चेतनेमधील वेगवेगळे घटक आणि त्यांच्यामधील विसंवाद
(आपल्या चेतनेमधील वेगवेगळे घटक आणि त्यांच्यामधील विसंवाद याची आपल्याला जाणीव नसते याविषयी श्रीमाताजींनी काही सांगितले आहे. ते कालच्या भागात आपण पाहिले.)
चेतनेचा एक घटक म्हणत असतो की, “नाही, अमुक एक गोष्ट मला नकोय.” पण त्याच्यामागे अनेक घटकांचा एक ढिगाराच जणू काही लपून बसलेला असतो. आणि तो मात्र त्याविषयी काहीच म्हणत नाही, तो ढिगारा स्वतःचे अस्तित्वसुद्धा जाणवू देत नाही. बहुधा अज्ञानामुळे, त्याला गोष्टी जशा आहेत तशाच चालू राहाव्यात असे वाटत असते. त्या घटकांना असे वाटत असते की, जगात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडत असते आणि म्हणून अमुक एखाद्या गोष्टीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, यावर त्यांचा विश्वासच नसतो.
मला पूर्वी एकदा एक स्त्री भेटली होती. तिच्याविषयी मी तुम्हाला सांगितले होते ना? ती नेहमी म्हणायची, “व्यक्ती जेव्हा स्वतःमध्ये बदल करू पाहते, तेव्हा सगळे त्रास सुरू होतात.” एका फ्रेंच लेखकाने याच गोष्टीचा पुनरुच्चार केला आहे आणि त्याने तर त्यापासून त्याचा आवडता सिद्धान्तच तयार केला आहे. “तुम्ही जेव्हा स्वतःला परिपूर्ण बनवायचे अशी इच्छा बाळगता, तेव्हा दुःखसंकटं यायला सुरुवात होते. म्हणून तुम्ही स्वतःला परिपूर्ण बनवण्याचा संकल्प केला नाहीत तर तुम्हाला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.” हा होता त्याचा सिद्धान्त. हा सिद्धान्त पूर्णपणे चुकीचा आहे. पण त्याच वेळी एक गोष्ट मात्र खरी आहे की, तुमच्यामधील बदलास नाखूष असणारे काही घटक मात्र म्हणत असतात, “काय कटकट आहे? आम्हाला एकटेच राहू द्या.” तुम्ही कोणताही त्रास दिलेला त्यांना चालत नाही, ते जसे आहेत तसेच ते राहावेत अशी त्यांची इच्छा असते.
– श्रीमाताजी (CWM 04 : 74-75)
- खरी आणि विशुद्ध निश्चल-नीरवता - August 15, 2026
- ईश्वरी अवतरणाचा दाब - August 12, 2026
- चालत्या गाड्याला खीळ… - August 11, 2026





