निसर्गाचे रहस्य – १६
‘प्रकृती’ने ही सृष्टी हाती धरलेली आहे, ती पूर्णतः अचेतन असल्यासारखी वाटते परंतु तिच्यामध्ये ‘परम चेतना’ आणि एकमेव ‘सद्वस्तु’ सामावलेली आहे आणि हे सर्व विकसित व्हावे, आत्म-जागृत व्हावे, आणि त्यांनी स्वतःला पूर्ण जाणून घ्यावे यासाठी ती कार्य करत असते. परंतु या गोष्टी ती अगदी सुरुवातीलाच प्रकट करत नाही. ती त्या हळूहळू विकसित करत नेते आणि म्हणूनच प्रारंभी गुप्त असलेली ही बाब शेवटाकडे येता-येता प्रकट होत जाते. आणि मनुष्य आता उत्क्रांतीच्या एका उच्च बिंदूपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्यासमोर प्रकृतीचे हे उपरोक्त रहस्य प्रकट केले जाऊ शकते आणि आजवर जे वरकरणी अचेतनेमध्ये घडले होते तेच आता सचेतनतेने, स्वेच्छेने आणि म्हणूनच कितीतरी अधिक वेगाने आणि साक्षात्काराच्या आनंदामध्ये घडू शकते.
आध्यात्मिक वास्तविकता (Spiritual Reality) मनुष्यामध्ये विकसित केली जात आहे आणि ती आता स्वतःला समग्रपणे आणि मुक्तपणे अभिव्यक्त करणार आहे, हे मनुष्यामध्ये घडताना एखादी व्यक्ती आता आधीच पाहू शकते. यापूर्वी, प्राण्यांमध्ये व वनस्पतींमध्ये, (अशाच प्रकारचे काहीतरी घडत होते) ते दिसण्यासाठी अतिंद्रिय दृष्टी (clairvoyant) असणे आवश्यक होते, मात्र मनुष्य हा त्याच्या स्वतःच्या ठायी असणाऱ्या या आध्यात्मिक वास्तविकतेविषयी जागरूक आहे; किमान मानवी अस्तित्वाच्या उच्चतर भागामध्ये तरी ही जाणीव असते. ‘परमस्रोता’ला आपल्याकडून कशाची अपेक्षा आहे हे मनुष्याला आता कळू लागले आहे आणि ते प्रत्यक्षात उतरावे म्हणून तो आता सहकार्य करू लागला आहे.
सृष्टी म्हणजे वस्तुनिष्ठीकरण (objectivisation) झालेला खुद्द ‘निर्माणकर्ता’च आहे, याविषयी सृष्टीने स्वत:ने जागरूक व्हावे अशी तिच्याकडून ‘प्रकृती’ची अपेक्षा आहे. म्हणजे असे की, ‘निर्माणकर्ता’ आणि ‘निर्मिती’ (The Creator and the Creation) यांच्यामध्ये भेद नाहीच मुळी, आणि त्यामुळे सजग व प्रत्यक्षीभूत झालेले ऐक्य हे उद्दिष्ट आहे. हेच ‘प्रकृती’चे गुपित आहे.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 321-322)
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026






