अमर्त्यत्वाचा शोध ३८
अतिमानस आणि अमर्त्यत्व
अतिमानसिकीकरणाचे (supramentalisation) जे सर्व संभाव्य परिणाम आहेत त्यांपैकी एक परिणाम म्हणजे अमर्त्यत्व, परंतु हा काही अनिवार्य असा परिणाम नाही आणि जीवन आत्ता जसे आहे तसेच ते अगणित काळ चालू राहील किंवा ते शाश्वत टिकून राहील, असा याचा अर्थ नाही. अनेक जण असा विचार करतात की, ते त्यांच्या साऱ्या मानवी इच्छावासनांसहित आत्ता ते जसे आहेत तसेच कायम राहतील आणि एकच फरक असेल तो म्हणजे ते त्या वासना अनंत काळपर्यंत तृप्त करत राहतील. परंतु असे अमर्त्यत्व प्राप्त करून घेण्याच्या योग्यतेचे नाही… दिव्य चेतना प्राप्त करून घेणे आणि दिव्यत्वामध्ये जीवन जगणे, हे स्वयमेव अमर्त्यत्व आहे आणि शरीरसुद्धा दिव्य बनविणे आणि ते ईश्वरी कार्यासाठीचे व दिव्य जीवनासाठीचे सुयोग्य असे साधन बनविणे, ही त्याची फक्त भौतिक अभिव्यक्ती असेल.
*
शारीर-मनाच्या (Physical mind) चेतनेला सुधारित अतिमानसिक प्रकाशाचा (Supramental Light) स्पर्श झाला तरी किंवा जडामध्ये किंवा अगदी शारीर-मनामध्ये अधिमानसाचे (Overmind) अवतरण झाले तरी, त्या अवतरणाबरोबर शरीराचे अमर्त्यत्व येत नाही तर, शरीरामध्ये अमर्त्यत्वाची चेतना येऊ शकते. या अगदी प्रारंभिक खुलेपणाच्या गोष्टी आहेत, पण त्या म्हणजे काही ‘जडा’मधील अतिमानसिक परिपूर्ती नव्हेत.
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 314 & 275)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५ - December 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ - December 12, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ - December 11, 2025






