आत्म-परीक्षण
माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात तिच्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. कधीकधी त्या व्यक्तीच्या स्वभावाची एक बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच बाजू व्यक्त होते किंवा अमुक एका संदर्भात व्यक्ती जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांच्या बाबतीत वागू शकते.
मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीच्या आत्म-परीक्षणात्मक दृष्टीमध्ये निर्मम-वस्तुनिष्ठता असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ‘ईश्वरी-कृपे’मुळेच, साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या उणिवा असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ‘ईश्वरी-कृपे’मध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)
- जगाची नवनिर्मिती तरुणच करतील - June 22, 2026
- दुर्गुणांचे शुद्धीकरण - June 18, 2026
- नैतिक शिक्षणाची संधी - June 17, 2026







