नैराश्यापासून सुटका – २५
नैराश्यापासून सुटका – २५
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
नैराश्यामुळे स्वत:ला निराश होऊ द्यायचे नाही, तर त्यापासून चार पावले मागे होऊन, त्याच्या कारणाचा शोध घ्यायचा आणि ते कारण दूर करायचे, हा ‘योगा’मधील एक नियम आहे. बरेचदा ते कारण तुमच्या स्वतःमध्येच असते. कदाचित कोठेतरी एखादा प्राणिक दोष असतो, एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये व्यक्ती गुंतून पडते किंवा एखादी किरकोळ इच्छा तिच्या अंगलट येते. कधीकधी इच्छेची पूर्ती केल्यामुळे तर कधी ती पूर्ण न केल्यामुळे असे घडून येते.
योगामध्ये बरेचदा असे होते की, एखादी इच्छा-वासना अपूर्ण राहिल्यामुळे जेवढे अधःपतन होते, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अधःपतन तिच्या उपभोगामुळे किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीला डोक्यावर चढवून ठेवल्यामुळे होते. तर मग तुम्ही काय केले पाहिजे? इच्छा-वासनांची पूर्ती झाल्याचा किंवा न झाल्याचा त्रास आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (Psychic being) होत नाही; कारण ईश्वराशी असलेल्या त्याच्या सख्यत्वावर तो सुस्थिरपणे उभा असतो आणि त्याच्या खऱ्या अस्तित्वाच्या दृष्टीने या छोट्याछोट्या गोष्टींकडे, त्या परक्या असल्याप्रमाणे तो पाहत असतो. पण इच्छा-वासनांची पूर्ती झाल्याचा किंवा न झाल्याचा जास्त परिणाम बाह्यवर्ती प्राण व मन यांच्यावर होत असतो. तेव्हा बाह्यवर्ती प्राणिक व मानसिक जीवनात फारसे न राहता, तुम्ही अधिकाधिक सखोलपणे अंतरंगामध्ये राहून जीवन जगले पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 189)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५ - January 27, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७५ - January 12, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७४ - January 11, 2026







