नैराश्यापासून सुटका – २७
नैराश्यापासून सुटका – २७
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
ईश्वर जर अस्तित्वात आहे आणि त्याने जर तुम्हाला या मार्गासाठी हाक दिलेली आहे (आणि ती हाक आलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे), तर मग या सगळ्या पाठीमागे निश्चितपणे ‘ईश्वरी मार्गदर्शन’ असले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणी असतानासुद्धा तुम्ही त्यांमधून पार व्हाल आणि या मार्गावर खात्रीपूर्वक येऊन पोहोचाल, अशी श्रद्धा तुम्ही विकसित करणे आवश्यक आहे. आणि ती तर्क व सामान्य जाणीव (common sense) यांच्याशी मिळतीजुळती देखील असेल.
तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही अशा सूचना देणाऱ्या विरोधी आवाजांकडे लक्ष देऊ नका; किंवा त्यांना प्रतिसाद देणाऱ्या अधीर, घाईगडबड करणाऱ्या प्राणिक आवाजांकडेदेखील लक्ष देऊ नका. पुष्कळ अडचणी असल्यामुळे यश मिळण्याची काही शक्यता दिसत नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तसेच ईश्वराने आत्तापर्यंत त्याचे अस्तित्व तुम्हाला जाणवू दिले नाही, त्यामुळे तो पुढेही स्वतःला कधीच प्रकट करणार नाही, अशा समजुतीवर मुळीच विश्वास ठेवू नका. ज्यांनी ज्यांनी आपले मन अतिशय महान व अवघड अशा एखाद्या ध्येयावर केंद्रित केलेले असते, त्यांची अशी भूमिका असते की, “मला यश मिळेपर्यंत मी वाटचाल करतच राहीन. मग भले कितीही अडचणी आल्या तरी, मी यशस्वी होईनच होईन.” अशीच तुमची भूमिका असू दे.
ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या मनुष्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट असते, ती अशी की, “ईश्वर अस्तित्वात आहे, तो आहेच आणि जर तो अस्तित्वात आहे तर, मग मी त्याचे जे अनुसरण करत आहे, त्यामध्ये मला कधीही अपयश येऊच शकणार नाही. मला जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही, तोपर्यंत कितीही दुःख वा संकटे आली तरी, त्यांवर मात करून, मी वाटचाल करतच राहीन.”
– श्रीअरविंद (CWSA 29 : 94)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६ - November 14, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५ - November 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४ - November 12, 2025





