साधना, योग आणि रूपांतरण – २१६
चैत्य पुरुष (psychic being) हा हृदयकेंद्राच्या मागे स्थित राहून मन, प्राण आणि शरीराला आधार पुरवत असतो. चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणामध्ये (psychic transformation) तीन मुख्य घटक असतात.
१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे (opening), पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.
२) चैत्य पुरुषाच्या किंवा आत्म्याच्या खुलेपणामुळे, चैत्य पुरुष अग्रस्थानी येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे शासन करतो आणि त्यांना ‘ईश्वरा’कडे वळवितो.
३) समग्र कनिष्ठ अस्तित्व आध्यात्मिक सत्याप्रत उन्मुख होते, या शेवटच्या गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (The psycho-spiritual part) असे म्हणता येईल.
आंतरात्मिक रूपांतरण हे व्यक्तीला तिच्या व्यक्तिगततेच्या अतीत, वैश्विकतेमध्ये घेऊन जाऊ शकते. एवढेच काय पण, गुह्य (occult) उन्मुखतासुद्धा वैश्विक मन, वैश्विक प्राण आणि वैश्विक जडभौतिकाशी व्यक्तीचा संबंध प्रस्थापित करते. अंतरात्म्याला सर्व जीवनाशी, सृष्टीशी (all existence) असलेल्या संपर्काची जाणीव असते. त्याला ‘आत्म्या’ची एकात्मता सर्वत्र अनुभवास येते, त्याला वैश्विक प्रेम आणि इतर साक्षात्कारांची प्रचिती येते आणि ती त्या अंतरात्म्यास वैश्विक चेतनेकडे घेऊन जाते.
परंतु हा सर्व ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आध्यात्मिकतेस उन्मुख झाल्याचा परिणाम असतो. आणि तो परिणाम मन, प्राण व शरीरामध्ये आध्यात्मिक प्रकाशाचे आणि सत्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे किंवा त्या प्रकाशाचा आणि सत्याचा मन, प्राण व शरीरामध्ये अंतःप्रवेश झाल्यामुळे घडून येतो. जेव्हा व्यक्ती मनाच्या पलीकडे चढून जाते आणि तेथे राहून, वरून सर्वांचा कारभार चालवू लागते तेव्हा मूलभूत आध्यात्मिक रूपांतरणास (spiritual transformation) सुरुवात होते किंवा ते रूपांतरण शक्य होते.
आंतरात्मिक रूपांतरणामध्येसुद्धा व्यक्ती एक प्रकारे मन, प्राण आणि शरीर यांच्या अतीत जाऊ शकते आणि परत येऊ शकते परंतु शिखरस्थानी असलेल्या चेतनेमध्ये म्हणजे जेथे ‘अधिमानसा’चे स्थान असते तेथे, मानवी मनाच्या वर असणाऱ्या इतर स्तरांमध्ये, व्यक्ती अजूनपर्यंत स्थित झालेली नसते. जेव्हा सृष्टीच्या दोन गोलार्धांमध्ये असणारे किंवा कनिष्ठ आणि ऊर्ध्व गोलार्ध यांच्यामध्ये असणारे झाकण, आच्छादन दूर केले जाते आणि ‘अधिमानसा’च्या ऐवजी ‘अतिमानस’ जेव्हा सृष्टीची चालकशक्ती बनते तेव्हा अतिमानसिक रूपांतरण (supramental transformation) घडून येणे शक्य असते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 332-333)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२६ - January 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१९ - January 11, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१८ - January 10, 2025