पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७
श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे. जे सत्य मनाला अजूनपर्यंत ज्ञान म्हणून कवळता आलेले नाही त्या सत्याची एक झलक म्हणजे श्रद्धा.
*
साधकाने आध्यात्मिक गोष्टींवर श्रद्धा ठेवावी अशी त्याच्याकडून अपेक्षा केली जाते; पण ती श्रद्धा अज्ञानमय नव्हे तर प्रकाशमय असणे अपेक्षित असते. त्याने अंधकारावर नव्हे तर, प्रकाशावर श्रद्धा ठेवणे अपेक्षित असते. ही श्रद्धा बाह्य रंगरूपांकडून किंवा दृश्यमान तथ्यांकडून मार्गदर्शन घेण्यास नकार देते (ही श्रद्धा बाह्य रंगरूपांना किंवा दृश्यमान तथ्यांना भुलून, त्यांच्या आधारे निर्णय घेत नाही.) कारण त्या पाठीमागे असणारे सत्य तिला दिसत असते. ही श्रद्धा साक्षी, पुरावे यांच्या कुबड्या घेऊन चालत नाही आणि म्हणून शंकेखोर बुद्धीला ती अंधश्रद्धा आहे असे वाटत असते.
(वास्तविक) ती श्रद्धा म्हणजे अंतर्ज्ञान असते. अनुभवाने तिला समर्थन पुरवावे म्हणून हे अंतर्ज्ञान वाट पाहते आणि हे अंतर्ज्ञानच (साधकाला) त्या अनुभवाप्रत घेऊन जाते. मी जर स्वतःला तंदुरुस्त करण्यासाठी, स्वतःच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवत असेन तर, कालांतराने का होईना पण त्याचे मार्ग माझे मला सापडतील. त्याचप्रमाणे, माझी जर रूपांतरणावर श्रद्धा असेल तर, रूपांतरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची उकल करून घेऊन, मी ते साध्य करून घेऊ शकेन.
पण मी जर मनात शंका उपस्थित करूनच (साधनेला) प्रारंभ केला आणि ती शंका मनात तशीच बाळगून वाटचाल केली तर त्या मार्गावर मी कुठवर प्रगत होऊ शकेन? हा प्रश्नच आहे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 91), (CWSA 28 : 349)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५ - January 27, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७५ - January 12, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७४ - January 11, 2026






