अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १२
तुमच्यापैकी बहुतेक जण तुमच्या व्यक्तित्वाच्या पृष्ठस्तरावर जीवन जगत असता आणि त्यामुळे तुमच्यावर बाह्य प्रभावांचा सहज परिणाम होतो. तुम्ही जणू तुमच्या स्वतःच्या शरीराबाहेर प्रक्षेपित (projected) होऊन, जीवन जगत असता आणि तशाच तऱ्हेने प्रक्षेपित झालेला दुसरा कोणी त्रासदायक माणूस तुम्हाला भेटला की तुम्ही अस्वस्थ होता. हा सगळा त्रास उद्भवतो कारण तुम्हाला दोन पावलं मागे घेण्याची, अंतरंगात वळण्याची (stepping back) सवय नसते.
तुम्ही नेहमी स्वतःमध्ये, स्वतःच्या आतमध्ये राहिले पाहिजे. तुम्ही अंतरंगामध्ये खोलवर जाण्यास शिकले पाहिजे. अंतरंगामध्ये प्रवेश करा म्हणजे मग तुम्ही सुरक्षित व्हाल. तुम्ही बाह्य जगामध्ये वावरत असणाऱ्या वरकरणी शक्तींच्या आहारी जाऊ नका. अगदी जेव्हा तुम्ही काहीतरी करण्याच्या घाईगडबडीत असता तेव्हासुद्धा क्षणभर अंतरंगात वळा आणि मग तुमचे तेच काम किती लवकर आणि किती चांगल्या रितीने करता येते हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्यावर जर कोणी रागावले तर, त्याच्या त्या रागाच्या स्पंदनांचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका; केवळ अंतरंगामध्ये वळा म्हणजे मग त्या व्यक्तीच्या रागाला कोणताही आधार न मिळाल्यामुळे किंवा कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे, तिचा राग मावळून जाईल. कायम शांती बाळगा, तिचा भंग करणाऱ्या साऱ्या प्रलोभनकारी आवेगांचा प्रतिकार करा.
अंतरंगामध्ये शिरल्याशिवाय कोणताच निर्णय घेऊ नका. अंतरंगामध्ये शिरल्याशिवाय एक शब्ददेखील बोलू नका. अंतरंगामध्ये शिरल्याशिवाय घाईगडबडीने कोणतीच कृती करू नका.
सामान्य जगाशी संबंधित असणारे सारेकाही अस्थायी आणि क्षणभंगुर असते आणि त्यामुळे त्यामध्ये अस्वस्थ होण्यासारखे काहीच नसते. जे टिकाऊ आहे, जे शाश्वत आहे, जे अमर्त्य आणि अनंत आहे तेच खरेतर प्राप्त करण्यायोग्य असते, तेच विजय प्राप्त करून घेण्यायोग्य आणि तेच हस्तगत करण्यायोग्य असते. ते म्हणजे ‘दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम, दिव्य जीवन’ आहे. तेच परम शांती, परिपूर्ण हर्ष आणि संपूर्ण आविष्करण यांसहित या पृथ्वीवरील सर्व-प्रभुत्वसुद्धा आहे; ते शिखरस्थानी आहे. जेव्हा तुम्हाला वस्तुंच्या सापेक्षतेची जाणीव होते तेव्हा काहीही घडले तरी, तुम्ही दोन पावलं मागे होऊन, अंतरंगात डोकावून बघू शकता; तुम्ही अविचल राहून, दिव्य शक्तीची आळवणी करू शकता आणि तिच्या प्रतिसादाची वाट पाहू शकता. तेव्हा नक्की काय केले पाहिजे ते तुम्हाला नेमकेपणाने उमगेल.
म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही अगदी शांतचित्त असल्याशिवाय तुम्हाला दिव्य शक्तीच्या प्रतिसादाचे आकलन होणार नाही. आंतरिक शांतीचा अभ्यास करा, किमान थोडीतरी सुरुवात करा आणि जोवर ती सवय तुमच्या अंगवळणी पडत नाही तोवर तुमचा सराव चालूच ठेवा.
– श्रीमाताजी (CWM 03 : 160)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४ - January 26, 2026







