पूर्णयोगाचे अधिष्ठान – १२
योगसाधनेचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असतो ज्ञानाचा व व्यक्तीच्या स्वत:च्या प्रयत्नांचा आणि दुसरा मार्ग असतो श्रीमाताजींवर भिस्त ठेवण्याचा. या दुसऱ्या मार्गामध्ये, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्यावर कार्य करावे म्हणून, व्यक्तीने आपले मन व हृदय आणि सर्वकाही श्रीमाताजींना अर्पण करणे अभिप्रेत असते तसेच सर्व अडीअडचणींच्या वेळी त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्यावर श्रद्धा व भक्ती ठेवणे अभिप्रेत असते.
चेतनेची ही अशी तयारी होण्यासाठी सुरुवातीला वेळ लागतो, बरेचदा खूप काळ लागतो आणि त्या दरम्यान पुष्कळ अडचणी येऊ शकतात. परंतु व्यक्तीने प्रयत्नसातत्य ठेवले तर एक वेळ अशी येते की, जेव्हा सर्व तयारी झालेली असते, अशा वेळी ‘श्रीमाताजींची शक्ती’ व्यक्तीच्या चेतनेला पूर्णत: ईश्वराभिमुख करते. अशा वेळी, जे जे काही विकसित होणे आवश्यक असते ते ते सारे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये विकसित होते, आध्यात्मिक अनुभूती येतात आणि त्यासोबतच ज्ञान येते आणि ईश्वराशी ऐक्य घडून येते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 200)







