नैराश्यापासून सुटका – २२

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक अस्वस्थतेमध्ये आणि उदासीनतेमध्ये रममाण होण्याची तुमची वृत्ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे, असे तुम्ही लिहिलेल्या पत्रावरून दिसते. त्यासाठी तिला विशेष असे काही कारण लागत नाही, पण स्वतःचे पोषण व्हावे म्हणून ती प्रत्येक गोष्टीचाच ताबा घेते; वस्तुतः ही मज्जातंतूंच्या दुर्बलतेची केवळ जुनाट अशी सवय आहे. व्यक्ती जेवढी अधिक कुढत बसते, तेवढी उदासीनता अधिकच वाढत राहते.

त्यावर मात करण्याचे तीन मार्ग आहेत. स्वतःमध्ये रमण्यापेक्षा अन्य कोणत्यातरी गोष्टीमध्ये रस घेणे आणि त्यात स्वतःला गुंतवून ठेवणे तसेच तुमच्या मन:स्थितीचा शक्य तितका कमीत कमी विचार करणे, हा पहिला मार्ग आहे.

दुसरा मार्ग म्हणजे या प्राणिक अस्वस्थतेपासून आणि उदासीनतेपासून स्वतःला शक्य तितके विलग करणे आणि त्यांना (धीराने) सामोरे जाणे. जसे तुम्ही आत्ता करत आहात त्याप्रमाणे, त्यांचा स्वीकार करण्यास जोमाने आणि निर्धारपूर्वक नकार देणे.

तिसरा मार्ग म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या शांतीला आवाहन करण्यासाठी, मनाला ऊर्ध्वमुख करण्याची सवय लावून घेणे. ती शांती ऊर्ध्वस्थित आहे आणि तुम्ही जर स्वतःला खुले केलेत तर, ती खाली अवतरित होण्याची प्रतीक्षा करत आहे. ती शांती जर अवतरली तर, ती तुमची या दुःखभोगापासून, त्रासापासून कायमची सुटका करेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180-181)

नैराश्यापासून सुटका – २१

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक निराशेच्या कोणत्याही लहरीला तुमच्यामध्ये शिरकाव करू देऊ नका आणि खिन्न मनोदशेला तर अजिबातच थारा देऊ नका. बाह्य व्यक्तिमत्त्वाबाबत बोलायचे झाले तर, केवळ तुमच्यामध्येच नव्हे, तर प्रत्येकामध्येच, हाताळण्यास अतिशय अवघड असा एक पशु नेहमी दडलेला असतो. त्याला धीराने आणि शांत व प्रसन्न चिकाटीनेच हाताळले पाहिजे. त्याच्या प्रतिकाराने कधीच निराश होऊ नका, कारण त्यामुळे तो हळवा व उद्विग्न होतो आणि हाताळायला अधिकच अवघड होऊन बसतो; अन्यथा तो हतोत्साहित होतो. (तेव्हा निराश न होता) त्याला स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिलासा द्या, त्याच्यावर तुमच्या अविचलतेचे दडपण येईल असे पाहा आणि मग एक दिवस तो ‘ईश्वरी कृपे‌’प्रत पूर्णपणे खुला झाला असल्याचे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 187)

नैराश्यापासून सुटका – २०

 

साधक : मनामध्ये (स्वत:शीच) चालू असणारी अखंड बडबड कशी थांबवावी?

श्रीमाताजी : यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे शक्य तितके कमी बोला. दुसरी अट अशी की, तुम्ही ज्या क्षणी जी गोष्ट करत असता त्या क्षणी फक्त त्याच गोष्टीचा विचार करा. तुम्ही पूर्वी काय केले आहे किंवा यापुढे काय करायचे आहे याचा विचार करत बसू नका. जे होऊन गेले आहे त्याचा खेद करू नका किंवा भविष्यात काय घडेल याची चिंता करत बसू नका. तुमच्यातील निराशाजनक विचारांना आळा घालण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा आणि जाणीवपूर्वक आशावादी बना.

– श्रीमाताजी (CWM 12 : 141)

*

निराशाजनक विचारांना तुम्ही थारा देऊ नका. तसे विचार मनात आलेच तर, ते विचार ‘तुमचे‌’ नाहीत तर, त्या बाहेरून आलेल्या सूचना आहेत, या दृष्टीने त्यांच्याकडे पाहा. शक्य तेवढे अविचल (quiet) राहा आणि ‘श्रीमाताजींच्या शक्ती‌’ला तुमच्यामध्ये कार्य करू द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 186)

नैराश्यापासून सुटका – १९

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुमच्यामध्ये शक्ती व शांती अवतरित होत आहेत आणि तुमच्यामध्ये स्थिरावण्यासाठी त्या अधिकाधिक कार्य करत आहेत, असे स्पष्ट दिसत आहे. उदास राहावेसे वाटणे, आनंदी असण्याची भीती वाटणे यांसारख्या भावना, तसेच आपण अक्षम आहोत किंवा अपात्र आहोत अशा सूचना ही प्राणिक रचनेची (vital formation) नेहमीचीच आंदोलने असतात, पण ती आंदोलने म्हणजे तुम्ही नाही (हे ओळखा.) ती तुम्हाला अजमावण्यासाठी किंवा तुमच्यामधील परिवर्तन रोखण्यासाठी निर्माण होत आहेत. या ज्या सूचना येत आहेत त्यांचा स्वीकार करण्यास नकार द्यायचा आणि तुम्हाला मुक्त व आनंदी करणाऱ्या तुमच्यामधील ‘सत्या’च्या बाजूने तुम्ही चिकाटीने उभे राहायचे, एवढेच तुम्हाला करायचे आहे. तसे केलेत तर सारे काही ठीक होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180)

नैराश्यापासून सुटका – १८

 

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुमच्या प्राणामधील जो भाग बंड करू इच्छित आहे त्याच्याकडे, त्या बंडाचे समर्थन करण्यासारखी खरंतर कोणतीही कारणं नाहीयेत; त्यामुळे तो अडचणीत सापडल्याची किंवा अपेक्षाभंगाची तीव्र वेदना यांपैकी कोणत्यातरी एका मनोदशेला (mood) कवटाळून बसला आहे. प्राणामधील हा भाग अस्वस्थ, इच्छा-वासनामय, उतावळ्या, उदासीन, चंचल अशा सर्व प्रकारच्या मानवी प्रकृतीमधील एक घटक असतो. त्यापासून स्वतःला वेगळे करा आणि त्याला तुम्ही, तुमच्यावर शासन करण्याची किंवा तुम्हाला संचालित करण्याची मुभा देऊ नका.

प्राणाचा एक सुयोग्य भाग देखील असतो. तो उत्कट असतो, उच्चतर गोष्टींबाबत तो संवेदनशील असतो, त्याच्याकडे महान प्रेमाची आणि भक्तीची क्षमता असते. त्याचा उपयोग केलाच पाहिजे. प्राणाच्या त्या भागाला सामर्थ्यवान बनवा. अंतरात्म्याचा आणि वरून येणाऱ्या शांतीचा व विशालतेचा त्याला आधार द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 142)

नैराश्यापासून सुटका – १७

 

प्राण सहसा परिवर्तनाच्या हाकेला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतो, हाच बंडखोरी किंवा प्रतिकार याचा अर्थ आहे. आंतरिक इच्छेने आग्रह धरला आणि बंडखोरीला किंवा प्रतिकाराला प्रतिबंध केला तर, प्राणिक अनिच्छा बरेचदा नैराश्याचे आणि खिन्नतेचे रूप धारण करते. आणि जे शारीर-मन (physical mind) जुन्या कल्पना, सवयी, गतीविधी किंवा कृती यांच्या पुनरावृत्तीला आधार पुरवत असते त्याच शारीर-मनामधील प्रतिरोधाची साथ त्या अनिच्छेला मिळते. परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देण्याच्या भीतीमुळे किंवा आशंकेमुळे जेव्हा शारीर-चेतना (body consciousness) त्रस्त झालेली असते, तेव्हा ती त्या परिवर्तनाच्या हाकेपासून मागे सरकते किंवा मग तिच्यामध्ये एक प्रकारचा मंदपणा येतो, आणि ती त्या परिवर्तनाच्या हाकेचा स्वीकार करत नाही.

या गोष्टींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतलीच पाहिजे. पण त्यासाठी, दुःखी किंवा खिन्न मनोदशा ही योग्य परिस्थिती नव्हे. दुःख, वेदना आणि आशंका, काळजी या सर्व भावनांपासून तुम्ही अलिप्त झाला पाहिजे, त्यांना नकार दिला पाहिजे आणि होणाऱ्या प्रतिरोधाकडे शांतपणे पाहिले पाहिजे. त्याचवेळी, तुमच्यामध्ये असलेल्या परिवर्तनाच्या संकल्पाला नेहमी बळकटी देत राहिले पाहिजे. ईश्वरी साहाय्य लाभल्यामुळे, त्या ईश्वरी साहाय्याद्वारे आज ना उद्या परिवर्तन घडून येईलच आणि त्यामध्ये अपयश येणारच नाही यावर भर दिला पाहिजे. तेव्हा मग, साऱ्या अडचणींवर मात करू शकेल असे सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 141)

नैराश्यापासून सुटका – १६

 

प्राणाच्या असमाधानावर एकच उपाय असतो. प्राण म्हणजेच तुम्ही आहात, असे समजायचे नाही; हाच तो उपाय. जडत्वाबद्दलच्या विचारांमध्ये व्यग्र राहायचे नाही, तर ऊर्ध्वमुख व्हायचे तसेच ‘दिव्य प्रकाश’ आणि ‘दिव्य शक्ती‌’ने प्राणामध्ये प्रवेश करावा म्हणून त्यांना आवाहन करायचे; हा जडत्वावरील उपाय आहे.

*

दुःखभोगामध्ये रमणारी आणि त्याची इच्छा बाळगणारी अशी तुमच्यामध्ये जी गोष्ट असते ती मानवी प्राणाचाच एक भाग असते. या गोष्टींचेच वर्णन आम्ही प्राणाचा अप्रामाणिकपणा व त्याची विकृत अढी असे करतो. प्राणाचा तो भाग दुःख व संकटे यांच्याविरुद्ध ओरडत राहतो आणि ईश्वर, जीवन व इतर सारेजण ‘मला छळत आहेत’ असा आरोप तो करत राहतो. पण बहुतेक वेळा दुःख-संकटे येतात आणि ती टिकून राहतात याचे कारण, प्राणातील त्या विकृत भागालाच ती हवी असतात! प्राणातील त्या भागापासून तुम्ही स्वत:ची पूर्णपणे सुटका करून घेतलीच पाहिजे.

*

प्राण जर अविचल राहिला आणि त्याने मनाला गोष्टींकडे योग्य रितीने पाहू दिले तर ही निराशा येणारच नाही, हे स्वाभाविक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139-140, 178, 186-187)

नैराश्यापासून सुटका – १५

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

अभिमाना‌पासून तुम्ही स्वतःची जेवढी लवकरात लवकर सुटका करून घ्याल तेवढे अधिक बरे. जो कोणी अभिमानाला खतपाणी घालतो तो विरोधी शक्तींच्या अंमलाखाली जातो. खऱ्या प्रेमाचा आणि अभिमानाचा काहीही संबंध नसतो; मत्सराप्रमाणेच (jealousy) अभिमान हा देखील प्राणिक अहंकाराचाच एक भाग असतो.

*

त्वरित परिणाम दिसून आले नाहीत तरी, नाउमेद न होणे हे अतिशय महत्त्वाचे असते, कारण अशावेळी आंतरिक शक्ती क्षीण होते. जेव्हा ती आंतरिक शक्ती क्षीण होते तेव्हा, ’तपोभंग‌’ होतो. पूर्वीचे ऋषीमुनी याविषयी नेहमी तक्रार करत असत. कारण ज्या ज्या वेळी असा तपोभंग होत असे तेव्हा तेव्हा पूर्वपदावर येण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी अगदी पहिल्यापासून पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागत असे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 245, 182)

नैराश्यापासून सुटका – १४

 

उद्वेग, असंतोष यांसारख्या भावावेगांना सावधपणे नकार द्या. अन्यथा त्यातून पुन्हा गोंधळ आणि नैराश्य निर्माण होते. हे भावावेग येण्यापूर्वीच त्यांना परतवून लावणे व्यक्तीला प्रत्येक वेळी जमेलच असे नाही, मात्र मनात ते भावावेग निर्माण झाल्याबरोबर लगेचच व्यक्ती ते काढून टाकू शकते. ते जितके जास्त नाकारले जातील, तितके त्यांचे पुन्हा पुन्हा येणे अवघड होत जाईल. किंवा जर ते भावावेग उत्पन्न झालेच तर, ते अगदी क्षणिक काळासाठीच तुमचा ताबा घेतील आणि नंतर नाहीसे होतील. त्यांना थारा देणे म्हणजे पुन्हा एकदा त्यांना खरी चेतना झाकोळू देण्याची संधी देण्यासारखे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 187)

नैराश्यापासून सुटका – १३

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही इतके अस्वस्थ व्हावे एवढे काही ते कारण मोठे नव्हते. खरंतर, ते कारण अगदीच किरकोळ होते. अर्ध्याकच्च्या आणि अवाजवी भावविवशतेची हीच मोठी अडचण असते. अगदी क्षुल्लक कारणामुळे, तुमच्यामधील ही भावविवशता उफाळून वर आली. साधकांमध्ये आढळून येणाऱ्या चिवट अशा अडथळ्यांपैकी ‘भावविवशता’ (sensitiveness) हा एक सर्वात मोठा अडथळा आहे.

त्यावर दोन उपाय आहेत. पहिला उपाय हा की, ‘श्रीमाताजीं‌’बद्दल आंतरात्मिक विश्वा स असला पाहिजे आणि त्याच्या जोडीला समर्पण असले पाहिजे; म्हणजे, “श्रीमाताजींची जी इच्छा असेल ती माझ्यासाठी सर्वेात्तमच असेल,” असा समर्पणाचा भाव असला पाहिजे.

आणि दुसरा उपाय म्हणजे, आत्ता तुमच्या अनुभवास येत असलेली विशालता! ही विशालता (wideness) खऱ्या आत्म्याची असते, तसेच ती खऱ्या मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वाचीसुद्धा असते. त्यांपासून (भावविवशता, अस्वस्थता) या गोष्टी एखाद्या धुळीकणाप्रमाणे खाली पडतात. कारण या गोष्टींना त्यांच्या लेखी काही महत्त्वच नसते. तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे, या विशालतेमध्ये, शांतीमध्ये आणि निश्चल-निरवतेमध्ये नित्य वास्तव्य केले पाहिजे आणि त्यामध्ये तुमचा अहंकार विरघळून गेला पाहिजे आणि आसक्ती नाहीशी झाली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 211)