४
मनाचे रूपांतरण
मनाच्या निश्चल-नीरव अशा अवस्थेमध्ये अतिशय प्रभावी आणि मुक्त कृती घडून येऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या ग्रंथाचे लेखन, काव्य, अंतःप्रेरणेतून दिलेले एखादे व्याख्यान इत्यादी. मन सक्रिय झाले की ते अंतःस्फूर्तीमध्ये ढवळाढवळ करते, स्वतःच्या किरकोळ कल्पनांची त्यात भर घालते आणि त्यामुळे अंतःस्फूर्तीमधून स्फुरलेल्या गोष्टीमध्ये त्या कल्पनांची सरमिसळ होते. अन्यथा मग ती स्फूर्ती निम्न पातळीवरून काम करू लागते किंवा मग निव्वळ मनाकडून आलेल्या सूचनांच्या बुडबुड्यांमुळे ती अंतःस्फूर्ती पूर्णपणे थांबून जाण्याची शक्यता असते. अगदी त्याप्रमाणे, जेव्हा मनाच्या सामान्य कनिष्ठ स्तरावरील गतिविधी सक्रिय नसतात तेव्हा अंतःसूचना किंवा (आंतरिक किंवा उच्चस्तरीय) कृती या अधिक सहजपणे घडून येऊ शकतात. त्याचप्रमाणे मनाच्या निश्चल-नीरव अवस्थेमध्ये असताना अंतरंगामधून किंवा वरून येणारे, म्हणजे आंतरात्मिक किंवा उच्चतर चेतनेकडून येणारे ज्ञानदेखील सर्वाधिक सहजतेने येऊ शकते.
*
अविरत चालणारी कृती ही मनाची एक नेहमीचीच अडचण असते. त्याने निश्चल-नीरव होण्यास शिकण्याची आवश्यकता असते आणि स्वतःच्या उपयोगासाठी ज्ञानावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न न करता, त्याने ज्ञानोदय होण्यास वाव दिला पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 55-56, 54)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५ - December 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ - December 12, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ - December 11, 2025






