तुम्ही योग्य मार्गावर आहात
साधना, योग आणि रूपांतरण – ०५
तुम्हाला जर खरोखरच या योगमार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणाकडून कौतुक किंवा मानसन्मान मिळावा यासाठी करता कामा नये; तर योगसाधना ही तुमच्या जिवाची अनिवार्य निकड असल्यामुळे केली पाहिजे, कारण त्याशिवाय अन्य कोणत्याच मार्गाने तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही अगोदरच स्वत:ला समजावले पाहिजे की, जसजसे तुम्ही सामान्य माणसाहून अधिक प्रगत होत जाल, त्यांच्या सामान्य जीवनपद्धतीहून अधिकाधिक दूर जाल, तसतशी लोकं तुमची प्रशंसा कमी प्रमाणात करू लागतील. आणि हे स्वाभाविकच आहे कारण की, ती लोकं तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. मी पुन्हा एकवार सांगते की, या गोष्टीला अजिबात महत्त्व नाही.
तुम्ही प्रगती केल्याविना राहूच शकत नाही म्हणून (योग) मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये ‘खरा प्रामाणिकपणा’ सामावलेला आहे. तुम्ही ‘दिव्य जीवना’साठी स्वत:ला वाहून घेता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही. (हे सारे तुम्ही करता) कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते.
जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.
– श्रीमाताजी (CWM 03 : 282-283)
- नैराश्यापासून सुटका – ३३ - October 22, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३२ - October 21, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३१ - October 20, 2025






