साधना, योग आणि रूपांतरण – २००
आमचा ‘योग’ हा रूपांतरणाचा ‘योग’ आहे; परंतु हे रूपांतरण म्हणजे समग्र चेतनेचे रूपांतरण असते; समग्र प्रकृतीचे तिच्या पायापासून ते माथ्यापर्यंतचे रूपांतरण असते, तिच्या अगदी गुप्त अशा आंतरिक घटकांपासून, ते तिच्या अगदी दृश्य अशा बाह्यवर्ती वर्तनाच्या प्रत्येक भागाचे रूपांतरण असते. हा काही केवळ नैतिक बदल किंवा धार्मिक परिवर्तन नव्हे, किंवा संतत्व वा संन्यासमार्गी संयमदेखील नव्हे, उदात्तीकरण किंवा जीवनाचे व प्राणिक प्रवृत्तींचे दमनही आम्हाला येथे अभिप्रेत नाही. ते काही गौरवीकरण नाही, की कठोर असे नियंत्रण नाही; किंवा भौतिक अस्तित्वालाच नकार देणेही आम्हाला अभिप्रेत नाही. न्यूनतेकडून अधिकतेकडे, कनिष्ठाकडून उच्चतराकडे, पृष्ठवर्ती जाणिवेकडून सखोल चेतनेप्रत होणारा बदल आम्हाला अभिप्रेत आहे. सर्वाधिक महान, उच्चतम, सखोलतम असे संभाव्यकोटीतील रूपांतरण आम्हाला अभिप्रेत आहे. तसेच समग्र अस्तित्वाचे त्याच्या साधनसामग्रीनिशी संपूर्ण परिवर्तन आणि क्रांती अभिप्रेत आहे; अस्तित्वाच्या प्रत्येक तपशीलाचे आजवर प्रत्यक्षीभूत न झालेल्या दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतरण होणे, हे आम्हाला अभिप्रेत आहे. सद्यस्थितीमध्ये जे गुप्त आणि अर्धजागृत आहे त्याला पुढे आणणे, सद्यस्थितीत आपल्यासाठी जे अतिचेतन (superconscient) आहे त्याबद्दल अधिक सचेत होणे, अवचेतन (subconscient) आणि अधोभौतिक (subphysical) गोष्टींचे प्रदीपन होणे असा याचा अर्थ आहे.
त्यामध्ये खालील बाबी अनुस्यूत आहेत –
१) सद्यस्थितीमध्ये आपल्या प्रकृतीवर मनाचे नियंत्रण असते, त्याची जागा आत्म्याच्या नियंत्रणाने घेणे.
२) प्रकृतीच्या साधनाचे बाह्याकडून, आता अर्ध-आवृतापेक्षा (half-veiled) अधिक उघड झालेल्या आंतरिक मनाकडे हस्तांतरण होणे.
३) बाह्याकडून आंतरिक प्राणाकडे किंवा आंतरिक जीवनाकडे हस्तांतरण होणे, बाह्यवर्ती शारीर चेतनेकडून आंतरिक सूक्ष्म विस्तीर्ण शारीर-चेतनेकडे हस्तांतरण होणे.
४) आपल्याला संचालित करणाऱ्या गुप्त वैश्विक शक्तींशी सद्यस्थितीत जो अप्रत्यक्ष आणि अचेतन किंवा अर्धचेतन संपर्क येतो, त्याची जागा या हस्तांतरणामुळे, थेट आणि चेतनयुक्त संपर्काने घेणे.
५) एका संकुचित, मर्यादित व्यक्तीमधून बाहेर पडून विशाल वैश्विक चेतनेमध्ये प्रवेश करणे.
६) मानसिक प्रकृतीमधून आध्यात्मिक प्रकृतीकडे उन्नत होणे.
७) मनामधील चैतन्याहूनही अधिक पुढे आरोहण करणे, किंवा मनाने अतिमानसिक चैतन्याच्या दिशेने उलगडत जाणे आणि त्या अतिमानसिक चेतनचे मूर्त अस्तित्वामध्ये अवतरण होणे.
रूपांतरण पूर्णत्वाला जाण्यापूर्वीच या साऱ्या गोष्टी साध्य होणे आवश्यक असते, इतकेच नव्हे तर त्या सुसंघटित होणे देखील आवश्यक असते.
– श्रीअरविंद (CWSA 12 : 371)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२६ - January 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१९ - January 11, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१८ - January 10, 2025