नैराश्यापासून सुटका – ३३
नैराश्यापासून सुटका – ३३
(व्यक्तीमध्ये मनोरचना करण्याचे आणि त्या प्रत्यक्षात उतरविण्याचे सामर्थ्य कसे असते, ते श्रीमाताजींनी सविस्तर सांगितले आहे. परंतु मनोरचना करण्याचे उत्तम सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जर विखुरलेले असेल, त्यामध्ये परस्परविरोधी इच्छा-आकांक्षा असतील तर कसे नुकसान होते, तसेच कल्पनाशक्तीवर नियंत्रण कसे ठेवता येते, ते त्या इथे सांगत आहेत…)
मला अशी काही लोकं माहीत आहेत की, ज्यांच्या प्रकृतीमध्ये अगदी दोन विरूद्ध बाजू एकाच वेळी विद्यमान असतात. त्यांच्यामधील त्या बाजू इतक्या परस्परविरोधी असतात की, एक दिवस त्या व्यक्ती अतिशय अद्भुत, प्रकाशमान आणि प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने शक्तिशाली अशा मनोरचना (formation) तयार करू शकतात पण लगेच दुसऱ्याच दिवशी पराभूत, काळोख्या, अंधाऱ्या, विषण्णतायुक्त अशा मनोरचना तयार करतात आणि त्या दोन्ही प्रकारच्या मनोरचना वातावरणात बाहेर पडतात. आणि तो सगळा घटनाक्रम मी पाहू शकत असे.
(मला असे दिसले की) त्यातील एक मनोरचना अतिशय मनोहारी होती आणि ती प्रत्यक्षात येऊ पाहत होती. जेव्हा आता ती मनोहारी मनोरचना प्रत्यक्षात उतरणार होती अगदी नेमक्या त्याच वेळी, त्या मनोरचनेला दुसऱ्या अंधकारमय मनोरचनेने उद्ध्वस्त केले. हे जसे या उदाहरणात छोट्या गोष्टीबाबतीत घडले तसेच जीवनामध्ये मोठ्या गोष्टींबाबतीतही घडून येते.
आणि हे असे का होते? तर व्यक्ती विचार करत असताना स्वतःचे निरीक्षण करत नाही. व्यक्तीला असे खात्रीपूर्वक वाटत असते की, अशा परस्परविरोधी घडामोडींची ती गुलाम आहे. ती व्यक्ती म्हणते, “अरे देवा! आज मला बरे वाटत नाहीये. आज सारे काही उदास उदास वाटतंय.” व्यक्ती असे म्हणत असते कारण तिला असे वाटत असते की, जणू काही ती ज्याबाबत काहीच करू शकत नाही असे ते अटळ दैव आहे.
परंतु व्यक्ती जर दोन पावले मागे उभी राहून पाहील किंवा एक पायरी वर चढेल, तर व्यक्ती या साऱ्या गोष्टी पाहू शकते, त्या गोष्टींना त्यांच्या योग्य त्या स्थानी ठेवू शकते. तसेच व्यक्तीला त्यातील ज्या गोष्टी नको आहेत त्या ती नष्ट करू शकते किंवा त्यांपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकते. स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने या सर्व गोष्टी ती करू शकते. याला ‘कल्पनात्मकता’ (imaginative) असे म्हणतात. व्यक्तीला ज्या गोष्टी हव्या आहेत आणि ज्या तिच्या सर्वोच्च अभीप्सेशी सुसंवादी असतात अशाच गोष्टींबाबत ती व्यक्ती कल्पनाशक्ती उपयोगात आणू शकते. यालाच मी व्यक्तीने ‘कल्पनेवर नियंत्रण ठेवणे’ असे म्हणते.
– श्रीमाताजी (CWM 09 : 388)
- नैराश्यापासून सुटका – ३३ - October 22, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३२ - October 21, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३१ - October 20, 2025




