अरविंद घोष – ३०
‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
मि. पॉल व मीरा रिचर्ड्स (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) यांच्याबरोबर अरविंद घोष यांचा पत्रव्यवहार होत राहिला. त्याबद्दल अरविंद यांनी म्हटले आहे की, “युरोपमधील दुर्मिळ योग्यांमध्ये पॉल व मीरा रिचर्ड्स यांची गणना होते, माझा त्यांच्याशी गेल्या चार वर्षांपासून भौतिक आणि आध्यात्मिक पातळीवरील पत्रव्यवहार चालू आहे.”
अरविंदांनी आपल्या निकटवर्तियांना, (जे त्यांच्याबरोबर देशासाठी क्रांतिकार्यात सहभागी झाले होते, आणि जे आता त्यांच्याबरोबर राहत होते), सांगितले होते की, ”फ्रान्सच्या उच्चस्तरीय सांस्कृतिक वर्तुळातील दोन व्यक्ती योगसाधना करण्यासाठी, आपल्या येथे येणार आहेत.” त्यामुळे सर्वांच्याच मनात या दोन पाहुण्यांच्या भेटीची उत्सुकता दाटली होती.
या सुमारास अरविंदांची आध्यात्मिक अवस्था काय होती? या वेळेपर्यंत म्हणजे १९१४ साल उजाडेपर्यंत अरविंदांना, त्यांचा ‘पूर्णयोग’ ज्या चार साक्षात्कारांवर आधारलेला आहे, त्यापैकी दोन साक्षात्कार झालेले होते. जानेवारी १९०८ मध्ये, महाराष्ट्रीय योगी श्री. विष्णु भास्कर लेले यांच्या मार्गदर्शनाखाली, अरविंदांना ‘स्थल-कालाच्या अतीत असलेल्या ब्रह्मा’चा साक्षात्कार झालेला होता. नंतरचा साक्षात्कार होता ‘विश्वात्मक ब्रह्मा’चा. अलीपूरच्या तुरुंगात ‘वासुदेवम् सर्वमिती’ हा साक्षात्कार त्यांना झाला होता. उर्वरित दोन साक्षात्कारांच्या दिशेने आवश्यक अशी साधना अलीपूरच्या तुरुंगातच सुरु झाली होती. एकाचवेळी स्थितिमान आणि गतिशील असणाऱ्या ब्रह्माचा (Static and Dynamic Brahman) साक्षात्कार अजून बाकी होता. तो साधनामार्ग आणि अतिमानसाच्या (Supramental) पातळ्या यांचे अचूक दिग्दर्शन त्यांना तुरुंगातच झाले होते. आणि आता पाँडिचेरी येथे त्यानुसार मार्गक्रमण चालू होते.
त्यांनी स्वत:च्या आंतरिक आणि बाह्य जीवनातील घटनांसाठी, केवळ अंतर्यामीच्या दिव्य शक्तीवर, म्हणजेच ‘श्रीकृष्णा’वर विसंबून राहायला सुरुवात केली होती. आता पाँडिचेरीत आल्यापासून, योगमार्गातील सप्तचतुष्टयाचा साधनाक्रम हाती घेतला होता. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला होता. (क्रमश:)
- नैराश्यापासून सुटका – ०१ - September 19, 2025
- जीवन जगण्याचे शास्त्र – ०१ - August 14, 2025
- आत्मसाक्षात्कार – ०१ - July 17, 2025






