अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – २४
साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक आवेगांच्या भेसळीतून जेव्हा साधक मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रत साधेसुधे व प्रामाणिक आत्मार्पण करू शकेल तेव्हाच त्या साधकातील चैत्य पुरुष, अंतरात्मा (Psychic Being) पूर्णत: खुला होईल. जर त्यामध्ये कोणतेही अहंकारी वळण असेल किंवा प्रेरणेमध्ये अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन साधना केली जात असेल किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा योगिक शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची ऊर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य पुरुष मुक्त होणार नाही किंवा तो जर मुक्त झालाच तर तो अंशत:च किंवा काही काळासाठीच मुक्त होईल आणि परत बंदिस्त होऊन जाईल कारण तो प्राणिक कृतींनी झाकला गेलेला असेल. आंतरात्मिक अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो.
तसेच, साधनेमध्ये फक्त मनच पुढाकार घेत असेल आणि अंतरात्म्याला मागे ठेवत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया अंतरात्मिक रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तरीदेखील तशीच अ-क्षमता निर्माण होते. शुद्धता, साधासरळ प्रामाणिकपणा आणि कोणत्याही ढोंगाची किंवा मागणीची ज्यामध्ये भेसळ झालेली नाही अशी निरहंकारी आत्मार्पण-क्षमता या चैत्य पुरुषाच्या पूर्ण प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 349)
- प्रामाणिकपणा आणि खुलेपणा - March 4, 2026
- आत्म-परीक्षण - February 26, 2026
- साधासरळपणा आणि स्व-समर्थन - February 19, 2026





