बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? – भाग ०२

(तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर तुमची प्रगती कधीच होऊ शकणार नाही, या नियमाबद्दल श्रीमाताजींनी काही सांगितले आहे. आपण कालच्या भागात त्याचा विचार केला.)

काही व्यक्ती वर नमूद केलेल्या नियमाला अपवाद असतात, असे समजू नका. कारण (जडत्व, आळस, अज्ञान, नैराश्य, नकारात्मक विचार इ.) प्राकृतिक स्वभावधर्माचा भाग वाट्यालाच आला नाही, अशा रितीने कोणीही या भौतिक जगात राहू शकत नाही. आणि प्राकृतिक स्वभाव हा नेहमीच संमिश्र असतो; त्यात खऱ्याखोट्याची सरमिसळ झालेली असते. जेव्हा तुम्ही पूर्णत: प्रामाणिकपणा अंगी बाणवाल तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या ठिकाणी संपूर्णतः निर्भेळ असे काहीही नाही. पण तुम्ही तुमच्यातील सर्वोच्च चेतनेच्या प्रकाशात, स्वतःच्या नजरेला नजर भिडवून पाहिलेत तर मग, तुमच्या प्रकृतीमधील जे काही काढून टाकायची तुमची इच्छा आहे ते नाहीसे होईल. अशा संपूर्ण प्रामाणिकपणासाठी तुम्ही प्रयत्न केला नाहीत तर एखादा दोष किंवा त्याची लहानशी पडछाया पुन्हा डोकं वर काढण्याच्या संधीची वाट पाहत एका कोपऱ्यात दडून बसेल.

मी येथे मी प्राणाविषयी बोलत नाहीये तर, मी फक्त मनाविषयी बोलत आहे. (तुमच्या हातून घडलेल्या चुकीविषयी अंतरंगातून कोणीतरी सांगते की, तुम्ही चुकीचे वागलात. आणि तेव्हा बघा तुमच्यामध्ये कशी अस्वस्थता निर्माण होते.) तुमच्या ठिकाणी एखादी लहानशी अप्रिय संवेदना, थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली तर पाहा, तुमचे मन किती पटकन तुमच्या त्या तशा वागण्याचे समर्थन करते. ते दुसऱ्या कोणावर तरी खापर फोडते किंवा परिस्थितीला दोष देते. ते म्हणते की, “मी जे काही केले ते बरोबरच होते; आणि अमुक एक गोष्ट चुकीची झाली त्याला मी जबाबदार नाही.” तुम्ही जर स्वत:कडे काळजीपूर्वक पाहिलेत तर तुम्हाला असे दिसून येईल की हो, खरंच की, ते तसंच आहे आणि त्याची तुम्हाला खूप गंमतही वाटेल.

स्वत:ची किंवा दुसऱ्यांची फसवणूक न व्हावी म्हणून जर एखादे मूल अगदी लहानपणापासून स्वत:चे काळजीपूर्वक परीक्षण करू लागले, प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण करू लागले, तर ते त्याच्या अंगवळणी पडेल आणि त्यामुळे त्याच्या नंतरच्या जीवनातील (प्रामाणिक होण्यासाठी करावे लागणारे) बरेचसे कष्ट कमी होतील. (क्रमश:)

श्रीमाताजी