आहाराबाबत विधिनिषेध

शरीर आरोग्यपूर्ण ठेवण्यसाठी आणि सामर्थ्य संपादन करण्यासाठी आपण अन्नग्रहण करतो; आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नाही, हे व्यक्तीला अगदी लहानपणापासूनच माहीत असले पाहिजे. लहान मुलांना त्यांच्या प्रकृतीस मानवेल असे अन्न दिले पाहिजे. अन्न आरोग्यदायी असेल याची खात्री केली पाहिजे आणि स्वच्छतेची खबरदारी घेऊन ते तयार केलेले असावे. तसेच ते रुचकर असूनही अतिशय साधे, सात्त्विक असले पाहिजे. मुलांचे वय आणि त्यांच्या रोजच्या कृती पाहून, त्यानुसार आणि त्या प्रमाणात आहाराची निवड केली पाहिजे. मुलांच्या शरीराच्या प्रत्येक घटकाच्या संतुलित वाढीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पोषक द्रव्यांचा समावेश त्यांच्या आहारात केला पाहिजे.

मुलं निरोगी राहण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असणारी ऊर्जा पुरविण्यासाठी साहाय्य व्हावे यासाठी आहार द्यायचा असल्यामुळे, आहाराबाबत त्यांच्यावर सक्ती करता कामा नये किंवा त्या अन्नाचा उपयोग शिक्षा म्हणूनही कधी करता कामा नये. “तू नीट वागला नाहीस त्यामुळे तुला आता मी हा खाऊ देणार नाही,” असे मुलांना कधीही म्हणू नये. ही पालकांची सवय अतिशय घातक असते. असे जर तुम्ही त्याला सांगितलेत तर, शरीर योग्य रितीने कार्यरत राहावे म्हणून अन्न आवश्यक नसून, ते मुख्यत: त्याचे लाड पुरविण्यासाठी त्याला दिले जाते, अशी त्याची समजूत होण्याची शक्यता असते आणि त्याच्या चेतनेमध्ये तीच धारणा पक्की होण्याची शक्यता असते.

• श्रीमाताजी (CWM 12 : 14)

श्रीमाताजी