खरी समस्या

तुमच्या सचेत अस्तित्वामधील (conscious being) कोणत्या तरी एखाद्या घटकाला तुमच्यामधीलच अमुक एक अडचण (वाईट सवय, वासनाविकार इ.) नको असते, त्या अडचणीवर मात करण्याची त्याची प्रामाणिक इच्छा असते, पण तुमच्या चेतनेच्या इतर घटकांमध्ये ज्या असंख्य गतिविधी चाललेल्या असतात त्याविषयी तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ असता; ही खरी समस्या असते.

तुम्ही म्हणत असता की, “मला त्यापासून सुटका हवी आहे.” पण दुर्दैव असे की, मला अमुक एक गोष्ट ‘हवी आहे’, असे नुसते म्हणणे पुरेसे नसते. कारण, तुमच्या चेतनेमधील काही घटक, तुम्ही त्यांचा बंदोबस्त करू नये म्हणून, स्वतःला तुमच्यापासून लपवून ठेवतात. आणि जेव्हा तुमचे लक्ष दुसरीकडे वळते तेव्हा ते घटक जोरकसपणे पुढे येतात.

आणि म्हणूनच माझे नेहमी हे सांगणे असते की, पूर्णपणे प्रामाणिक व्हा. स्वत:ला फसविण्याचा प्रयत्न कधीही करू नका. ‘तुम्हाला जे जे करता येण्यासारखे होते ते सारेकाही तुम्ही केले आहे,’ असे म्हणू नका. तुम्ही अपयशी ठरलात तर, त्याचा अर्थ असा होतो की, जे जे करण्यासारखे होते ते सारे तुम्ही केले नव्हते. कारण तुम्हाला जे जे करता येणे शक्य होते ते ते ‘सर्व‌’ जर तुम्ही खरोखरच केले असते, (म्हणजे स्वत:च्या अस्तित्वातील सर्व कानेकोपरे तुम्ही शोधले असले आणि तेथे दडलेले घटक बाहेर काढले असते) तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळाले असते. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 04 : 73-74)

श्रीमाताजी
Latest posts by श्रीमाताजी (see all)