मनाची निश्चल-नीरवता
साधना, योग आणि रूपांतरण – २४३
मनाचे रूपांतरण
मनाची ग्रहणशील निश्चल-नीरवता (silence), मानसिक अहंकाराचा निरास आणि मनोमय पुरुष साक्षीभावाच्या भूमिकेत उतरणे, ‘दिव्य शक्ती’बरोबर असलेला घनिष्ठ संपर्क आणि अन्य कोणाप्रत नव्हे तर, त्या दिव्य शक्तीच्या ‘प्रभावा’प्रत खुलेपणा या गोष्टी ‘ईश्वरा’चे साधन बनण्यासाठी, आणि केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’द्वारेच संचालित होण्यासाठी आवश्यक अटी असतात. केवळ मनाच्या निश्चल-नीरवतेमुळे अतिमानसिक चेतना अवतरित होते असे नाही. मानवी मन आणि अतिमानस (supermind) यांच्या दरम्यान चेतनेच्या बऱ्याच अवस्था, बऱ्याच पातळ्या, बरेच स्तर असतात.
निश्चल-नीरवतेमुळे मन आणि उर्वरित अस्तित्व हे महत्तर गोष्टींप्रत खुले होते, कधीकधी ते ब्रह्मांडगत चेतनेप्रत खुले होते, कधीकधी शांत ‘आत्म्या’च्या अनुभवाप्रत खुले होते. तर कधी ते ‘ईश्वरा’च्या शक्तीप्रत किंवा उपस्थितीप्रत खुले होते; कधीकधी ते मानवी मनापेक्षा अधिक उच्च असणाऱ्या चेतनेप्रत खुले होते. या पैकी कोणतीही गोष्ट घडण्यासाठी मनाची निश्चल-नीरवता ही सर्वाधिक अनुकूल परिस्थिती असते.
‘दिव्य-शक्ती’ सर्वप्रथम व्यक्तिगत चेतनेवर आणि नंतर त्या चेतनेमध्ये अवतरित होण्यासाठी आणि ती चेतना रूपांतरित करण्याचे तिचे कार्य करण्यासाठी, तसेच आवश्यक असे अनुभव प्रदान करण्यासाठी, आणि व्यक्तीचा दृष्टिकोन व तिच्या वृत्तीप्रवृत्ती पूर्णतः बदलून टाकण्यासाठी आणि व्यक्ती जोवर अंतिम अतिमानसिक परिवर्तनसाठी तयार होत नाही तोपर्यंत तिला टप्प्याटप्याने पुढे घेऊन जाण्यासाठी, मनाची निश्चल-नीरवता ही पूर्णयोगामधील सर्वात अनुकूल परिस्थिती असते. अर्थात हीच केवळ एकमेव अनुकूल परिस्थिती असते असे नाही.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 266-267)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० - December 8, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025






