अंतर्मुख आणि बहिर्मुख रितेपण
साधना, योग आणि रूपांतरण – ६८
काल तुम्ही पत्रामध्ये ज्या रितेपणाचे (emptiness) वर्णन केलेत ती गोष्ट वाईट नाही. हे अंतर्मुख आणि बहिर्मुख रितेपण हे बरेचदा नवीन चेतनेकडे जाणारी योगमार्गावरील पहिली पायरी असते. मनुष्याची प्रकृती ही एखाद्या गढूळ पाण्याने भरलेल्या पेल्यासारखी असते. त्यातील गढूळ पाणी फेकून द्यावे लागते आणि तो पेला स्वच्छ करून, त्यामध्ये दिव्य रस ओतला जावा यासाठी प्रथम तो पेला रिकामा करावा लागतो.
(मात्र यामध्ये) अडचण अशी असते की, मानवाच्या शारीरिक चेतनेला हा रितेपणा सहन करणे अवघड वाटते. कारण त्या चेतनेला सर्व प्रकारच्या लहानसहान प्राणिक आणि मानसिक गतिविधींमध्ये व्यग्र राहायची सवय लागलेली असते. त्या चेतनेला त्यात स्वारस्य वाटते, तिचे मनोरंजन होते आणि अगदी दुःखसंकटामध्ये असतानासुद्धा ती सक्रिय राहते. त्या गोष्टी नाहीशा झाल्या तर ते सहन करणे चेतनेला अतिशय कठीण जाते. तिला नीरस व अस्वस्थ वाटू लागते आणि जुन्याच आवडीच्या गोष्टी, गतिविधी यांबाबत ती पुन्हा आतुर होते. परंतु या अस्वस्थपणामुळे अविचलतेला धक्का लागतो आणि बाहेर फेकून दिलेल्या गोष्टी पुन्हा परतून येतात. तुमच्यामध्ये सध्या हीच अडचण निर्माण होत आहे आणि तिचाच अडथळा होत आहे.
हा रितेपणा म्हणजे खऱ्या चेतनेकडे आणि खऱ्या गतिविधींकडे जाणारा एक टप्पा आहे अशा रीतीने जर तुम्ही त्या रितेपणाचा स्वीकार केलात तर या अडथळ्यापासून सुटका करून घेणे तुम्हाला सोपे जाईल. (तुम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे, श्रीअरविंद आश्रमातील) प्रत्येकजणच काही या नीरसपणाच्या भावनेतून किंवा अनास्थेमधून जात आहे असे नाही. परंतु बरेच जण या अवस्थेमधून जात आहेत कारण ज्या गतिविधींना ते ‘जीवन’ समजायचे त्या शारीरिक व प्राणिक मनाच्या जुन्या गतिविधींना, वरून अवतरित होणारी ‘ईश्वरी शक्ती’ हतोत्साहित (discouraging) करत आहे. आणि या गोष्टींचा परित्याग करणे किंवा शांती किंवा नीरवतेच्या आनंदाचा स्वीकार करणे या गोष्टी अजून त्यांच्या अंगवळणी पडलेल्या नाहीत.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 74)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







