निरय संकल्पनेचा खरा अर्थ
(आंतरिक धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो हे आपण कालच्या भागात पाहिले. श्रीमाताजी आता येथे बौद्धमतामधील ‘निरय’ या शब्दाचा सखोल अर्थ समजावून सांगत आहेत.)
व्यक्तीने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल, तिला जिथे शिक्षा केली जाते ती जागा म्हणजे एक प्रकारचा नरक, असा बौद्धमतातील ‘निरय’ (Niraya) या संकल्पनेचा प्रचलित अर्थ होतो. परंतु त्याचा अन्यही एक अर्थ आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे एक विशिष्ट सत्य असते; खरंतर त्या सत्याकडून तिच्या चेतनेच्या सर्व गतिविधींचे आणि शरीराच्या सर्व कृतींचे संचालन झाले पाहिजे. पण व्यक्ती जेव्हा तिच्या या आंतरिक धर्मानुसार आचरण करत नाही — म्हणजे केवळ बाह्य नीतिनियम किंवा सामाजिक नियमांनुसार आचरण असे नव्हे — तर, जेव्हा ती स्वतःशीच विसंगत अशा रितीने आचरण करते तेव्हा, ती स्वतःभोवती जे एक प्रकारचे (अनिष्ट) वातावरण निर्माण करते त्या वातावरणाला ‘निरय’ असे म्हणता येईल. हा निरय या संकल्पनेचा खरा अर्थ आहे.
…जेव्हा एखादा माणूस त्याच्या इच्छावासना, त्याचे भावावेग यांचेच म्हणणे ऐकत असतो, त्याबरोबर वाहवत जात असतो किंवा आत्मपरीक्षण करण्यासाठी ज्याच्यापाशी वेळ नसतो, जो पूर्णपणे निंदानालस्ती करतच जीवन खर्च करतो, त्याच्या जीवनाचे इतरांवर काय परिणाम होतील, त्याच्या वर्तणुकीचे काय बरेवाईट परिणाम होतील याची जो पर्वा करत नाही, तो स्वतःभोवती कुरुपतेचे, स्वार्थीपणाचे, संघर्षाचे आणि दुरिच्छेचे एक वातावरण तयार करतो. आणि स्वाभाविकपणे त्या वातावरणाचा त्याच्या स्वतःच्या चेतनेवर परिणाम होतो आणि त्यातून एकंदरच जीवनाकडे तो कडवटपणे पाहू लागतो. आणि सरतेशेवटी त्याची ही वृत्ती म्हणजे कायमचे यातनाघर होऊन बसते. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 03 : 278-279)
- प्रामाणिक शरणागती - May 20, 2026
- अहंकार निर्मूलनासाठी प्रामाणिकपणाची आवश्यकता - May 19, 2026
- प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला आरंभच करू नका - May 17, 2026




