आत्म-समर्पणाचे प्रमुख शत्रू
समर्पण – ३९
महान आणि संपूर्ण मुक्तीसाठी तुम्ही निस्पृह, निर्द्वंद्व आणि निरहंकारी असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टींची अभिलाषा असता कामा नये, तुम्ही त्यांच्या लोभाने ओढले जाता कामा नये; द्वंद्वांचे
जे सगळे संस्कार असतात त्यापासून तुम्ही मुक्त असला पाहिजेत, आणि तुम्ही अहंकारापासून मुक्त असला पाहिजेत; कारण ह्या तीन गोष्टी म्हणजे आत्म-समर्पणाचे प्रमुख शत्रू असतात.
*
ज्या साधकाने आत्मसमर्पणाचा संकल्प केलेला आहे पण पूर्ण आत्मसमर्पण ज्याला अजूनपर्यंत साध्य झालेले नाही अशा साधकाबाबत अहंकाराच्या पायावर उभे राहून गुणांचे जे कार्य चालू असते, त्याचे त्याचे विशिष्ट असे धोके संभवतात. रजोगुणाचा धोका तेव्हा असतो जेव्हा, गर्वाने घाला घातलेला साधक असा विचार करतो की, “मी खूप मोठा साधक आहे, मी इतक्या पुढे निघून गेलेलो आहे, मी ईश्वराच्या हातातील एक महान साधन आहे,” किंवा अशाच कल्पना तो करत राहतो किंवा तो जेव्हा एखादे कार्य हे ईश्वरी कार्य आहे असे मानून त्याच्याशी स्वतःला जोडून घेतो, तो त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देतो आणि त्याने स्वतःलाच इतका त्रास करून घेतो की जणू काही खुद्द ईश्वरापेक्षादेखील त्यालाच या ईश्वरी कार्यामध्ये अधिक रस आहे आणि जणू काही तो ईश्वरापेक्षा ते कार्य चांगल्या रीतीने करू शकतो. बरेचजण, जे सदासर्वकाळ या राजसिक अहंकाराच्या भावनेतून कार्य करत असतात, ते स्वतःला असे समजावत राहतात की, ईश्वर त्यांच्या माध्यमातून कार्य करत आहे आणि त्या कार्यामध्ये त्यांचा स्वतःचा असा काही भाग नाही. असे होते याचे कारण असे की ते संपूर्ण व्यवस्था आणि जीवन आत्मसमर्पणाच्या संकल्पनेने भरून जाण्याची वाट न पाहता, ते समर्पणाच्या केवळ बौद्धिक मान्यतेवरच समाधानी झालेले असतात. अस्तित्वाच्या इतर घटकांमध्येदेखील ईश्वराचे नित्य स्मरण आणि वैयक्तिक अधीरतेचा (स्पृहा) परित्याग या गोष्टी आवश्यक असतात; ईश्वर, आत्मज्ञानाच्या पूर्ण प्रकाशाने आत्म-वंचनेच्या साऱ्या संभाव्य शक्यता जोवर नाहीशा करून टाकत नाही तोपर्यंत आपल्या आंतरिक हालचालींचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक असते.
– श्रीअरविंद
(CWSA 13 : 82-83), (CWSA 13 : 84)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025






