आत्मसाक्षात्काराकडून अधिक उच्चतर ध्येयाकडे…
(आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे इतिकर्तव्यता झाली असे मानण्याची एक सहज-प्रवृत्ती आढळून येते, ही गोष्ट श्रीमाताजींनी निदर्शनास आणून दिली आहे. तो भाग आपण काल विचारात घेतला. येथे ही प्रवृत्ती कितपत यथार्थ आहे याचा परामर्श त्या घेत आहेत. तो विचार आज समजावून घेऊ…)
परमेश्वर जेव्हा आविष्कृत झाला तेव्हा (आत्मसाक्षात्कार, मुक्ती, निर्वाण आणि लय) हेच त्याचे ध्येय होते आणि हेच त्याचे प्रयोजन होते, असे खरोखरच तुम्हाला वाटते का?
जर का तसे असते तर, ही अखिल सृष्टी, हे आविष्कृत झालेले अखिल विश्व म्हणजे एक अतिशय विचित्र थट्टा ठरली असती. या सृष्टीमधून जर बाहेरच पडायचे असते तर मग या सृष्टीचा आरंभच का झाला असता?
आजवर जो इतका संघर्ष केला, इतक्या हालअपेष्टा सोसल्या, हे जे काही निर्माण केले त्या सगळ्याचा काय उपयोग? कारण वरकरणी पाहता तरी ते अत्यंत शोकात्म आणि नाट्यमय दिसत आहे. हा सगळा खटाटोप काय फक्त लौकिकातून पारलौकिकात कसे जायचे हे शिकविण्यासाठीच केला गेला आहे? आणि मग जर का तसेच असते तर या सगळ्याचा आरंभच झाला नसता तर बरे झाले असते, नाही का?
पण व्यक्तीने जर या साऱ्याचा मुळातून विचार केला आणि तिने केवळ अहंकारच (egoism) नाही तर, अहंभावदेखील (ego) नष्ट केला; तिने जर हातचे काहीही राखून न ठेवता, अगदी पूर्णपणे व निरपेक्षपणे आत्मदान केले, तर ईश्वरी योजनेच्या आकलनाची क्षमता तिच्यामध्ये येते. आणि मग तिला हे ज्ञान होते की, हे सर्व म्हणजे काही निव्वळ थट्टा नाहीये किंवा तुम्ही जिथून आरंभ केला होता, तिथेच काहीसे घायाळ होऊन परत याल, असा हा एखादा त्रासदायक मार्गदेखील नाहीये. उलट, अखिल सृष्टीला अस्तित्वाचा आनंद, अस्तित्वाचे सौंदर्य, अस्तित्वाची महानता, उदात्त जीवनाचे राजवैभव शिकविण्यासाठी आणि त्या आनंदाची, त्या सौंदर्याची, त्या महानतेची सदोदित प्रगमनशील असणारी आणि निरंतर होत जाणारी वृद्धी शिकविण्यासाठी, या सृष्टीची निर्मिती झाली आहे हे त्या व्यक्तीला उमगते.
आणि हे समजल्यावर मग मात्र प्रत्येक गोष्टीला अर्थ प्राप्त होतो. तेव्हा मग आजवर जो संघर्ष केला, दुःखभोग सहन केले त्याचा पश्चात्ताप व्यक्तीला होत नाही. उलट आता, दिव्य ध्येय (आत्म-साक्षात्कारानंतर त्याच्या आधारे प्रकृतीचे रूपांतरण) साध्य करण्यासाठी व्यक्तीच्या अंगी उत्साह संचारतो आणि मग अशी व्यक्ती त्या दिव्य ध्येयप्राप्तीच्या आणि विजयाच्या निश्चितीने त्या साक्षात्काराकडे झेपावते.
– श्रीमाताजी (CWM 09 : 426-427)
- खरी आणि विशुद्ध निश्चल-नीरवता - August 15, 2026
- ईश्वरी अवतरणाचा दाब - August 12, 2026
- चालत्या गाड्याला खीळ… - August 11, 2026




